महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारीला

औरंगाबाद,१७ डिसेंबर /प्रतिनिधी:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचे मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर दिनांक 02 जानेवारी 2022 रोजी सत्र-I सकाळी 10.00 ते 12.00 व सत्र- II दुपारी 03.00 ते 05.00 या कालावधीत 47 उपकेंद्रावर सपंन्न होणार असून परीक्षेसाठी 15160 उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला आहे. विषयांकित परीक्षेच्या कामासाठी 1726 अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली असुन परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांने प्रवेशप्रमाणपत्र व स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हींग लायसन यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळया व निळया शाईचे बॉल पॉइंट पेन, मुळ ओळखपत्र, या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.

 उमेदवार त्यांच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेराच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल.

प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीत उमेदवार यांच्या बैठक क्रमांकानुसार दिलेल्या A,B,C,D  वर्णाक्षरांच्या संचापैकी त्याला दिलेल्या वर्णाक्षरांचाच प्रश्नपुस्तीकेचा संच वापरत आहे याची पर्यवेक्षक व समवेक्षेकांनी सातत्याने खात्री करावी.

परीक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-19 विषाणूच्या अनुषंगाने Extra Proective Kit, परीक्षेकरीता उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकरीता Basic Covid Kit व फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांच्या वापराकरीता Personal Protective Equipment Kit आयोगा मार्फत पुरविण्यात येणार आहे.

परीक्षेच्या पर्यवक्षेणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता मा.जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असून सदर परीक्षेकरीता सर्व उमेदवारांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे.