स्वछता सर्वेक्षणात वैजापूर नगरपालिकेची सुवर्ण कामगिरी ; दुसऱ्यांदा 5 कोटींचे बक्षीस

वैजापूर ,२८ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-स्वच्छ सर्वेक्षण 2020 – 2021 मध्ये घेण्यात आलेल्या कचरामुक्त शहरामध्ये वैजापूर शहराने सुवर्ण कामगिरी करत दुसऱ्यांदा 5 कोटींचे बक्षीस पटकावले आहे. आपल्या स्वछताविषयक नाविन्यपूर्ण कामातून वैजापूर नगरपालिकेने पश्चिम विभागातून 22 वा क्रमांक मिळवला आहे.औरंगाबाद विभागात फक्त दोन नगरपालिकांना मानांकन मिळाले असून त्यामध्ये वैजापूर नगरपालिकेचा समावेश आहे.


केंद्र सरकारच्या संकल्पनेतून स्वच्छ सर्वेक्षण – 2021 मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे.1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 याकाळात वैजापूर नगरपालिकेने शहरात स्वछताविषयक विविध उपक्रम राबविले असून त्यानुसार मूल्यांकन गृहीत धरून हे स्थान पटकावले आहे. याकामी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, मा.नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणी हरितपट्टे विकसित करून शहर सुशोभीकरण करण्यात आले. शहरात 11 ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्यात आले.

तसेच घनकचरा व्यवस्थापन, खत निर्मिती, प्लास्टिक बंदी, वायू प्रदूषण नियंत्रण, रोड साईड प्लांटेशन, जल पुनर्भरण जनजागृती, सोलर सिस्टीम वापर, माझी वसुंधरा अभियान आदी उपक्रम पालिकेतर्फे राबविण्यात आले.स्वछता सर्वेक्षण अभियानांतर्गत वैजापूर पालिकेने आपल्या स्वछताविषयक नाविन्यपूर्ण कामातून दुसऱ्यांदा 5 कोटींचे पारितोषिक पटकावले असून वैजापुरकरांचे हे यश असल्याचे नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी सांगितले.शहरवासीयांचे योगदान व  सहकार्यामुळे हे साध्य झाले अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी व्यक्त केली तर मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी शहरवासीयांचे अभिनंदन करून सर्वांचे सहकार्य व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची ही पावती असल्याचे सांगितले.