जॉब देणाऱ्या फेक कंपन्यांपासून सावधान!

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या सापळ्यात अडकवून हजारो रुपयांना गंडा घातला जात असल्याचे उघडकीस आले आहे. तरुणांसाठी जॉब देणाऱ्या या फेक कंपन्यांपासून सावध रहाण्याच्या सूचना अनेकदा पोलिसांकडून केल्या जात असतानाही बेरोजगार तरुण त्यांच्या जाळ्यात सापडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

नोकरीच्या शोधात असलेले अनेक जण ‘गुगल’वर जॉब सर्च करतात. सायबर भामट्यांनी हे हेरून अशा तरुणांसाठी जॉब देणाऱ्या फेक कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्याकडून अनेकांची फसवणूक होत आहे. त्यांच्या जाळ्यात एखादा अडकला, की अशा तरुणांकडून हजारो रुपये उकळले जात आहेत.

डेटा टायपिंगचा जॉब असल्याचे सांगून त्यावर दरमहा २५ ते ५० हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखविले जाते. या जॉबसाठी करार करून घेतला जातो. त्यानंतर डेटा टायपिंगमध्ये जादा चुका होत असल्याचे सांगून कोणताही मोबदला दिला जात नाही. तरुणांनी काम सोडून दिल्यास, कराराप्रमाणे काम न केल्याने कंपनीचे नुकसान झाल्याचे सांगून कराराचा भंग केल्याने ४० ते ५० हजारांची मागणी केली जाते. भरपाई न दिल्यास गुन्हा दाखल करण्यासाठी धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. भरपाई न दिल्यास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, असेही धमकावले जाते. परराज्यातील पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्रास दिला जातो.

या कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये, दिवसभरात फक्त दोन तास काम करून दरमहा २५ ते ५० हजार रुपये कमवा, कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरून डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना ५० हजार रुपयांपर्यंत कमाई करा, असे कामाचे स्वरूप दिलेले असते. ज्या कंपनीचे जॉब आहेत, तेथेच लिंक असते.

परदेशातील नामांकित विद्यापीठाने सर्व पुस्तके डिजिटल स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुस्तकांची पाने पाठविली जाणार आहेत. ती पाने टाइप करून पाठवायची आहेत, असे कामाचे स्वरूप असल्याचे सांगितले जाते.

डेटा देऊन फसवणुकीचे प्रकार काही ठिकाणी आढळू लागले आहेत. कोणत्याही कंपनीच्या डेटा एन्ट्रीच्या कामाबाबत खात्री करावी. अनोळखी कंपनीसोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. अशा कंपन्यांना कागदपत्रे, बँकेचा तपशील पाठवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.