वैजापूर तालुक्यातील आपद्ग्रस्तांना 32 लाखांची तातडीची मदत, पुरात वाहून गेलेल्या महिलेच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये

वैजापूर ,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- अतिवृष्टी व धरणांतून पाणी सोडल्यामुळे वैजापूर तालुक्यातील शिवना, ढेकू व बोर नद्यांना पूर येऊन  गारज व लासुरगांव मंडळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याभागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, नैसर्गिक आपत्ती म्हणून या मंडळातील आपद्ग्रस्तांना 32 लाख 28 हजार रुपयांची मदत तातडीने वाटप करण्यात आली आहे.

Displaying IMG-20211002-WA0229.jpg

तालुक्यात गेल्या आठवड्यात 27 व 28 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होऊन धरणांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे ढेकू, शिवना, नारंगी व बोर या नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने शेती पिकांसह मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील गारज व लासुरगांव या महसूलमंडळातील लासुरगांव,सोनवाडी,भायगांव,उंदिरवाडी, राहेगांव,राजुरा,बाभूळगांव खुर्द,बाभूळगांव बु., शिवगांव,शिऊर,हडसपिंपळगांव,बळेगांव, सावखेड खंडाळा,पोखरी, भिवंगाव या 16 गावांमधील 567 कुटुंबातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.

Displaying IMG-20210928-WA0189.jpg

या कुटुंबियांना प्रतिकुटुंब पांच हजार रुपये याप्रमाणे एकूण 28 लाख 35 हजार रुपयांची सानुग्रह मदत प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.नदीच्या पुरात वाहून गेलेल्या भिंगी येथील मंगलबाई पठारे (वय 50 वर्ष) या महिलेच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे.आपद्ग्रस्तांच्या बँक खात्यावर  ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे.अशी माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली.