मतदान केंद्राचे अधिकारी हेच निवडणूक यंत्रणेचा मुख्य कणा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

९४ व्या साहित्य संमेलनात मतदार जागृती मंचाचे उद्धाटन

नाशिक,३ डिसेंबर /प्रतिनिधी :- मतदान केंद्राचे अधिकारी हेच निवडणूक यंत्रणेचा मुख्य कणा असून, त्यांचे योगदान लक्षात घेवून त्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे. मतदान जागृती मंचाच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर जनजागृती होईल असा विश्वास मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
आज ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणूक यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित मतदार जागृती मंचाचे उद्धाटन मतदान केंद्र अधिकारी नितिन जोशी यांच्या हस्ते जाणीवपूर्वक करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितिन मुंडावरे, निवडणूक उपजिल्हा अधिकारी स्वाती थविल,तहसिलदार प्रशांत पाटील, मतदान केंद्र अधिकारी नितिन जोशी यांच्यासह सर्व मतदान केंद्र अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की, या संमेलनात प्रथमच अशा प्रकाराच्या मंचाचे आयोजन करण्यात आले असून, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होणे हाच महत्वाचा उद्देश आहे. या मंचाच्या माध्यमातून मतदानाबाबत माहिती असणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठे, शाळा- महाविद्यालये, गाव-परिसरांमध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तिकाही या दालनात उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने जागृती मंचास भेट द्यावी, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी केले आहे.

जनजागृती मंचामुळे नावनोंदणीची संधी होणार – राधाकृष्ण गमे
आपल्या देशाची लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही असुन या लोकशाहीचा मतदार यादी व निवडणूक प्रक्रिया हा महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेची माहिती जनजागृती मंचाच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहे. ज्या मतदारांना अद्यापही मतदार यादीत आपले नाव नोंदविले नाही, त्या नवमतदारांसाठी येथे मतदार नावनोंदणीची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी येथे मोठ्या संख्येने लेखक, साहित्यिक व रसिक उपस्थित झाले आहेत, या सर्वांसाठीही हा उपक्रम माहितीपूर्ण ठरेल अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिली आहे.

मतदार जागृती मंच हा अभिनव उपक्रम – सूरज मांढरे
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणूक यंत्रेणेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. निवडणुकीचे जे साहित्य आहे त्याचे साहित्य विश्वात एक वेगळे स्थान आहे. ते या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात येणार आहे. निवडणुकीचा मुख्य गाभा हा मतदार आहे. त्यांना मतदान प्रक्रियेची अधिक चांगल्या प्रकारे माहिती उपलब्ध करून दिल्यास लोकशाही सुदृढ होण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सांगितले आहे.

या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी ४ डिंसेंबर २०२१ रोजी लेखक,भाषा आणि लोकशाही या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या परिसंवादास उपस्थित राहून मतदान प्रक्रियेची माहिती करून घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी केले आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्याकरिता जनजागृती आवश्यक – कैलास जाधव
निवडणूक प्रक्रीयेत जास्तीत जास्त पारदर्शकता यावी साठी जन जागृती त्याचप्रमाणे निवडणुकीचे व मतनादाचे महत्व पटवून देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा विशेष उपक्रम जागृती मंचच्या माध्यमातून या संमेलनात राबविण्यात येत आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी असे उपक्रम नक्कीच दिशादर्शक ठरतील असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी केले आहे.