वैजापूर – कन्नड तालुक्यातील ‘एचयुडीएस’ च्या लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच डीपी मिळणार आ.बोरणारे व विदयार्थी सेनेचे सोनवणे यांच्या प्रयत्नाला यश

वैजापूर ,१३ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- गेल्या वर्षभरापासून महावितरणकडे जमा करण्यात आलेले वैजापूर-कन्नड तालुक्यातील एचयुडीएस लाभार्थी शेतकऱ्यांचे रोहित्र (डीपी) येत्या दोन-तीन दिवसांत उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन महावितरण चे अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे झालेल्या शुक्रवारी (ता.12) झालेल्या बैठकीत दिले.आ.रमेश पाटील बोरणारे व विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील सोनवणे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता.

शेतकऱ्यांना ‘एचयुडीएस’ या योजनेअंतर्गत मिळणारी वैयक्तिक डीपी (रोहित्र) नादुरुस्त झाल्यास किंवा जळाल्यास ती डीपी महावितरण कंपनी गुजरात येथील कंपनीकडे पाठवते.वैजापूर – कन्नड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जळालेल्या व नादुरुस्त झालेल्या डीपी महावितरणकडे जमा करूनही गेल्या वर्षभरापासून या डीपी शेतकऱ्यांना न मिळाल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे.  
यासंदर्भात वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे व कन्नड येथील शिवसेना कार्यकर्ते सुनील सोनवणे यांनी आमरण उपोषणाचा इशारा महावितरणला दिला होता.याची दखल घेऊन महावितरणचे अधिकाऱ्यांनी आ. बोरणारे व सोनवणे यांच्याबरोबर बैठक घेतली व वैजापूर – कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डीपी (रोहित्र) दोन-तीन दिवसांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.या बैठकीस महावितरण कंपनीचे सहाय्यक संचालक मंगेश गोंदवले,मुख्य अभियंता श्री.भुजंग, अभियंता श्री.खंदारे उपस्थित होते.