वैजापूर तालुक्यातील दोन महत्त्वाच्या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा द्या – डॉ दिनेश परदेशी यांची केंद्रीयमंत्री गडकरी व कराड यांच्याकडे मागणी

वैजापूर,१६ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा वैजापूर- श्रीरामपूर रस्ता (राज्यमार्ग क्र 51) व तलवाडा – परसोडा (प्रजिमा – 27) हे दोन्ही राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात यावे त्यामुळे दळणवळण सुरळीत होऊन या भागाचा विकास होईल अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

यामागणी संदर्भात डॉ.दिनेश परदेशी यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गडकरी व कराड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या अस्तित्वात असलेला वैजापूर-श्रीरामपूर (राज्यमार्ग क्र.51) हा रस्ता मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा रस्ता असून या रस्त्यावर वाहतूक खूप मोठ्याप्रमाणात आहे.हा रस्ता वैजापूर शहरापासून (राष्ट्रीय महामार्ग क्र.752 H) ते राष्ट्रीय महामार्ग क्र.360 असा जोडल्यास या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होऊन दळणवळण व्यवस्थित होईल. तसेच तालुक्यातील तलवाडा – जानेफळ – खंडाळा – परसोडा या अस्तित्वात असलेल्या प्रजिमा – 27  हा राष्ट्रीय महामार्ग क्र.752-I व 752-G ला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे.या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा मिळाल्यास या भागातील दळणवळणाची प्रश्न मार्गी लागून तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल.तरी दोन्ही रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गचा दर्जा द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.