अक्षता सुनक यांना मोठे गिफ्ट! इन्फोसिसकडून १२६ कोटींचा लाभांश

नवी दिल्ली : ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता सुनक यांना त्यांच्या वडिलांच्या कंपनीकडून मोठे गिफ्ट मिळाले आहे. अक्षता यांचे वडील इन्फोसिस कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिसकडून तब्बल १२६ कोटींचा लाभांश त्यांना देण्यात आला आहे. ब्रिटनच्या फर्स्ट लेडी बनण्याचा मान आता अक्षता यांना मिळाला आहे. त्यांचे पती ऋषी सुनक यांची ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे. अत्यंत कठीण काळात त्यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.


स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता हिच्याकडे सप्टेंबरच्या अखेरीस इन्फोसिसचे ३.८९ कोटी किंवा ०.९३ टक्के शेअर्स होते. बीएसईवर १५२७.४० रुपये प्रति समभाग या किमतीने त्यांची इन्फोसिस कंपनीतील हिस्सेदारी ५,९५६ कोटी रुपये आहे. इन्फोसिसने या वर्षी ३१ मे रोजी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर १६ रुपये अंतिम लाभांश दिला. यामुळे अक्षता यांना हा घसघशीत लाभांश मिळाला आहे. यामुळे नारायण मूर्ती यांनी आपल्या मुलीला हे मोठे गिफ्टच ठरले आहे.
 
अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीतून जात असलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी मूळ भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची निवड झाली आहे. ऋषी हे ब्रिटनचे पहिले हिंदू आणि सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. मंगळवारी त्यांनी ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांची प्रथेप्रमाणे बकिंगहॅम पॅलेसमध्ये भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानाबाहेर देशाला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी आपल्या समोरील आव्हानांचा एकजुटीने सामना करण्याची आणि आता हे करून दाखवण्याची वेळ आली आहे असे सांगितले.