महाविकास आघाडी सरकार पडेल असे वाटत नाही; राज ठाकरे यांचे मोठे विधान

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी प्रकरण- राज ठाकरे

औरंगाबाद,१४ डिसेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  देशासह राज्यातील विविध मुद्य्यांवर परखड प्रतिक्रिया व्यक्त केली.यावेळी कोरोना, महापालिका निवडणूक, ओबीसी आरक्षण, अनिल देशमुख-सचिन वाझे प्रकरण, पेपर फुटी अशा विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला.

राज्यात आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी  टोला लगावला आहे. 

 पेपर फुटीवरुन काय म्हणाले?
राज्यात पेपर फुटण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा पेपर फुटले आहेत.  पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही. सरकार म्हणून वचक नाही. तसंच पेपर फोडणारे फुटत नाहीत’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, कसं आहे की पेपर काही पहिल्यांदाच फुटलाय असं नाहीये. आतापर्यंत अनेकदा फुटला आहे पेपर. पण ज्याने पेपर फोडला ते फुटले जात नाहीत म्हणून पेपर सारखे फुटतात. ज्या प्रकारचा वचक शासन म्हणून असायला हवा तो राहत नाहीये.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभाग, म्हाडा यासारख्या विविध परीक्षांचे पेपर फुटले. यामुळे परीक्षार्थींमध्ये संतापाचं वातावरण आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपलं परखड मत मांडलं.

निवडणुकीसाठी बाहेर पडलो नाही

राज्यात बदल घडविण्यासाठी मी बाहेर पडलोय. विविध शहरांचे दौरे काढतोय. कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतोय. संघटनात्मक बांधणी सुरु आहे. संघटनेत बदल करतोय. संघटनात्मक काम सुरु आहे. नवीन जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. शहर संघटक नेमले गेले आहेत. अशा प्रकारच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बदल नक्की दिसेल”

“दोन वर्ष कोरोनामुळे कुठे जाता आलं नाही. कोरोना काळात मेळावा घेता आला नाही. त्यामुळे सध्या दौऱ्यांचं नियोजन आहे. नाशिकवरुन औरंगाबादला आलो. आता इथून पुण्याला जाईन”, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.आपल्या देशात निवडणुका येतच राहतात, त्यामुळे निवडुकीसाठी बाहेर पडलो असं नाही, कोरोनानंतर बाहेर पडलो आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबादची निवडणुक वर्षभर पुढे ढकलण्यात आली, आता फेब्रुवारीत तारखेनुसार निवडणुका होतील असं वाटत नाही, ज्या निवडणुका आहेत, त्या होतील की नाही याची खात्री नाहीए. त्यामुळेच ओबीसी आरक्षणाचं नवं प्रकरण सुरु केलं आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार पडेल असे  वाटत नाही- राज ठाकरे 

 राज्यातील सत्तेस्थापनेपासून महाविकास आघाडीचं सरकार पडेल, अशी चर्चा दररोज पाहायला मिळते. या मुद्द्यावरुन आणि इतर अन्य मुद्यांयवरुन मनसेप्रमुखांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

“राज्यात 3 पक्षांचे  सरकार पाहता, ते पडेल असे  वाटत नाही. तसेच मी महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर काढणार नाही”, मला वैयक्तिक कुठले कोणाचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत. घोटाळ्यांपेक्षा कोणच्या घरात मला डोकवायचं नाही. या सगळ्यामध्ये एकटे किरीट सोमय्या… ते पूर्वीपासून हेच करत आहेत, त्या सगळ्या गोष्टींची देखील उत्तरं सापडत नाहीत. महाराष्ट्राला भेडसावणारे जे प्रश्न होते, त्यासाठी म्हणून आपण शॅडो मंत्रिमंडळ निर्माण केलं मात्र त्याचवेळी नेमका लॉकडाउन लागला. या करोनाच्या काळात आमच्या अनेक लोकांनी प्रचंड काम केलं. परंतु ते प्रचंड का हे सोशल मीडियावरतीच राहीलं. ज्यांच्यापर्यंत आमचे लोक पोहचले त्यांना ही गोष्ट माहिती आहे. राजकारणी समाज बिघडवतात की समाज राजकारण्यांना बिघडवतो, असाच प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. रोजच्या रोज आपण प्रत्येक गोष्टीला शिव्या घालायच्या, या औंरंगाबाद महापालिकेत एवढे प्रश्न आहेत, पाणी, रस्त्यांसह अनेक प्रश्न असतील, पण निवडणुकीच्या वेळी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विसर पडत असेल, तर मला असं वाटतं की मग तुम्ही हेच भोगा. ”असे राज ठाकरे यांनी सांगितले.  

एसटीसारख्या जुन्या संस्थेला पुढे आणण्यासाठी राज ठाकरेंनी सांगितला उपाय!

