लासुर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करा

आ.सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत उपस्थित केला तारांकित प्रश्न

औरंगाबाद,२३ डिसेंबर /प्रतिनिधी:- लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज  विधान परिषदेत केली.

          मुंबई येथे सध्या हिवाळी अधिवशेन सुरू आहे. आ.सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाव्दारे लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करावे अशी मागणी करून सभागृहाचे लक्ष वेधले. सदरील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना 1969 मध्ये झाली असून सद्यस्थितीत याठिकाणी बाह्य व अंतररूग्ण सं‘या 200 ते 250 च्या जवळपास आहे. पंचक्रोशीतील जवळपास 80 ते 90 खेडेगावातील रूग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. सदरील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत 52 वर्षापूर्वीची असल्याने ती मोडकळीस आली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मे 2021 मध्ये आ.सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्राामीण रूग्णालयात रूपांतर करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करून त्वरीत आवश्यक ती पावले उचलली जातील असे आश्वासन आ.सतीश चव्हाण यांना दिले होते.

त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव देखील मागवला मात्र त्यात त्रुटी असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सभागृहात सांगितले. मात्र हा प्रस्ताव शासनाला केव्हा मिळाला?, अधिकार्‍यांच्या टोलवाटोलवीमुळे हा प्रस्ताव आपल्याकडे येण्यापासून राहिला आहे का?, सात महिन्यापासून अधिकारी त्रुटीच काढत आहेत का? असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित करून सदरील प्रस्तावावर त्वरीत योग्य निर्णय घ्यावा, नवीन प्रस्ताव मंजूर होईपर्यंत मोडकळीस आलेल्या इमारत दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी केल्या.

येणार्‍या 15 दिवसांत सदरील प्रस्ताव मागवला जाईल व सदरील आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करण्यासंदर्भात शासनस्तराव योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सभागृहात सांगितले.