शासन दुग्ध उत्पादकांच्या खंबीरपणे पाठिशी – दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

विविध शेळी पालकांशी साधला संवाद; गोलवाडीतील सिडको क्रीडांगणास भेट

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्ध शाळेची पाहणी

औरंगाबाद,१७एप्रिल /प्रतिनिधी :  शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील कष्टकरी दुग्ध उत्पादकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे आहे. मागील वर्षाच्या मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे अधिक दुधाचा प्रश्न भेडसावू नये, यासाठी शासनाने दुग्ध संकलन सहकार क्षेत्रातूनच केले. सहकार क्षेत्राला यातून मदतच झाली, असे प्रतिपादन दुग्ध विकास, पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.

Displaying DSC_0905.JPG

गांधेली येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्धशाळा पाहणी दरम्यान श्री. केदार बोलत होते. यावेळी उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार कल्याण काळे आदींसह उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, संचालक कचरू डिके, राजेंद्र जैस्वाल, गोकुळसिंग राजपूत, राजेंद्र पाथ्रीकर, पुंडलिकराव काजे, दिलीप निरपळ, व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.बी.पाटील आदींची उपस्थिती होती.

मंत्री केदार म्हणाले, बाहेर राज्यातील काही दूध संस्थांनी राज्यातील दुधाची बाजारपेठ काबीज केली आहे. यावर सर्व लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. सध्याचा काळ कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकटकाळ आहे. या काळात सर्वांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मतही श्री. केदार यांनी व्यक्त केले.

सुरूवातीला श्री. केदार यांनी उत्पादक संघाच्या दुग्ध शाळेतील दुधापासून निर्मित विविध पदार्थांची पाहणी करून उत्पादन प्रक्रिया समजून घेतली. यामध्ये दुग्ध शाळेतील कंदी पेढा, लस्सी, तूप, आइसक्रीम, प्रयोगशाळा, पॅकिंग आदी विभागांनाही भेटी दिल्या. भेटी दरम्यान दुग्धशाळेतील स्वच्छता, नीटनेटकेपणा याबाबत समाधान व्यक्त करत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक श्री. केदार यांनी केले. यावेळी श्री. बागडे यांनी संपूर्ण दुग्ध शाळेतील प्रकियेबाबत श्री.केदार यांना सविस्तर माहिती दिली.

शेळी पालकांना भेटी
Displaying DSC_0832.JPG

मिल कॉर्नर येथीर अनिस अली या शेळी पालकाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष  शेळी पालन व्यवसायाची पाहणी केली. त्याचबरोबर हर्सुल येथील सत्तार रतन पटेल यांच्याकडे असलेल्या एकूण 50 शेळी, बोकुड यांची देखील पाहणी करून त्यांच्याशी या व्यवसायाच्या प्रगतीबाबत संवाद साधला. बेरीबाग येथील मजिद पटेल यांच्या घरात सुरू असलेल्या शेळी पालन व्यवसायाचीही श्री. केदार यांनी पाहणी केली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त प्रशांत चौधरी, शेळी पालन संस्थेच्या व्यवस्थापक डॉ. विराज बोरसे आदींसह जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गोलवाडीतील क्रीडांगणास भेट
Displaying DSC_0859.JPG

सिडकोच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या गोलवाडीतील क्रीडांगणाची पाहणी श्री. केदार यांनी केली. क्रीडांगणावर उपलब्ध सुविधा, पाण्याची व्यवस्था, शेतकऱ्यांचा थकित राह‍िलेला मोबदला आदींबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांशी श्री. चर्चा केली. या क्रीडांगणाबाबत लवकरच मुंबईत बैठक बोलावण्यात येईल, असेही यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. या क्रीडांगणाबाबत सिडकोचे प्रशासक भुजंग गायकवाड यांनी सविस्तर माहिती श्री. केदार यांना दिली. यावेळी क्रीडा उपसंचालक श्रीमती उर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे, क्रीडा शिक्षक सचिन पुरी आदींसह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.