एसटीसारख्या अत्यंत जुन्या आणि ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या संस्थेविषयी गांभीर्यानं विचार केला पाहिजे, मात्र याऐवजी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे दोघेही या प्रश्नात हात धुवून घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

याविषयी राज ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, एक लाख कर्मचारी एकदम सरकारच्या अंगावर आले तर काय करणार सरकार. चार चार महिने त्यांचे पगार होत नाहीत. ऐन दिवाळीत कर्चमाऱ्याच्या घरी पगार नाही झाले. बाकीच्यांचे पगार होतात. मग कर्मचाऱ्यांचे का नाहीत? 1960 सालातली ही एवढी जूनी संस्था आहे. तिच्यातला भ्रष्टाचार थांबला तर निश्चितच संस्था पुढे येईल. याविषयी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील बोललो आहे. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एक प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी नेमली पाहिजे. या कंपनीच्या देखरेखीखाली सर्व कारभार चालेल. कर्मचाऱ्यांनीही हा विषय जास्त जाणू नये. पण कुणीही यात समजून घ्यायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही हात धुवून घ्यायचे ठरवले आहे.”

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी प्रकरण- राज ठाकरे

पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, मी निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणता येणार नाही. निवडणुका येतच राहतात. संभाजी नगरची निवडणूक आणखी वर्षभर पुढे आहे. निदान सहा आठ महिने तरी इथली निवडणूक होणार नाही. त्यासाठीच तर ओबीसीचं प्रकरण सुरु केलंय. केंद्रानं मोजायचे की राज्याचे मोजायचे, यावरून मोजामोजी सुरु झाली आहे. मूळ मुद्द्याला कुणीही सामोरे जायला तयार नाही. त्यांची हिंमतच नाही सामोरे जाण्याची. म्हणून निवडणूका पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

वाझेंनी अँटालियाच्या खाली गाडी का ठेवली?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन वाझे, मुकेश अंबानींच्या घराखाली आढळलेली बाँब ठेवलेल्या गाडीबद्दलही त्यांनी विधान केलं.
“ सचिन वाझे हे सहा महिने तुरूंगात होते आणि जवळपास सात-साडेसात वर्षे ते त्या पदावर नव्हते, बडतर्फ होते. त्यानंतर त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला गेला. शिवसेनेच्या कार्याध्यक्षांच्या अतिशय जवळची व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जायचं.सचिन वाझे हा शिवसेनेचा माणूस आहे. मुकेश अंबानी हे उद्धव ठाकरेंचे मित्रं आहेत. मग वाझेंनी अँटालियाच्या खाली गाडी का ठेवली? हा एवढा साधासोपा प्रश्न आहे, असं सांगतानाच अँटालिया खाली गाडी ठेवली यावर फोकस न राहता, हे प्रकरण दुसऱ्याच मुद्द्यावर भरकटत जाईल, हे मी आधीच सांगितलं होतं, असे  ठाकरे यांनी  सांगितले .

पाच लाख उद्योजक देश सोडून गेले

पाच लाख उद्योजक देश सोडून गेल्याच्या बातमीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाच लाख व्यावसायिक जेव्हा देश सोडतात त्यावेळी नोकऱ्यांवर काय परिणाम होतो याची आपण चर्चा करत नाही. आर्यन खानची बातमी आपण 28 दिवस चालवतो, सुशांत सिंह प्रकरण, अँटालिया प्रकरण आपण लावून धरतात. पण हे पाच लाख उद्योजक कुठे गेले याचा आपल्याला शोध घ्यावा वाटत नाही. सर्व गोष्टींची अनिश्चितता असताना आपण कोणतेही विषय फिरवतो, असंही त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी  माध्यमांच्या कार्यशैलीवर देखील बोट ठेवले. 

राज ठाकरे म्हणाले, “आपण मूळ विषय ठेवतोय बाजूला आणि नको त्या सगळ्या विषयात सगळं प्रकरण फिरवलं जातं. तुम्हाला(माध्यमांना) जे फीड येत त्यानुसार तुम्ही छापता, परंतु शेवटी तुमचाही वापरच केला जातो या सगळ्या लोकांकडून आणि तुम्ही ती गोष्ट दाखवतात. उदाहरणार्थ आर्यन खान प्रकरण जवळपास २८ दिवस सुरू होतं. ज्या दिवशी बाहेर पडला त्यानंतर कोणी विचारलं देखील नाही, सध्या कसा आहे? तोपर्यंत जोरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सुशांतसिंग प्रकरण त्यानंतर अंबानीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला त्याचं काय झालं पुढे माहीत नाही…शेवटी तुमचाही कुठतरी वापर केला जातोय आणि त्यामधून या सर्व गोष्टी घडत आहेत. मूळ विषय राहतात बाजूला. 

“आज देशभरात असंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ज्यांच्याकडे मुलांचे शालेय शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. अनेकांचे उद्योग बरबाद झालेले आहेत. संपलेले आहेत. काय होतंय काय माहिती नाही, इतकी अनिश्चतता सगळ्या गोष्टींची असताना, आम्ही काय फिरवतो आहोत तर आम्ही असले विषय फिरवतोय. या अनिश्चततेला जबाबदार सगळेचजण आहेत. जसे राजकारणी आहेत तसे तुम्ही (माध्यमं) पण आहात.”