उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून देवगिरी महाविद्यालय परिसरातील सुविधांची प्रशंसा

औरंगाबाद,१३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि.12) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळास सदिच्छा भेट देऊन देवगिरी महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या भौतिक सोयी-सुविधांची पाहणी करून प्रशंसा केली.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ.सतीश चव्हाण यांनी उदय सामंत यांचे स्वागत करून संस्थेविषयी माहिती दिली. स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून 1958 साली सुरू झालेली ही शैक्षणिक संस्था आज खा.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदानाबरोबरच सामाजिक भान देखील जपण्याचे काम करीत आहे. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये संस्थेचा विस्तार असून 23 वरीष्ठ महाविद्यालय, 37 उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालये, 56 माध्यमिक शाळा, 14 प्राथमिक शाळा आदींसह संस्थेच्या आज एकूण 148 शाखा असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी उदय सामंत यांना सांगितले. यावेळी उदय सामंत यांनी देवगिरी महाविद्यालय परिसरातील मुलींसाठी उभारण्यात आलेले सुसज्ज वसतिगृह, नुतन इमारत, मैदान आदींची पाहणी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची प्रशंसा केली. याप्रसंगी आ.विक्रम काळे, आ.अंबादास दानवे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.डी.आर.माने, संस्थेचे उपाध्यक्ष शेख सलीम, कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर, कार्यकारिणी सदस्य ऍड.मोहनराव सावंत, डॉ.प्रकाश भांडवलदार, प्रदीप चव्हाण आदींची उपस्थिती होती.

‘बाटू’चे विभागीय केंद्र सुरू केल्याबद्दल उदय सामंत यांचा सत्कार

लोणेरे (जि.रायगड) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (बाटु) विभागीय केंद्र यावर्षी औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे. हे विभागीय केंद्र सुरू केल्याबद्दल ‘बाटू’शी संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्यावतीने देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाटुचे विभागीय केंद्र औरंगाबादला सुरू झाल्याने मराठवाड्यातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र तसेच प्रशासकीय कामकाजासाठी लोणेरेला जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आर्थिक खर्च व वेळेची बचत होणार आहे. हे विभागीय केंद्र सुरू केल्याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी उदय सामंत यांचे आभार व्यक्त करून बाटुच्या विभागीय केंद्रात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.उल्हास शिऊरकर, डॉ.उल्हास शिंदे, डॉ.आर.एस.पवार, डॉ.शांती बिराजदार आदींची उपस्थिती होती.