आगामी विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र? शरद पवारांचे सूचक विधान

मुंबई ,१० जून /प्रतिनिधी:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यावर शरद पवार यांनी देखील भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतिहासाचा दाखला देत या भेटीवर  भाष्य करताना महाविकास आघाडी सरकार 5 टिकेल.हे सरकार केवळ पाच वर्ष टिकणारच नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र येऊन जोमानं काम करेल असा विश्वास व्य़क्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन कार्यक्रमात ते बोलत होते. 

Image

‘तीन वेगवेगळ्या विचारांची पक्ष एकत्र आली, आम्ही कधी शिवसेनेसोबत काम केलं नव्हतं. पण, शिवसेना हा विश्वास ठेवणारा पक्ष आहे, त्यांच्यामुळे काँग्रेस सुद्धासोबत आली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला स्विकारलं, देशानं स्विकारलं. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम असून पाच वर्ष टिकेल आणि आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करेल, असं शरद पवार यांनी म्हटलं.

शिवसेना विश्वास ठेवणारा पक्ष

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, असं माझ्या वाचण्यात आलं. त्यानंतर अनेक जण तर्कवितर्क लढवत आहे. पण, शिवसेनेसोबत आपण काम कधी केलं नाही. महाराष्ट्र शिवसेनेला खूप वर्षांपासून पाहत आहे. माझा पूर्वीचा अनुभवानुसार, हा विश्वासाचा पक्ष आहे’ असं शरद पवार म्हणाले.

इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो बाळासाहेबांनी पाळला.

यावेळी शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत किस्सा सांगितला ‘ जेव्हा जनता पक्षाचे सरकार आले होते. तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना हा पक्ष पुढे आला होता. तो नुसता पुढे आला नाहीतर धोरणात्मक निर्णय घेत इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी एक सुद्धा उमेदवार उभा केला नव्हता. विधानसभा निवडणुकीत एखादा पक्ष उमेदवारच उभा करणार नाही, यापेक्षा मोठा निर्णय काय असू शकतो. त्याची चिंता बाळासाहेबांनी कधी केला नाही. इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो बाळासाहेबांनी पाळला. हा इतिहास काही विसरता येणार नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेत असतील तर शिवसेनेनं त्या कालखंडात भूमिका घेतली होती ते पाहता, काही जण काहीही आखाडे बांधत असतील तर ते वेगळ्या वळणाचे आहे, हे सरकार पाच वर्ष टिकेल’, असं पवारांनी ठणकावून सांगितलं.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
  •  
  • –  राजकारणात सतत नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचं काम केलं पाहिजे
  • नव्या चेहऱ्यांना तरुणांना संधी दिली पाहिजे
  • –  लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. त्याबरोबर नेतृत्वाची फळी घडवण्याचं काम होतंय ते माझ्यासाठी महत्त्वाचं
  • – ठाकरे सरकार आज सरकार चांगले काम करत आहे.
  • – हे सरकार पाच वर्ष निश्चित काम करेल
  • – केवळ पाच वर्ष नाही आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्र काम करतील 
  • – हे सरकार टिकेल की नाही याची चर्चा होत होती आज ती होत नाही

‘तुमच्या मागे जो सामान्य माणूस आहे. त्याच्याशी बांधिलकी जपा. आपले अनेक सहकारी सोडून गेले, पण तरीही राष्ट्रवादीने आपली सत्ता स्थापन केली आणि राज्यात नेतृत्व करण्याची फळी निर्माण केली. राजकारण सांभाळण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. सत्ताही महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताही महत्त्वाची आहे, असंही पवार म्हणाले.

Image

यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना खा. प्रफुल पटेल म्हणाले की, पक्षाची स्थापना जेव्हा झाली, तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केली होती की हा पक्ष किती दिवस टिकेल. मात्र आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात आपण पक्षाच्या स्थापनेनंतर २२ वर्षांचा यशस्वी प्रवास केला आहे, इतकेच नाही तर १७ वर्षे आपण राज्यात सत्तेत राहिलो आहोत. २०१९ मध्ये पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवत राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्याची किमया केल्याचे खा. प्रफुल पटेल म्हणाले. देशात अनेक राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या. यात चित्र पाहिले तर देशाच्या राजकारणात निश्चितच उलथापालथ होत आहे. या परिस्थितीत भविष्यात देशाच्या व्यापक व्यासपीठावर पवार साहेबांची मोठी गरज लागणार आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे राजकीय वजन वाढवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता आणली. त्यांच्या वेगळ्या पक्षाची सुरुवात त्यांच्यासह अजून केवळ तीन आमदारांनी झाली होती. पण त्यांनी कठोर संघर्ष करून त्यांच्या पक्षाला आज इतके पुढे आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर स्थापनेपासूनच सत्तेत राहिला. आपले नेते हे देशातील सर्वात अनुभवी नेते आहे. त्यामुळे त्यांना ताकद देऊन त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.राज्यातील महाविकास आघाडीचे कर्ताधर्ताही पवार साहेब आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक संकटांचा मुकाबला आपण यशस्वीपणे केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष संघटनेला संघटनेला बांधून ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे आपल्या सर्वोच्च नेत्याच्या पाठीमागे संपूर्ण ताकद उभा करून पक्ष बळकटीसाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे, असे आवाहन खा. प्रफुल पटेल यांनी केले.

