नक्षत्रवाडी येथील वक्फ मालमत्ता वक्फ मंडळाने घेतली ताब्यात

इतिहासात पहिल्यांदाच वक्फ मंडळाचे सदस्य प्रत्यक्ष मोक्यावर, गुन्हे दाखल होणार

औरंगाबाद, ८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाचे सर्व सदस्य व अधिकाऱ्यांनी आज औरंगाबाद मधील गट न. 65 नक्षत्रवाडी येथील मस्जिद इनामी

जमिनीचे सर्वेक्षण करून ताब्यात घेतली. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वक्फ जागेवर अतिक्रमण करून बिल्डिंग बांधणाऱ्या व जागा विकणाऱ्या विरूद्ध सुध्दा अशाच प्रकारची कार्यवाही करून गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती वक्फ महामंडळाने दिली आहे.
सदरील वक्फ मालमत्तेवर औरंगाबादेतील काही प्रतिष्ठीत व्यक्ती, राजकीय पुढारी हे अतिक्रमण करून अनाधिकृत प्लॉटिंग विकत असल्याची माहिती मिळाली होती त्याअनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाने धडक कार्यवाही करत जमिनीवर वक्फ मालमत्ता असल्याचे माहिती फलक लावले. मालमत्ता विकणाऱ्या विरूद्ध कायदेशीर कार्यवाही होणार आहे तसेच ज्यांनी प्लॉट घेतले त्यांना सुध्दा लवकरच नोटीस मिळणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी सांगितले.


माहिती फलकावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने “मौजे नक्षत्रवाडी ता.जिल्हा औरंगाबाद गट न. 65 ही मस्जिद इनामिय जमीन वक्फ मंडळाची असून सदरील जमिनीस कोणीही खरेदी विक्री करू नये, अतिक्रमण करून नये असे केल्यास संबंधिताच्या विरुद्ध वक्फ अधिनियम 1995 चे कलम 51, 52 व 52 अ नुसार आजामिनपात्र फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात येईल व अतिक्रमण निष्कासित करण्यात येईल” असे प्रदर्शित करण्यात आले.


यावेळी महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाचे सदस्य खासदार इम्तियाज जलील, खासदार फौजिया खान, आमदार वजाहात मिर्झा, खालेद बाबू कुरेशी, ए.यु. पठाण, समीर काझी, मुदास्सिर लांबे, शेख हसनैन शाकर, मौलाना हाफीज अथर अली यांच्यासह मंडळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिस शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारुक पठाण व इतर संबंधित वक्फ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.