अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्‍याशी लग्न करणाऱ्या तरुणाला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद,२१ जुलै /प्रतिनिधी :- अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्‍याशी शारिरिक संबंध ठेवून गर्भवती केल्यानंतर एका मंदीरात तिच्‍याशी लग्न करणाऱ्या तरुणाला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दि.२० रात्री बेड्या ठोकल्या. आनंद एकनाथ राऊत (२४, रा. ता. सोयगाव) असे आरोपीचे नाव असून त्‍याला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी गुरुवारी दि.२१ दिले.

या प्रकरणात १७ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली. त्‍यानूसार, १६ जुलै रोजी पीडितेला अज्ञात व्‍यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार फिर्यादीने सिल्लोड पोलिस ठाण्‍यात दिली होती. गुन्‍ह्याचा तपास सुरु असताना मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी आरोपी व पीडितेला जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेतले. पीडितेचा जबाब नोंदवला असता, आरोपी व पीडिता यांच्‍यात गेल्या चार वर्षांपासून शारिरिक संबंध होते. २३ एप्रिल रोजी पीडिता ही आरोपी सोबत जालना रोडवरील साई मंदीराजवळ रुम करुन राहीली होती. दुसर्या दिवशी ती पुन्‍हा आपल्या घरी गेली. यात पीडितेला गर्भधारणा झाली. पीडिता साडेतीन महिन्‍यांची गर्भवती असताना पीडितेने आरोपीला फोन करुन गर्भवती असल्याची माहिती देत पळून जात लग्न करण्‍याबाबत सांगितले. त्‍यानूसार, म्हसवा (जि. जळगाव) येथे पीडितेला पळवून नेत आरोपीने तिच्‍याशी लग्न केले. प्रकरणात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, अतिरिक्त लोकाभियोक्ता स‍तीष मुंडवाडकर यांनी दोघांचे डीएनए चे नमुने हस्‍तगत करयाचे आहेत. आरोपीची वैद्यकिय तपासणी करायची आहे. आरोपीचा मोबाइल सीडीआर तपासयाचा आहे. गुन्‍ह्यात आरोपीला आणखी कोणी मदत केली काय याचादेखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.