ऑनलाईन कुरिअरने तलवारीचा साठा मागितल्या प्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना बेड्या ठोकल्‍या

औरंगाबाद,४ एप्रिल / प्रतिनिधी :-ऑनलाईन कुरिअरने पंजाब येथून तलवारीचा साठा मागितल्या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी दि.३ रात्री आणखी तिघांना बेड्या ठोकल्‍या. तिघा आरोपींना मंगळवार दि.५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस.डी. कुर्हेकर यांनी सोमवारी दि.४ दिले.

अबरार शेख जमील शेख ऊर्फ शाहरुख (२१), शेख उबेद शेख नजीर (२०, दोघे रा. जयसिंगपुरा रोड, बेगमुपरा) आणि दानिश खान अब्दुल समद खान (२०, रा. बिस्‍मील्ला नगर, हर्सुल) अशी आरोपींची नावे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करून पंजाब राज्यातील जालिंधर आणि अमृतसर या शहरातून मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा डी.टी.डी.सी कुरिअरच्या माध्यमातून शहरात येणार असल्याची माहिती क्रांतिचौक पोलिसांना मिळाली होती. त्‍याआधारे पोलिसांनी निराला बाजार येथील डी.टी.डी.सी.या कुरिअर कार्यालयावर छापा मारुन विविध आरोपींच्‍या नावे आलेले सात बॉक्स जप्‍त केले. त्‍यात ३७ तलवारी आणि १ कुकरी असे ३८ शस्त्रे मिळून आले. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍याचे उपनिरीक्षक विकास खटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

वरील तिघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपी शेख उबेद आणि दनिश खान यांच्‍या घरातून तीन तलवारी जप्‍त करण्‍यात आल्या आहेत. आरोपींचा घातपात करण्‍याचा काही हेतु काय, आरोपींनी तलवारी आणखी कोणाला विक्री केल्या काय याचा तपास करायचा आहे. आरोपी अबरार शेख याने शेख राजू हे नाव वापरुन दहा तलवारी ऑर्डर केल्या होत्‍या, त्‍यामुळे त्‍यामागे दुसरा कोणता मोरक्या आहे काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.