पेस कौशल्य प्रशिक्षण केंद्राकडून १०० विद्यार्थ्यांना मिळाली नोकरीची संधी

 आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण

खुलताबाद,३१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-नंद्राबाद येथील पेस कौशल्य प्रशिक्षण केंद्र  हॉस्पिटॅलिटी, प्लम्बिंग, इलेक्ट्रिकल्स, हेल्थकेअर, ब्युटीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १०० युवक युवतींना  नोकरीचे नियुक्ती पत्र व प्रमाणपत्र आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

विभागप्रमुख  दामोदर व एच लर्निंग प्रमुख अमोल मोघे यांनी प्रथम संस्थेच्या माध्यमातून विविध कार्याची ओळख करून दिली.
यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मार्फत सुरु असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती जाणून घेतली. प्रथम संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. 
युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, चिकाटी, कर्तव्याची जाणीव, आणि आलेल्या परिस्थितीवर मात करणे आवश्यक आहे. तसेच आपली योग्य दिनचर्या व घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्याआधारे आपण यशाला सहज गवसणी घालू शकतो. यावेळी आमदार बंब यांनी गंगापूर खुलताबाद मतदार संघामध्ये भविष्यात राबवण्यात येणाऱ्या आपल्या संकल्पनांची माहिती दिली.
खुलताबाद येथील पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी आपण आपल्या ध्येयावर ठाम असल्यास कितीही कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा योग्य नियोजनामुळे आपण ध्येय सहज प्राप्त करू शकतो, असे सांगितले. यावेळी  माजी सभापती भीमराव खंडागळे, पंचायत समितीचे सभापती  गणेश अधाने, उपसभापती युवराज ठेंगडे, तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, माजी सभापती दिनेश अंभोरे, ज्ञानेश्वर नलावडे, प्रकाश चव्हाण ,  प्रभाकर शिंदे,  संदीप निकम, अमोल गवळी, सतीश दांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी जाधव यांनी केले तर शशिकांत दुशिंग यांनी आभार मानले.