बेलापूर येथील सीजीएसटी आयुक्तालयाने 81 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा आणला उघडकीस

मुंबई ,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- 

कर-चुकवेगिरीविरुद्ध  मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून बेलापूर सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मंडळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी मे. फँटासिया ट्रेड प्रा.लि या नवी मुंबईतील कंपनीच्या एका संचालकाला अटक केली आहे. या कंपनीने  479 कोटी रुपयांच्या खोट्या पावत्यांचा वापर करून वस्तू किंवा सेवा न मिळवता 81 कोटी रुपयांचे  इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) फसवणुक करून मिळवले आहे किंवा इतरांना दिले आहे.

डेटा अनॅलिटीक्सचा वापर करत गुप्तचर विभागाकडून  मिळालेल्या माहितीनुसार  कारवाई करत या  अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या व्यापारी परिसरासह विविध ठिकाणी तसेच कंपनीच्या वाहतुकदाराच्या कार्यालय परिसरात तपास सत्रे राबविली. या धाडीतून काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली असून ती ताब्यात घेण्यात आली आहेत.

तपासणीअंती असे दिसून आले की, मे. फँटासिया ट्रेड प्रा.लि. ही कंपनी मे.आर्क फार्मालॅब्स मर्या. या मुंबईतील कंपनीच्या आदेशावरून हे बेकायदेशीर व्यवहार करत होती आणि यामध्ये कोणत्याही वस्तूंचा प्रत्यक्ष व्यापार करण्यात आलेला नाही. चौकशीदरम्यान हाती आलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, या प्रकरणी, सरकारचा देय महसूल बुडविण्याच्या हेतूने सर्व संबंधित वैधानिक तरतुदींचे उल्लंघन करून केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 नुसार प्रथमदर्शनी गुन्हा केला आहे. 

यावेळी झालेल्या तपासणीमध्ये 81 कोटी रुपयांचे  इनपुट टॅक्स क्रेडिट बेकायदेशीर मार्गाने मिळवले तसेच त्याचा वापर केला असल्याने हा कायद्याच्या दृष्टीने नोंद घेण्यासारखा आणि अजामीनपात्र गुन्हा आहे असे दिसून आले. त्यामुळे सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत मे. फँटासिया ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या एका संचालकाला अटक 18 फेब्रुवारी 2022 रोजी अटक करून त्याच दिवशी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळ्यात सहभागी होऊन, निरोगी आर्थिक परीसंस्थेची फसवणूक करणाऱ्या आणि सरकारचा अधिकार असलेला महसूल हडपण्याचा गुन्हा करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने करचुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर सुरु केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. करचुकवेगिरी  करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी सीजीएसटी विभाग डेटा अनॅलिटीक्स आणि नेटवर्क विश्लेषण यांसारख्या साधनांचा वापर करत आहे. या विशेष मोहिमेत, सीजीएसटीच्या मुंबई प्रदेश अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत करचुकवेगिरीच्या 730 प्रकरणांमध्ये 6,380 कोटी रुपयांची कर चोरी उघडकीस आणली आणि त्यातील 700  कोटी रुपये वसूल केले तसेच या संदर्भात 56 व्यक्तींना अटक देखील केली. येत्या काळात सीजीएसटी विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या तसेच आयटीसी बाबत फसवणूक करणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे.