वैजापूर एस.टी. आगारातील महिला कर्मचारीसह 19 कर्मचाऱ्यांचे निलंबन ; कारवाईच्या धास्तीने एकाची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

वैजापूर ,३ डिसेंबर /प्रतिनिधी :- एस.टी.चे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू असून सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्याने निलंबित झालेल्या वैजापूर आगारातील एका कर्मचाऱ्याला कारवाईच्या धास्तीने आंदोलनस्थळीच भोवळ येऊन तो खाली कोसडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिपक दादाराव तुपे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून वैजापूर आगारात चालक पदावर ते कार्यरत आहेत. सध्या त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. निलंबनाची कारवाई झाल्यापासून ते अस्वस्थ होते.तुपे यांना कामावर हजर होण्यासाठी धमकावले जात होते त्यांची मनःस्थिती ठीक नसतांनाच आज परत सरकारकडून मेस्मा कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने त्याचा धसका तुपे यांनी घेतला व आंदोलनस्थळीच भोवळ येऊन खाली कोसळले.आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी तुपे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरकार आमचा किती अंत पाहणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्यात एस.टी.कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून एस.टी. कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.जोपर्यंत एस.टी.चे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. सरकारने एस. टी.कर्मचाऱ्यांविषयी सकारात्मक निर्णय न घेता त्यांच्यावर  निलंबन व सेवा समाप्तीची कारवाई सुरू केली आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात बोलतांना सांगितले.