नवउद्योजकांना चालना देण्यासाठी मॅजिक आणि भारतीय युवा शक्ती ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

औरंगाबाद,१५ डिसेंबर /प्रतिनिधी:- नवउद्योजक युवक आणि युवतींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तथा सुरू असलेला व्यवसाय वाढविण्यासाठी आर्थिक सहाय्य व मार्गदर्शनसाठी मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक) आणि ‘भारतीय युवा शक्ती ट्रस्ट’ या संस्थेमध्ये मंगळवार दि. १४ डिसेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत प्रदेशातील तरुण नवउद्योजनकांना चालना देण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी दोन्ही संस्था एकत्र येऊन काम करणार असल्याचे मत भारतीय युवा शक्ती ट्रस्ट संस्थेच्या ऑपरेशन्स डायरेक्टर निताशा अग्रवाल आणि मॅजिकच्या संचालिका मैथिली तांबोळकर यांनी व्यक्त केले.

मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक) ही संस्था गेल्या ५ वर्षापासून भारतातील टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये नाविन्यपूर्ण आणि उद्योजकतेसाठी मजबूत संस्कृती आणि सर्वसमावेशक स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्याकरिता काम करत असल्याचे मॅजिकच्या संचालिका मैथिली तांबोळकर म्हणाल्या. १८ महिन्याच्या इन्क्युबेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत २८ स्टार्टअप्सना मॅजिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, १५० अधिक नवउद्योजकांना मेन्टॉरिंग करण्यात येत आहे. या सामंजस्य करारांतर्गत दोन्ही संस्था युवा उद्योजकता विकास प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये युवा नवउद्योजक निर्माण करण्यासाठी एकत्रित काम करणार आहे, याकरिता संयुक्तपणे जागरूकता अभियान राबविणे, इन्क्युबेशन प्रक्रियेतील नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे, त्या म्हणाल्या.

संस्थेबद्दल माहिती सांगताना निताशा अग्रवाल म्हणाल्या, १९९२ साली स्व. श्री. जे.आर. डी. टाटा यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची स्थापना झालेली भारतीय  युवा शक्ती ट्रस्ट (बीवायएसटी) ही  संस्था भारतीय तरुणांना त्यांच्या व्यावसायिक कल्पनांना फायदेशीर उपक्रमांमध्ये रुपांतरित करण्यासाठी, मार्गदर्शन आणि मार्गदर्शकाच्या पाठिंब्याने सक्षम राष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी काम करते.  औरंगाबाद आणि वर्धा येथील क्लस्टर्स बजाज ग्रुपच्या सीएसआर निधीच्या सहकार्यातून काम करीत असून, या क्लस्टर्समध्ये १००० पेक्षा अधिक नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्यामार्फत ५४ कोटी पेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला असल्याचे माहिती या प्रकल्पाचे प्रमुख सचिन जोशी यांनी दिली.

या सामंजस्य करार प्रसंगी बीवायएसटीचे प्रकल्प संचालक सचिन जोशी, गिरीश कडुसकर,सारंग चौथे, जिग्नेश शास्त्रकार आणि  मॅजिकचे इन्क्युबेशन  मॅनेजर क्षितिज चौधरी, योगेश तावडे, प्राची शिरोडकर उपस्थित होते. मॅजिक या संस्थेने आतापर्यंत देशपातळीवर 46 नामवंत संस्थांशी सामंजस्य करार केले आहे तसेच मागील 2 महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ-लोणेरे, देवगिरी इलेक्ट्रोनिक क्लस्टर-औरंगाबाद, एमआयटी महाविद्यालय – औरंगाबाद, लघु उद्योग भारती – महाराष्ट्र, आम्ही उद्योगिनी आणि देआसरा फौंऊडेशन, पुणे या संस्थांसोबत स्टार्टअप वाढीकरिता सामंजस्य करार केले आहे.