राज्यात ३१ हजार निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी; गतवर्षी २ लाख ४६ मे. टन द्राक्षनिर्यात

पुणे,१५ डिसेंबर/प्रतिनिधी:- राज्यातील द्राक्षाची युरोपियन युनियन तसेच इतर देशांना निर्यात व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्यात येते. त्याअंतर्गत यावर्षी 15 डिसेंबरपर्यंत 31 हजार 68 इतक्या निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच गेल्यावर्षी 2020-21 मध्ये राज्यातून 2 लाख 46 हजार 235 मे. टन द्राक्षाची निर्यात करण्यात आली आहे.

युरोपियन युनियनसह अन्य देशांना द्राक्ष नियांतीकरीता कीड व रोगमुक्त, उर्वरित अंश हमी देण्यासाठी सन 2004 पासून राज्यात अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात येते. द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, तपासणी, कीड व रोगमुक्त हमी, ॲगमार्क प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण आदी बाबी ग्रेपनेट प्रणालीद्वारे प्रभावीपणे येत आहेत.

राज्यात प्रामुख्याने नाशिक, पुणे, सांगली, अहमदनगर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, लातूर व जालना या जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन घेण्यात येते. 2020-21 मध्ये ग्रेपनेटद्वारे 45 हजार 385 निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली. तसेच कोविड-19 कालावधीमध्ये कृषी विभागाने योग्य प्रकारे नियोजन केल्याने 2 लाख 46 हजार 235 मे.टन द्राक्षाची विक्रमी निर्यात झाली. त्यापैकी 1 लाख 5 हजार 356 मे.टन निर्यात युरोपियन युनियनला करण्यात आली. द्राक्ष उत्पादक, फलोत्पादन विभाग, द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे, अपेडा, विभागीय पीक संरक्षण कार्यालय, मुंबई व अन्य संस्थाचे यामध्ये मोलाचे योगदान लाभले.

नोंदणीनूतनीकरणासाठी मोबाईल ॲपचा वापर

2021-22 या वर्षामध्ये फळे व भाजीपाला निर्यातीस चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. फळे व भाजीपाल्याच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ‘फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅप’चा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांना कीड व रोगमुक्त फळे, भाजीपाला उपलब्ध करुन देण्यासाठी 1 लाख 54 हजार निर्यातक्षम शेतनोंदणी लक्षांक निर्धारित करण्यात आलेला आहे.

चालू वर्षी निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, नूतनीकरण करण्याकरीता राज्यभरात तालुका स्तरावरून खास मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. 15 डिसेंबर 2021 अखेर 31 हजार 68 द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

2021-22 मध्ये जिल्हानिहाय निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी

पुणे- नोंदणीचे नूतनीकरण 875, नवीन 237 (एकूण 1 हजार 112), नाशिक- नूतनीकरण 20 हजार 135, नवीन 2 हजार 616 (एकूण 22 हजार 751), अहमदनगर- नूतनीकरण 606, नवीन 38 (एकूण 644), बीड- नूतनीकरण 1, नवीन 2 (एकूण 3), बुलढाणा- नवीन 3 (एकूण 3), लातूर- नूतनीकरण 89, नवीन 386 (एकूण 127), उस्मानाबाद- नूतनीकरण 392, नवीन 51 (एकूण 443), सांगली- नूतनीकरण 4 हजार 174, नवीन 870 (एकूण 5 हजार 44), सातारा- नूतनीकरण 354, नवीन 55 (एकूण 409), सोलापूर- नूतनीकरण 510, नवीन 22 (एकूण 532) याप्रमाणे राज्यात 27 हजार 136 निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यात आले असून 3 हजार 932 नवीन द्राक्षबागांची नोंदणी करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील क्षेत्र व निर्यातक्षम द्राक्ष बागांचा नोंदणी लक्षांक तसेच शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नोंदणी, नूतनीकरण कालावधी दिनांक 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे, अशी माहितीदेखील कृषी आयुक्तालयाने दिली आहे.