याकूबच्या कबरीचे उदात्तीकरण नेमकं कुणाच्या काळात झालं ते नव्याने सांगण्याची गरज नाही-देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना सुनावले

मुंबई : ‘कुणाच्या सरकारच्या कार्यकाळात याकूबच्या कबरीजवळ काय प्रकार केले गेले, या वादात मी पडणार नाही. न्यायव्यवस्थेने रात्री बारा वाजता आपले दरवाजे उघडले आणि मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना फाशी देण्याची शिक्षा सुनावली. ही घटना भाजप सरकारच्या कार्यकाळात घडली होती. आमच्यात हिंमत होती म्हणूनच आम्ही न्यायालयात गेलो आणि दहशतवादी याकूबला फाशी देण्याचे काम आमच्याच सरकारमध्ये झालं,’ या शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकूब मेमन प्रकरणावर टिप्पणी केली आहे. याकूबच्या कबरीचा वाद सुरु झाल्यानंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र पाहायला मिळत आहे.
 
 
दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरून सुरु झालेल्या वादावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कबरीचा वाद सुरु झाल्यानंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात झाली आहे. अखेर याकूब मेमनच्या प्रकरणात ठाकरे गटाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिप्पणी केली आहे.
 
 
फडणवीसांनी ठाकरेंना सुनावले
‘मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. अजूनही या गुन्हेगारांचे  साथीदार असलेली मंडळी जेलमध्ये असून त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंत्री बनविण्यात आलं होतं. याउलट आमच्या सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही रात्री दोन वाजता न्यायालयाचे दरवाजे वाजवले आणि याकूबला फाशी देण्याचे काम आमच्या काळात झाले. त्यामुळे याकूबच्या कबरीचे उदात्तीकरण नेमकं कुणाच्या काळात झालं ते मी नव्याने सांगण्याची गरज नाही.’ असे म्हणत फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.