प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्‍या ११ वर्षीय मुलाच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी प्रियकर फौजीला बेड्या

औरंगाबाद,२८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-प्रेमात अडसर ठरणाऱ्या विवाहित प्रेयसीच्‍या ११ वर्षीय मुलाला केबल वायरने मारहाण करुन त्‍याच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी प्रियकर फौजीला पुंडलिकनगर पोलिसांनी रविवारी पहाटे बेड्या ठोकल्या. गणेश बबन थोरात (३०, रा. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव असून त्‍याला १ सप्‍टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्‍ही. सपाटे यांनी दिले.

या प्रकरणात २९ वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादीच्‍या पतीला किडीनीचा आजार असल्याने तो दोन वर्षांपासून इंदोर येथे त्‍याच्‍या आई-वडीलांकडे राहतो. तर फिर्यादी ही आपल्या ११ वर्षीयमुला सोबत औरंगाबाद येथे राहत होती. सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी फिर्यादीच्‍या पतीला किडीनीच्‍या आजाराने एमजीएम हॉस्‍पीटल येथे दाखल करण्‍यात आले होते. त्‍यावेळी आरोपी गणेश थोरात आणि फिर्यादीची ओळख झाली. तेंव्‍हा आरोपीची पत्‍नी जवळची नातेवाईक असल्याचे फिर्यादीला समजले. फिर्यादीचा पती इंदोरला गेल्यानंतर आरोपीने त्‍याचा फायादा घेत माझी बायको मला आवडत नाही, असे म्हणत फिर्यादीशी प्रेमसंबंध निर्माण केले. व मी फौजमध्ये आहे, तुला काहीच कमीपडु देणार नाही असे म्हणत फिर्यादीला प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले. आरोपी हा छावणीत कर्तव्‍यावर असतांना तो फिर्यादीच्‍या घरी राहुल लागला, तिला पत्‍नीसारखा वागवु लागला, तिच्‍याशी शारिरीक संबंध देखील ठेवत होता. आरोपीने फिर्यादीला दिवाळी सणाच्‍या दिवशी फिर्यादीच्‍या गळ्यात माळ टाकून तिच्‍या केसात आणि कपाळाला कुंकु लावून आज पासून तु माझी बायको असे म्हणाला. सुमारे दोन वर्षांपासून आरोपी हा फिर्यादीच्‍या सर्व गरजा भागवत होता.

जानेवारी २०२२ मध्‍ये आरोपीची कुपवाडा (जम्मु काश्‍मीर) येथे तर जून २०२२ मध्‍ये गुरुदासपुर (पंजाब) येथे बदली झाली. मात्र आरोपी व फिर्यादी हे मोबाइलवरुन संपर्कात होते. जून २०२२ मध्‍ये आरोपी हा पुन्हा कोर्ससाठी बंगलौर येथे आला. त्‍यावेळी त्‍याने फिर्यादीला विमानाचे तिकीट पाठवून तिला बंगलौर येथे बोलावून घेतले. त्‍यानूसार फिर्यादीने आपल्या मुलाला मैत्रिणीच्या  घरी सोडला. व ती पुण्‍याहून विमानाने बंगलौर येथे गेली. तेथून आरोपी व फिर्यादी हे उटी येथे गेले. तेथून ते पुन्‍हा बंगलौर येथे एका हॉटेलात आले. २४ जून रोजी हॉटेलात त्‍यांनी आरोपीचा वाढदिवस साजरा केला. व २६ जून रोजी ते ट्रॅव्‍हल्सने औरंगाबादेत आले. आरोपीने फिर्यादीला घरी सोडले व तो सिंदखेड राजा येथे निघून गेला.

३० जून रोजी फिर्यादी व तिचा मुलगा घरात असताना दुपारी साडेबारा वाजता आरोपी तेथे आला, त्‍याने मला पाहून पळून जाण्‍याचा प्रयत्‍न करतो का म्हणत केबल वायरने मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचा आवाज ऐकताच फिर्यादी बेडरुम बाहेर आली असता, मुलगा गंभीर अवस्‍थेत असल्याचे तिच्‍या निदर्शनास आले. दोघांनी त्‍याला रिक्षात टाकून एमजीएम हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल केले. तत्पूर्वी आरोपीने माझ्या नोकरीचा प्रश्‍न आहे, त्‍यामुळे मुलाला तुच मारले असे सांग अशी विनवणी केली.

उपचार सुरु असताना आरोपीने बायकोसोबत भांडण झाले होते, तिला मारहाण केल्याने तिचा हात मोडला, त्‍यामुळे टेन्‍शनमध्‍ये होतो, त्‍याच टेन्‍शमुळे मुलाला केबलने मारहाण केल्याचे फिर्यादीला सांगितले. उपचार सुरु असताना २७ ऑगस्‍ट रोजी पहाटे ३ वाजेच्‍या सुमारास मुलाचा मृत्‍यू झाला. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील ए.व्‍ही. घुगे यांनी आरोपीने गुन्‍ह्यात वापरलेला केबल वायर, परिधान केलेले कपडे हस्‍तगत करायचे आहे. मुलाला मारहाण करण्‍याचा आरोपीचा नेमका उद्देश काय होता, आरोपी हा सैन्य दलात कार्यरत असून तो औरंगाबादेत कधी-कधी आला होता व तो कायदेशीर रजेवर होता किंवा कसे याचा तपास करायचा आहे. आरोपीने फिर्यादीला कोठे फिरण्‍यासाठी नेले होते याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस  कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.