संतपीठाला विद्यापीठाने समाजभिमूख करावे– पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- संतपीठाच्या माध्यमातून समाजात विविध संप्रद्रायातील संस्कृती आणि संताची  शिकवण समाजापर्यंत पोहचवून सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व घडवण्याबरोबरच रोजगार निर्मित्तीसाठी आवश्यक असलेल्या विविध अभ्यासक्रम सुरु करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. संतपीठाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठ हे समाजाभिमूख  करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत केले.

Displaying _DSC0384.JPG

           याबैठकीस आमदार अंबादास दानवे, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव जयश्री सोमवंशी, डॉ.प्रवीण वक्ते, पर्यटन विभागाचे विभागप्रमुख डॉ.राजेश रगडे, नाट्यशास्त्र विभागाचे डॉ.जयंत शेवतेकर यांची उपस्थिती होती.

            मंत्री देसाई म्हणाले की, संतपीठ स्थापन होण्याचा ध्यास संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा होता. तो पूर्ण होत असल्याचा आनंद होत असून संतपीठात शिकवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा उपयोग रोजगार आणि शांतता व सौहार्दपूर्ण समाजजीवन घडवण्यात महत्त्वाचा वाटा असणार आहे. संतपीठाला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्धतेसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तसेच औरंगाबाद मधील प्राचीन खंडोबा मंदिराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याबाबतही सुरु असलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार याचे सुशोभिकरण आणि विविध उपक्रमांचे संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून देसाई यांनी आढावा घेतला. राज्य शासनाच्या प्राचीन मंदिर संवर्धन समितीमार्फत खंडोबा मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात पर्यटनदृष्ट्या सुविधा उपलब्ध करुन शहराच्या  सांस्कृतिक वारसा जतन करण्यात येत आहे. यावेळी देसाई म्हणाले की, वारसा जतन आणि संवर्धनामधून जिल्ह्याला टूरिस्ट सर्कीट म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करित आहे. याबाबत मंत्रालय स्तरावर आढावा घेण्याचे काम सुरु आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना केल्या.

            या बैठकीत सुरुवातीला संतपीठाच्या कार्याचा आढावा डॉ.प्रवीण वक्ते यांनी सादर केला. तसेच खंडोबा मंदीर आणि विद्यापीठ  प्रवेशद्वार  यांचे आढावाचे सादरीकरण डॉ.रगडे यांनी केले.