महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करावे -आमदार डॉ मनीषा कायंदे

खुलताबाद तालुक्यात महिला व बाल हक्क आणि कल्याण समितीचा दौरा 

खुलताबाद,३१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे म्हणजेच ख-या अर्थाने महिला सक्षमीकरण होणे असल्याचे मत व्यक्त करीत  आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी महिलांमध्ये सावित्रीची क्षमता असल्याचे सांगत त्यांना प्रोत्साहन देणा-या जोतिबांची गरज असल्याचे सांगितले. खुलताबाद नगरपरिषद व पंचायत समिती महिलांसाठी चांगले काम करत असून यापुढील काळात अधिक उत्तम काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधिमंडळ सचिवालयाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने खुलताबाद नगरपरिषद कार्यालयात भेट देऊन आढावा घेतला. महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीने विविध विभागाअंतर्गत येणाऱ्या योजना, प्रकल्प, कामे, केंद्र व राज्य शासन वा अन्य वित्तीय संस्था कडून आलेली तरतूद, निधी खर्च व कामांची सद्यस्थिती बाबत समिती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. 
यावेळी समितीच्या समिती सदस्य आमदार लता सोनवणे, मंजुळा गावित, डॉ.मनीषा कायंदे उपस्थित होत्या. महिला व बालकांच्या कल्याणासाठी नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजना, योजनेअंतर्गत असलेली कामे, केंद्र, राज्य शासन व अन्य वित्तीयसंस्था कडून असलेली आर्थिक तरतूद प्राप्त निधी, खर्च, लाभार्थी, तक्रारी, आक्षेप व कार्यवाहीच्या अनुषंगाने नगरपरिषदेच्या कामाचा आढावा महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने घेतला आहे.

तसेच खुलताबाद पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. गेल्या दोन दिवसांपासून  विधिमंडळ सचिवालयाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या नियोजित दौऱ्याची प्रशासकीयस्तरावर युद्ध पातळीवर तयारी सुरू होती. प्रशासनाच्या वतीने समितीला कुठे कोणते काम दाखवायचे याबाबत खलबते सुरू होते. समितीला दाखविण्याची ठिकाणे आणि दौरा निश्चित करण्यात आला होता. परंतु ऐनवेळी समितीने प्रशासनाने ठरविलेला नियोजित दौरा बदलून अचानक दौऱ्यात बदल केल्याने दिवसभर सकाळपासून अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच टेन्शनमध्ये होते. समितीच्या येण्याची निश्चित वेळेची खातरजमा होत नसल्यामुळे अनेकांचे एकमेकांना फोन सुरू होते. समिती आता कुठे आहे , या समितीमध्ये कोण कोण सदस्य आहे , पुढे कुठे जाणार आहेत याची दिवसभर फोनाफोनी सुरू होती. 
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास खुलताबाद नगर परिषदेला समितीने अचानकपणे भेट दिली. नगरपरिषद सभागृहात महिला व बालकल्याण समितीच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजना तसेच नगरपरिषदेत महिलांविषयक सोयीसुविधांचा आढावा घेतला.  विशाखा समितीच्या फलक दर्शनी भागाला लावून महिलांविषयक कामांसाठी नगर परिषदेच्या निधीतून पाच टक्के खर्च करण्याबाबत सुचविले. चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचे महिलांसाठी काय काय योजना राबविण्यात येतात याविषयी माहिती घेतली. यावेळी नगराध्यक्ष  एस एम कमर व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लक्ष्मी लाळे ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी समितीच्या सदस्यांचे स्वागत केले. मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांनी नगर परिषदे मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा सादर केला.
 यावेळी खुलताबाद पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाला समिती सदस्यांनी भेट दिली. यावेळी आमदारांनी बचतगटांच्या महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी केली.  
यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख , गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर , मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी , पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे , विस्तार अधिकारी एच बी कहाटे , तालुका अभियान व्यवस्थापक सुनिल बार्बाइले , तालुका व्यवस्थापक ( क्षमता बांधणी आणि संस्था बांधणी ) सुप्रिया साळुंके , देविदास चौधरी, प्रभाग समनव्यक  सुषमा पघल, प्रभाग समनव्यक   परमेश्वर शेंगेपल्लू , राणी लक्ष्मीबाई महिला स्वयं सहायता समूहाच्या  रत्नाताई पुसे , प्रगती उद्योगच्या  आरती घाडगे , कोप शॉपच्या संचालिका  सुमन क्षीरसागर आदी उपस्थित होते.