विजेच्या प्रश्नावर वीज वितरण कार्यालयासमोर भाजपची निदर्शने

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडल्यास तीव्र आंदोलन – डॉ.दिनेश परदेशी

वैजापूर ,१६नोव्हेंबर /प्रतिनिधी :- अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीकडून कृषीपंपाचा वीज पुरवठा तोडण्यात येत आहे.राज्यातील आघाडी सरकारचे हे धोरण शेतकरी विरोधी असून, शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडल्यास भाजपतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांनी सोमवारी वैजापूर येथील वीज वितरण कार्यालयासमोर भाजपतर्फे आयोजित निदर्शने कार्यक्रमात बोलताना दिला.

शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या वीज बिलाच्या  वसुलीसाठी कृषिपंपाचा वीजपुरवठा तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, याविरोधात वैजापूर तालुका भाजपतर्फे वीज वितरण कार्यालयासमोर  निदर्शने करण्यात आली. भाजपचे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले.रब्बी हंगामात नुकसानीची भरपाई होईल या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे.महावितरणकडून रात्री आठ तासांचा होत असलेला विद्युत पुरवठा पूर्ण क्षमतेने मिळत नाही याकडे दुर्लक्ष केले जात असून शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा मिळत नसतांनाही थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी कृषिपंपाचा वीज पुरवठा तोडण्यात येत आहे राज्य सरकारचे हे धोरण शेतकरीविरोधी आहे.सक्तीची वसुली थांबविण्यात न आल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा डॉ.दिनेश परदेशी यांनी यावेळी बोलतांना दिला.

या निदर्शने कार्यक्रमात जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप,माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे,कैलास पवार, नगरसेवक शैलेश चव्हाण,दिनेश राजपूत, सतीश शिंदे,राजेश गायकवाड,संतोष मिसाळ,केतन आव्हाळे,अनिल वाणी,महेश भालेराव,ज्ञानेश्वर इंगळे,प्रतापसिंग मेहेर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.