महिलेचा विनयभंग करुन तिच्‍या पतीला बेदम मारहाण:आरोपीला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

औरंगाबाद,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- महिलेचा विनयभंग करुन तिच्‍या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरोपी रामकिसन अप्‍पासाहेब लघाने (३६, रा. पानरांजणगाव ता.पैठण) याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि ४० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा न्‍यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी ठोठावली.

विशेष म्हणजे ठोठावलेल्या दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणुन पीडित महिलेला देण्‍याचे आदेश दिले. तसेच पैठण प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेल्या दंडाची रक्कम सरकार दरबारी जमा करण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले. प्रकरणात अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे यांनी काम पाहिले.

आरोपी रामकिसन लघाने याला २९ मे २०१७ मध्‍ये पैठण प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी भादंवी कलम ३५४ अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. तसेच दंडातील रक्कमेतील ४ हजार रुपये पीडित महिलेला देण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले होते. याविरोधात आरोपीने सत्र न्‍यायालयात अपील दाखल केले होते.

प्रकरणात पीडित विवाहीतेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २३ जुलै २०१४ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्‍या सुमारास पीडिता ही गाढेगाव गंगापुर शिवारातील शेतात काम करण्‍यासाठी जात होती. त्‍यावेळी आरोपी रामकिसन लघाने याने पाठीमागुन येत पीडितेला घट्ट मिठी मारली. व मी तुझ्यासाठी इतक्या लांबुन येतो, तु मला असेच जावु देशील का, मला काही तरी करु दे असे म्हणुन पीडितेशी झोंबा-झोंबी करु लागला. पीडितेने कशीबशी आपली सुटका करुन घेत थेट घर गाठले व घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. पीडितेचा पती आरोपीला जाब विचारण्‍यासाठी गेला असता, आरोपीने शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच तु आमच्‍या विरोधात पोलीसात तक्रार केल्यास जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. प्रकरणात बिडकीन पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.