जनतेच्या प्रश्नावर वेळप्रसंगी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला पाहिजे-जयंत पाटील

वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार संवाद  मेळावा

वैजापूर ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- शरद पवारांसारखे देशव्यापी आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आपल्या पक्षाला लाभले असून,तळागाळातील कार्यकर्ता आणि सामान्य माणूस ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ताकद आहे, त्यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आपला कार्यकर्ता पोहोचला पाहिजे, जनतेच्या प्रश्नावर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरला पाहिजे.कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे ध्येय धोरण व संघटना सक्षम करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या तालुक्यात एक क्रमांकाचा पक्ष कसा होईल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वैजापूर येथे पक्षाच्या परिवार सवांद मेळाव्यात केले. 

May be an image of 10 people, people standing and text

शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजित या मेळाव्यास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस  च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, सुलक्षणा सलगर, आ.सतीश चव्हाण, विक्रम काळे, मा.आ.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत पक्ष संघटना बळकटीसाठी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गंगापूर – वैजापूर हा मतदारसंघ पक्षासाठी महत्वाचा आहे. यअसाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवे, असे आवाहन पाटील यांनी सभेला केले. तसेच २०२४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्यासाठी पाटील यांनी इथल्या मारुतीरायाला साकडे घातले.दरम्यान वैजापूरमध्ये भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या पाठीशी राहिलात तर नक्कीच वैजापूर येथे पक्षाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला पक्ष संघटनेकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून त्यासाठीची तयारी आतापासूनच करायला हवी, असे आवाहन पाटील यांनी वैजापूरमध्ये केले.

भाजप हा बोल घेवड्यांचा पक्ष असून त्यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नसल्याची टीका राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी बोलतांना केली.पक्षाच्या नवनियुक्त  पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र यावेळी देण्यात आले. मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, विशाल शेळके, प्रशांत शिंदे,सम्राट राजपूत, चंद्रशेखर साखरे यांच्यासह कार्यकर्तेक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांची यावेळी अनुपस्थिती जाणवत होती