वैजापूर येथे झालेल्या प्रगतिशील साहित्य संमेलनात साहित्यिकांकडून चुकीची मांडणी

तहसीदारांकडे तक्रार ; आयोजकांकडून दिलगिरी

वैजापूर,१५ डिसेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद येथील प्रगतिशील लेखक संघातर्फे वैजापूर येथे नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात वक्त्यांनी परिसंवादमध्ये ‘सांस्कृतिक दहशत आणि लेखकाची भूमिका’ या विषयावर बोलताना चुकीची मांडणी केल्याची तक्रार राजकीय पक्ष व संघटनांशी संबंधित काही कार्यकर्त्यानी तहसीलदार राहुल गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. याप्रकरणी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना चौकशीसाठी पोलिसात बोलावण्यात आले असता त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते.

Displaying IMG-20211213-WA0044.jpg

रविवारी वैजापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक अस्लम मिर्झा होते तर प्रसिध्द लेखक निरंजन टकले हे उदघाटक म्हणून उपस्थित होते.भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी हे स्वागताध्यक्ष होते.प्रगतिशील लेखक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुधाकर शेंडगे व सरचिटणीस राकेश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Displaying IMG-20211211-WA0119.jpg

या साहित्य संमेलनात काही वक्त्यांनी फॅसिस्ट प्रणालीवर सडकून टीका होती.फॅसिझमच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोहाचे प्रमाणपत्र दिले जाते.देशात अनेक समस्या आहेत पण राजकीय पक्ष आपल्या भाकरी भाजण्यात व्यस्त आहेत.प्रतिगामी विचारणा तिलांजली देऊन लेखकांनी विज्ञानवादी विचारांची कास धरावी असे वक्त्यांनी म्हटले होते.या वक्तव्याबद्दल नीलेश कुलकर्णी, बळवंत जोशी, अनिल वाळुंज,भरत चन्ने,सुनील घोलप, सुरज शिंदे,ज्ञानेश्वर धुमाळ, दत्तात्रय जगताप आदींनी नाराजी व्यक्त करून साहित्य संमेलनात वक्त्यांनी विनायक सावरकर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची मांडणी केली अशी तक्रार तहसीलदार राहुल गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात साहित्य संमेलनाचे आयोजक ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, शमीम सौदागर, अहमद पठाण, डॉ.भीमराव वाघचौरे चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. आयोजकांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते.