नांदूर – मधमेश्वर प्रकल्पाच्या पाण्यावर बिगर सिंचन आरक्षणाचा धोका – माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर

वैजापूर ,२६ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतक-यांना सिंचनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्मिती केलेल्या नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यात लाभक्षेत्रातील शेतक-यांकडून पाणी मागणी नसल्याने नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या धरणातील पाणी साठ्यावर बिगर सिंचन आरक्षणाचा धोका वाढला आहे. भविष्यात आरक्षणाचे संकट टाळण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतक-यांनी हक्काच्या पाण्यासाठी हेवेदावे विसरून संघटीत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी तालुक्यातील कापूसवाडगाव येथे केले. 

नांदूर मधमेश्वर कालव्यातून लाभक्षेत्रात सहा पाणी आवर्तने मिळाली पाहिजे. मात्र लाभधारकांकडून पाणी मागणी होत नसल्याने आतापर्यंत या प्रकल्प क्षेत्रात केवळ ११ हजार हेक्टर क्षेत्र कसेबसे ओलिताखाली आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते व पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी, लाभधारक शेतक-यांची संयुक्त विचार सभेचे आयोजन कापूसवाडगाव येथील अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात करण्यात आले होते. या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे गणेश सावंत, कालवा सल्लागार समितीचे सदस्य पंडित शिंदे, युनुस देशमुख, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, शहराध्यक्ष प्रेम राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आपली भूमिका मांडताना चिकटगावकर म्हणाले, लाभक्षेत्रातील शेतक-यांनी संघटीत होण्याची आवश्यकता आहे. दुष्काळाची कायम झळ सोसणाऱ्या वैजापूर, गंगापूर तालुक्यातील १०० गावांना बारमाही जलसिंचनचा लाभ देण्यासाठी शरद पवार, माजी पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील आदींच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पात जलसिंचनाचा लाभ निश्चित झाला आहे. मात्र अलीकडच्या काळात शेती सिंचनासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत उदासीन असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार लाभक्षेत्रातील शेतक-यांकडून पाणी मागणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर सिंचनाचे नियोजन आखले जाते. मात्र आपण पुढा-यांच्या  भरवशावर पाणी मिळेल यावर विसंबून राहिल्यास हा प्रकल्पाचे वाळवंट होण्याची भीती चिकटगावकर यांनी व्यक्त केली.

या बैठकीचे प्रास्ताविकात पंडित शिंदे यांनी गंगापूरचे आ. प्रशांत बंब, आ. अंबादास दानवे, आ.प्रा.रमेश बोरनारे, भाजपचे नेते डॉ. दिनेश परदेशी आदि सर्वपक्षीय नेत्यांनी येत्या काळात या प्रश्नावर सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे. शेतक-यांत पाणी प्रश्नाची जागरूकता निर्माण करण्यासाठी या विचारसभेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत वैजापुरात सर्वपक्षीय पाणी परिषद घेणार वैजापूर, गंगापूर तालुक्यातील काळी कसदार भुईला सिंचनाची हमी देण्यासाठी हा महत्वकांक्षी प्रकल्प मोठ्या संघर्षातून साकारण्यात आला आहे. मात्र शेतक-यांकडून अपेक्षित पाणी मागणी अर्ज विभागाकडे सादर होत नसल्याने हक्काचे पाणी गमावण्याची पाळी येवू देवू नका अशी सूचना माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शेतक-यांना केली.

नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लहान मोठ्या पोटचा-याची प्रलंबित कामे व अडचणी सोडवण्यासाठी वैजापुरात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पाणी परिषदेचे आयोजन करणार असल्याचे चिकटगावकर म्हणाले. या परिषदेसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या घरी जावून आमंत्रित करण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले.   काही भागांना अजूनही जलसिंचनाचा लाभ मिळालेला नाही. चा-यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे शेतक-यांनी एकजुटीने पाठपुरावा करावा लागेल. या प्रश्नासाठी वेळप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ घेवून जाण्याची तयारी चिकटगावकरानी दर्शविली.

नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कालव्याव्दारे जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तसेच कोपरगाव तालुक्यातील सुमारे १ लाख 20 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ ३५ हजार हेक्टर क्षेत्रच सिंचनाखाली आलेले आहे. लाभक्षेत्रातील शेतक-यांकडून अलीकडील काळात पाण्याची मागणी होत नाही.