बनावट कागदपत्रांआधारे जमीन हडपण्याचा प्रयत्न ,चौघांना अटक  

औरंगाबाद: दि 31-जमीनीच्या मुळ मालकाच्या जागी बनावट महिला उभी करुन जमीन लाटण्याचा प्रयत्न दुय्यम निबंधक कार्यालयातील सह दुय्यम निबंधकांनी हाणून पाडला. प्रकरणात बनावट कागदपत्रांआधारे जमीन हडपण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. आरोपींना दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहारकर यांनी दिले.
सय्यद अब्दुल मुकीत सय्यद बशीरोद्दीन (४९, रा. काझीपुरा, जालना ह.मु. एसआरटी क्‍वॉर्टर लेबर कॉलनी), शेख फारुक अब्दुल रज्जाक (३०, रा. लोटाकारंजा), शेख मन्सुर शेख अहेमद (३९, रा. अंबड जि. जालना) आणि अमजद खान बिस्मील्‍ला खान (३२, रा. रहेमानिया कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात सह दुय्यम निबंधक कविता प्रदिप कदम (४८, रा. उल्कानगरी) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, कविता कदम या कर्तव्यावर असतांना १९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दस्ता नोंदणी करतेवेळी मौजे बाळापूर येथील गट नं. १४९ मधील प्लाट क्रं.१३ व १४ चा मुख्त्यारनामा दस्तऐवज टंकलिखीत करणारे रमेश म्हस्के यांनी कदम यांना दिला. त्यांनी दस्ताची पाहणी केली असता मुख्त्यारपत्र लिहुन घेणारा सय्यद मुकीत सय्यद बशीरोद्दीन (रा. चेलीपुरा, काचीवाडा) व लिहुन देणार छाया विश्वनाथ चौधरी (रा. नांदेड) व साक्षीदार शेख मन्सुर, अमजद खान अशी नावे होती. कदम या संगणकावर दस्ताची नोंदणी करत होत्या. त्यावेळी संगणकावर पक्षकाराच्या फोटो व अंगठा घेत असतांना कविता कदम यांना त्यांच्यावर संशय आला.
त्यामुळे त्यांनी वरील चौघांना जवळ बोलावून घेत त्यांची चौकशी केली. बनावट छाया चौधरीचा जबाब घेत असतांना तिने उडवा उडवीची उत्‍तरे दिली. त्यामुळे कविता कदम यांनी सखोल चौकशी सुरु केली असता आरोपींनी तेथून धूम ठोकली. तसेच सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे देखील त्यांच्या लक्षात आले. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपसा करुन  चौघा आरोपींना अटक करुन न्यायालयता हजर केले असता छाया चौधरी नावाच्या तोतया महिलेला अटक करणे आहे. गुन्ह्यात बनावट कागदपत्र बनविण्यासाठी आरोपींना मदत करणार्‍यांना अटक करणे आहे. आरोपींच्या साथीदारांना देखील अटक करणे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकरी वकील सय्यद शहनाज यांनी न्यायालयाकडे केली.