संकटे कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

Image

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. यानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांना संबोधित केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांचे त्यांच्या पक्ष उभारणीसाठीच्या मेहनतीबद्दल आणि त्यागाबद्दल अभिनंदन केले आणि आभार मानले. कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा कणा असतो, त्यांच्याशिवाय कोणताही पक्ष काम करु शकत नाही, असे अजितदादा म्हणाले. ज्याप्रकारे महाराष्ट्र राज्याची स्थापना संघर्षातून झाली तशाच प्रकारे संघर्षातून राष्ट्रवादीचीही स्थापना झाली. २०१४ चा अपवाद वगळला तर राज्यातील लोकांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला विश्वास व्यक्त केलेला आहे. जनतेच्या प्रेमाच्या बळावर पक्षाने राज्यातील प्रत्येकाच्या मनामनात जागा मिळवली. सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाटचाल करत आहे, व पुढेही अशीच वाटचाल सुरु राहील, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

Image

ते पुढे म्हणाले की, हृद्यात राष्ट्र आणि नजरेसमोर महाराष्ट्र असा विचार घेऊन पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. प्रत्येक क्षेत्रातल्या जाणकार, अभ्यासू लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची वाटचाल सुरु झाली होती. त्या सर्वांनी आपापल्या परीने मागच्या २२ वर्षात योगदान दिले. संघर्षाशी आणि आव्हानांशी लढणे हा राष्ट्रवादीचा गुणधर्म आहे. कोरोना काळ असो की वादळ वा अतिवृष्टीचे संकट राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक ठिकाणी संघर्ष केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कोरोना काळात लोकांना मदत देण्याची भूमिका घेतली. आपल्याला पुढचे काही दिवस अशी मदत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडून घेतले जाणारे लोककल्याणाचे निर्णय तळागाळात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. भाजपच्या काळात देशात दमनशाहीचा कारभार सुरु असून लोकशाही मोडून काढण्याचा प्रकार सुरु आहे. पत्रकारांवर निरनिराळे निर्बंध आणून त्यांना सरकारच्या बाजूनेच बोलायला भाग पाडले जात आहे. आपण सर्वांनी लोकशाही अबाधित राखण्यासाठी काम करायचे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्नांवर देखील आपल्याला काम करायचे आहे. मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी आपली भूमिका आहे. आज राज्यात राष्ट्रवादीचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जनतेवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय आम्ही होऊ देणार नाही. संकटे कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही. संकटावर मात करुन हा महाराष्ट्र सर्वांच्या पुढेच राहील, अशी ग्वाही त्यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिली.

Image

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “ खा. शरद पवार साहेबांच्या राजकीय आयुष्यातील ही २२ वर्षे फार महत्त्वाची आहेत. राजकीय आयुष्य जगताना ते स्वाभिमानाने व सर्वधर्मसमभावाने कसे जगावे, हे पवार साहेबांनी आपल्याला शिकवले. दिल्लीच्या तख़्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकला नाही. १९९९ पासून आपलं पक्ष सत्तेत आला. पुढील १५ वर्षे पक्ष सत्तेत राहिला. आम्हा सगळ्यांनाच सुरुवातीपासून पक्षाच्यावतीने पवार साहेबांनी मोठी जबाबदारी दिली. आज मागे वळून पाहताना पवार साहेबांनी घालून दिलेल्या आदर्शातून पक्ष पुढे आला असल्याचे स्पष्ट होते. देशाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठी लाट देशात आली. आपल्या पक्षाचे अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. पण पवार साहेबांनी हिंमत हारली नाही. २०१९ साली साहेबांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्य सरकारमधील पक्षाच्या सर्व नेत्यांनी आपल्या जबाबदारीचे भान राखून जनतेच्या हिताचे काम केले आहे. राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.

Image

कोरोना काळात राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आर्थिक घडी योग्यरित्या घालण्याचे काम अजितदादांनी केले. पक्षाच्या फ्रंटल सेलच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जागर रोजगाराचा हे नवीन ॲप होतकरू युवकांसाठी सुरु करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. युवती काँग्रेसच्या माध्यमातून दिव्यांग युवतींना मदतीचा हात दिला गेलाय. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने पक्ष घरोघरी नेण्याचे काम करण्यात आले. पक्ष बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात यापुढेही अधिक जोमाने काम केले जाईल. पुढील काळात पक्षाच्या वतीने आरोग्य दिंडी हाती घेतली जाणार आहे. यातून लोकांमध्ये कोरोना, म्युकर मायकोसिस, लसीकरणसारख्या विषयांची जागृती करण्याचे काम होईल. कोरोना संक्रमण कमी झाल्यावर पक्ष बळकटीसाठी महाराष्ट्र दौरा आखला जाईल. यातून कार्यकर्त्यांशी थेट बोलण्याची संधी मिळेल. तसेच आजपासून पक्षाच्या सभासद नोंदणीचे काम सुरू करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीसोबत पारंपरिक पत्रकाच्या पद्धतीने सर्वांना नोंदणी करता येईल. आजपर्यंत आपण सर्वांनी पक्षाला साथ दिली आहे. यापुढेही पक्ष वाढविण्याचे काम आपण करू.”