मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण …

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रत्युत्तर

पुणे ,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- “मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही,” असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते, त्या भाषेत आपण बोलतो, असे सांगितल्याचे एका पत्रकाराने सांगितले व त्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी उत्तर दिले.

तेलंगणचे मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच.