औरंगाबाद परिमंडलात २०२९ शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीजजोडण्या महा कृषी ऊर्जा अभियानाचे फलित

औरंगाबाद,८ डिसेंबर /प्रतिनिधी:-कृषिपंप वीजग्राहक शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महा कृषी ऊर्जा अभियानात थकीत वीजबिलातून वसूल झालेल्या ६६ टक्के कृषी आकस्मिक निधीचा वापर करत औरंगाबाद परिमंडलात २०२९ शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर खर्च करण्यात येत आहे. या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन आपल्या गावातील विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी कृषिपंपाच्या थकबाकीसह चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
    राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या महा कृषी ऊर्जा अभियानात औरंगाबाद परिमंडलात आजपर्यंत कृषिपंपांची ४१ कोटी ४७ लाख रुपयांची वीजबिले भरून शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. ग्राहक मेळावे, बैठका, दवंडीद्वारे आवाहन अशा विविध उपक्रमाद्वारे कृषिपंपधारक शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीमुक्त अभियानात सहभागी करून घेण्यात आले आहे.  महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत औरंगाबाद परिमंडलातील ३ लाख ५५ हजार ८४४ शेतकऱ्यांकडे ४ हजार ४६२ कोटी ३० लाख रुपयांची मूळ थकबाकी होती.  त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणकडून निर्लेखन व वीजबिल दुरुस्ती समायोजन करून शेतकऱ्यांकडे २६४२.६७ कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १३२१ कोटी ३३ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १३२१ कोटी ३३ लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत. 

महाकृषी ऊर्जा अभियानात सहभागी झालेल्या औरंगाबाद परिमंडलातील ६८ हजार ४३१ शेतकऱ्यांना २६१ कोटी ७५ लाख रुपयांची सूट मिळालेली आहे.    जमा झालेल्या वीजबिलातून ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायतीअंतर्गत व ३३ टक्के रक्कम ही जिल्हांतर्गत कृषी आकस्मिक निधी म्हणून वापरली जात आहे.

या निधीतून नवीन वीजजोडण्या देण्यासोबतच विजेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्याची कामे केली जात आहेत. यानिधीद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील १२२७ शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे तर जालना जिल्ह्यातील ८०२ शेतकऱ्यांना वीजजोडणी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी महा कृषी ऊर्जा अभियान ही थकबाकीमुक्तीची सुवर्णसंधी आहे. या योजनेत कृषिपंपपंपधारकांनी सहभागी होत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील विद्युत यंत्रणेचा विकास साधावा. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप थकबाकी भरली नाही त्यांनी पुढे येऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन औरंगाबाद परिमंडलाच्या वतीने करण्यात येत आहे.