औरंगाबाद पदवीधर निवडणूक :एक खिडकी सुविधेतून मिळणार परवानग्या

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 10 : पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यादृष्टीने पोलिस, महसूल अधिकारी आदी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेऊन आदर्श आचारसंहितेची  प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राजकीय पक्ष, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधीं यांना आवश्यक असणा-या विविध परवानग्या एक खिडकी सुविधेतून देण्यात येणार असल्याने सर्वांनी निवडणूक अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तत्पर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कायदा व सुव्यवस्था व आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत श्री.चव्हाण यांच्याअध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस पोलिस आयुक्त निखील गुप्ता, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी आदींची उपस्थिती होती.

तात्पुरते प्रचार कार्यालय, वाहन परवाना, होर्डिंग, बॅनर, झेंडे, पोस्टर, ध्वनीक्षेपक, मिरवणूक, रॅली, रोड शो, जाहीर सभा, राजकीय पक्षांच्या बैठका, चौक सभा आदींच्या परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुविधेतून कार्यालयीन वेळेत मिळणार असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या प्रकरणावर तत्काळ प्रक्रिया करावी, जेणेकरून राजकीय पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणेत योग्य समन्‍वय राखून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल. तसेच पोलिस व संबंधित विभागांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून आवश्यक असणारी कार्यवाही तत्काळ करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 अप्पर जिल्हाधिकारी श्री.गव्हाणे यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती व करावयाची कार्यवाही याबाबत माहिती दिली. पोलिस आयुक्त श्री.गुप्ता यांनीही पोलिस विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या.

राजकीय पक्षांशीही साधला संवाद

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी राजकीय पक्षातील प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्त्र संवाद साधला. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व सुविधांबाबत उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला. या बैठकीस डॉ.कल्याण काळे, डॉ. भाऊसाहेब जगताप, राजेश मेहता, नितीन बागवे, विजय औताडे आदींची उपस्थिती होती.

विभागीय व जिल्हास्तरीय माध्यम कक्षाची स्थापना

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निडणूक 2020 साठी विभागीय व जिल्हास्तरीय माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीची आणि माध्यम कक्षाची स्थापना जिल्हा माहिती कार्यालय, अरिहंत बिल्डिंग, सिटी सर्व्हे नंबर 2714, खडकेश्वर, औरंगाबाद येथे करण्यात आली आहे. 

प्रसारमाध्यमांना पदवीधर निवडणूक संदर्भातील असलेली माहिती, वृत्त, या समितीच्या माध्यम कक्षातून व्हॉटस् ॲप व ई-मेलच्या माध्यमातून देण्यात येईल. स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाशी संपर्कासाठी [email protected],[email protected] या ईमेल आयडीवर तसेच दुरध्वनी क्रमांक-0240-2331085 व 0240-2331285 संपर्क साधता येईल. विभागीय समितीच्या माध्यम कक्ष प्रमुख म्हणून सहायक संचालक (माहिती) मीरा ढास व त्यांच्या सह माहिती सहायक रेखा पालवे या  कामकाज पाहतील.

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण, समितीचे सदस्य म्हणून डॉ.स्वप्नील मोरे (उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री), डॉ.दिनकर माने (विभाग प्रमुख, जनसंवाद वृत्तपत्र विद्या विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), गीत बागवडे (पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय औरंगाबाद), श्री.रमेश जायभाये सहायक संचालक (वृत्त) आकाशवाणी औरंगाबाद, तर सदस्य सचिव तथा माध्यम कक्ष प्रमुख म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत हे कामकाज पाहत आहेत.