गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान! १ आणि ५ डिसेंबरला मतदान; ८ डिसेंबरला मतमोजणी

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत गुजरात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. तर हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये यंदा ३ लाख २४ हजार नवे मतदार आहेत. तसेच राज्यात एकूण ५१ हजार ७८२ मतदान केंद्र सज्ज असणार आहेत. यासाठी कडेकोड सुरक्षा व्यवस्था देखील असणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा असतील. पिण्याचे पाणी, वेटिंग रुम, टॉयलेट, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुविधा यांचा समावेश असणार आहे. तसेच राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट देखील होणार आहे.

निवडणूक आयोगाकडून यावेळी सोशल मीडिया टीम देखील नियुक्त करण्यात येणार आहेत. ज्या फेक न्यूजवर लक्ष ठेवणार आहेत. फेक न्यूजचा प्रसार करणाऱ्यांवर तातडीनं जी काही कठोर कारवाई असेल ती केली जाणार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. तसंच फेक न्यूज फॉरवर्ड करू नका आवाहन देखील यावेळी राजीव कुमार यांनी मतदारांना केलं आहे.

एकाच मतदारासाठी बनवणार मतदान केंद्र

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, गीर जंगलातील बनेज गावामध्ये राहणारे भरतदास दर्शनदास यांच्यासाठी एक मतदान केंद्र बनवले जाणार आहे. या एकाच मतदारासाठी १५ जणांचे एक पथक तिकडे जाणार आहे.

असा आहे गुजरातचा निवडणूक कार्यक्रम

पहिला टप्पा

निवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- ५ नोव्हेंबर २०२२
अर्ज दाखल करण्याची मुदत- १४ नोव्हेंबर २०२२
अर्ज छाननी प्रक्रिया- १५ नोव्हेंबर २०२२
उमेदवारी माघार घेण्याची मुदत- १७ नोव्हेंबर २०२२
मतदानाची तारीख- १ डिसेंबर २०२२

दुसरा टप्पा

निवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- १० नोव्हेंबर २०२२
अर्ज दाखल करण्याची मुदत- १७ नोव्हेंबर २०२२
अर्ज छाननी प्रक्रिया- १८ नोव्हेंबर २०२२
उमेदवारी माघार घेण्याची मुदत- २१ नोव्हेंबर २०२२
मतदानाची तारीख- ५ डिसेंबर २०२२

मतमोजणी- ८ डिसेंबर २०२२