‘आमचं गाव, आमचा विकास’ खुलताबाद तालुक्‍यातील सरपंच,ग्रामसेवकांचा सहभाग

खुलताबाद ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-पंचायत समितीच्या वतीने तालुक्‍यातील सरपंच व ग्रामसेवकांसाठी सरकारच्या ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमाची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्‌घाटन सभापती गणेश अधाने,  उपसभापती युवराज ठेंगडे यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे, अर्चना अंभोरे, रेखा चव्हाण, हिना मणियार , गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, विस्तार अधिकारी एच बी कहाटे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी प्रास्ताविकात ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमाविषयी माहिती दिली. विस्तार अधिकारी एच बी कहाटे यांनी वार्षिक व पंचवार्षिक विकास आराखड्याची माहिती दिली.

ग्रामपंचायतींनी मागील दोन वर्षांत लोकसहभागीय नियोजन प्रक्रिया राबवून वार्षिक विकास आराखड्याचे नियोजन केले आहे. त्याच्या अंमलबजावणीतील अनुभव व केंद्र सरकारने सूचित केलेल्या बाबी लक्षात घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीचा २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीचा पंचवार्षिक विकास आराखडा व २०२२-२३ चा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. चार वर्षांचा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या निधीच्या १.२० पट रक्कम विचारात घेण्यात आली होती. त्यामुळे या आराखड्यापैकी २०२० – २१ या वर्षापर्यंत हाती घेतलेली कामे वगळता शिल्लक कामे, गावाच्या आणखी गरजा व विविध घटकांशी विचार विनिमय करून व सुचविलेली कामे यांचा प्राधान्यक्रम ग्रामसभा घेऊन ठरवावा, अशा सूचना केल्या. 

विस्तार अधिकारी एच बी कहाटे यांनी सूत्रसंचालन केले.विस्तार अधिकारी शशिकांत सासने यांनी आभार मानले.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र दांडेकर, रवींद्र साळुंके, प्रकाश वाकळे, गंगाधर गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.