मतदारांना मतदानाच्या हक्काबाबत जागृत करावे-श्रीकांत देशपांडे

औरंगाबाद,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्या, कारखाने,  शासनाचे शासकीय, निमशासकीय कार्यालये मतदार, नवमतदारांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत मोठ्याप्रमाणात जागृती करावी. यासाठी व्होटर्स ॲवरनेस फोरम स्थापन करून मतदान जनजागृतीत भर घालण्याच्या सूचना केल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उद्योजक, उद्योजक संघटनांचे पदाधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, प्रत्येक मत अमुल्य आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता उद्योजक, कंपन्यांनी घेणे आवश्यक आहे. मतदान करण्याबाबत माहिती नसणे, उदासिनता असणे, मतदार यादीत नाव नसल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे उद्योजकांनी कंपनीतील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या हक्काबाबत जागृत करावे.  त्याचबरोबर तृतीयपंथी, दिव्यांग आदींचाही मतदार यादीमध्ये अधिकाधिक समावेश होण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदानाबाबत जागरूक करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. नोंदणी प्रक्रिया, नोंदणी कशी करावे, याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे. मतदानाची महती सांगण्यासाठी परिसंवाद, वक्तृत्‌ आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. चुनाव पाठशाला सारखा उपक्रम राबविण्यात यावा. कंपन्यांमध्ये जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचनाही श्री. देशपांडे यांनी केल्या.

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनीही मतदारांची अधिकाधिक नोंदणी करणे आवश्यक आहे, असे यावेळी सांगत नवीन कल्पना असल्यास सूचविण्याचे आवाहनही उद्योजक, कंपन्यांना केले.