वैजापूर नगरपालिकेत सदस्य संख्या 15 टक्क्यांनी वाढणार

वैजापूर ,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-नगरपालिका निवडणुकीत प्रभाग पध्दत लागू केल्यानंतर आता लोकसंख्येनुसार नगरसेवकांच्या सदस्य संख्येत 15 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयामुळे वैजापूर नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे नगरपालिकांमध्ये  लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित करण्यात येते.त्यानुसार निवडणूक आयोग त्या शहरासाठी प्रभाग रचना करून त्याप्रमाणे निवडणूक घेतली जाते. सध्या 2011 च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये कमीत कमी 16 ते जास्तीत जास्त 65 सदस्य संख्या आहे.कोरोनामुळे राज्यात अद्याप जनगणना होऊ शकलेली नाही.पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान काही नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत.

2011 च्या लोकसंख्येनुसार निवडणुका झाल्यास लोकांवर अन्याय होईल अशी भूमिका घेत नगरपालिकांमधील सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. शहराची लोकसंख्या गेल्या दहा वर्षात कितीने वाढली आहे याची ठोस आकडेवारी उपलब्ध नसली तरी गेल्या दहा वर्षात लोकसंख्या 15 टक्के वाढ झाल्याचा अंदाज घेऊन प्रत्येक नगरपालिकेत सदस्यांची संख्या 15 टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे.अध्यादेशाच्या माध्यमातून नगरपालिका कायद्यात सुधारणा करून ही सदस्यवाढ करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. वैजापूर शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 45 हजाराच्या जवळपास होती.मात्र, गेल्या दहा वर्षात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे आताच्या लोकसंख्येनुसार वैजापूर पालिका सदस्यांची किमान संख्या 25 तर जास्तीत जास्त 37 पेक्षा अधिक नसेल.सध्या वैजापूर पालिकेतील सदस्यांची संख्या 23 आहे