कितीही मोठी रणभूमी असू द्या… कितीही युद्धसूचक रणभेरी, रणशिंग, शंख, तुताऱ्या वाजू द्या….

मराठवाडा साहित्य परिषदेने केलेले विधायक वाङ्मयकार्य हे मराठवाड्याच्या युयुत्सु विजिगीषू वृत्तीचा आविष्कारमराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार

May be an image of 12 people, people standing and text that says "OSBI"

मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार यांचे भाषण 

४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी एकमताने निवड केल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय कौतिकराव ठाले पाटील आणि परिषदेचे सन्माननीय पदाधिकारी यांचे मी आभार मानतो.

एका अशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतलेल्या कुणब्याच्या मुलास हा सन्मान दिलात. ही घटना माझ्या बाबतीत जेवढी अभूतपूर्व आहे, तेवढीच अनपेक्षित आहे. यामुळे झालेला आनंद आणि भांबावलेपणा या संमिश्र भावना घेऊन मी उभा आहे. 

माझ्या वाङ्मयीन मर्यादांची मला जाणीव आहे. मराठवाड्यातच नव्हे, तर या सभागृहात माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक उपस्थित आहेत, याची जाणीव ठेवून नम्रपणे अध्यक्षपदाचा स्वीकार करतोय… आणि मराठी सारस्वतातील ही जबाबदारी मला पेलावी यासाठी तुम्हां सर्वांचे आशीर्वाद मागतो.

मित्रहो, मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची ही आदिभूमी. एवढेच नाही, तर मराठी भाषेची जन्मभूमी म्हणून ज्या भूमीचा गौरव होतो त्या औरंगाबादच्या भूमीवर तुम्ही मला उभा केलात याचा विशेष आनंद मला होतो आहे. 

May be an image of text that says "शश्व मराठवाडा साहित्य संमेलन, औहंगाबाद A आयोजक: लोकसंवाद फाउंडेशन, औरंगाबाद"

जगभरातल्या सगळ्या संस्कृती या ना त्या कारणाने नदीच्या काठावरच जन्म पावल्या आणि वाढल्या. तशीच मराठी संस्कृतीही गोदावरी-पैनगंगेच्या कुशीतच जन्म पावली आणि वाढली. मराठवाडा हे मराठी संस्कृतीचे जन्मघर आणि मराठी भाषेचे माहेर, ख्यातनाम इतिहासकार गो. बं. देगलूरकर यांच्या मते “बाराव्या शतकापर्यंतची महाराष्ट्राची संस्कृती म्हणजेच मराठवाड्याची संस्कृती त्यावेळेपर्यंतचा महाराष्ट्र म्हणजे विस्तारलेला मराठवाडा.” कै. आ. कृ. वाघमारे म्हणतात, “मराठी भाषेचा जन्म बीड, परभणीच्या पट्ट्यात झाला. हा पट्टा पश्चिमेला पैठण, देवगिरी, वेरूळ आणि कळसाईच्या डोंगरापासून सुरू झाला.”

मराठी पहिल्यांदा राजभाषा झाली देवगिरीच्या यादव राजाच्या काळात. त्यावेळी संस्कृत ही शास्त्री पंडिताची व धर्मशास्त्राची भाषा होती आणि मराठी जनसामान्यांची. या लोकभाषेचा-मराठीचा सन्मान करून तिला राजव्यवहाराची, राज्यकारभाराची भाषा केली. लोकांना समजेल त्या भाषेत व्यवहार झाला पाहिजे, याचा पहिला धडा यादवराजांनी महाराष्ट्राला घालून दिला.

अखिल महाराष्ट्रात आज तीन विभाग आहेत. पुणे-मुंबईचा पश्चिम विभाग, विदर्भ-नागपूरचा प्राचीन विभाग आणि गोदावरीकाठचा मराठवाडा! इ. स. सातव्या शतकात या भागाला प्राकृत भाषेत महाराष्ट्री हे नाव प्रचारात होते आणि शालिवाहन राजाच्या काळात दक्षिणापथ म्हणत. राष्ट्रकूट राजाने आपल्या राज्याचा बराच विस्तार करून औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ गावाला राजधानीचा दर्जा दिला. त्यांच्याच काळात दशावतार लेणे तयार झाले. त्यानंतरच्या राजाने कैलास लेणे कोरण्‍याचे थोर कार्य केले. या राष्ट्रकूट राजाप्रमाणेच पैठणचे शालिवाहन, बदामीचे पूर्वचालुक्य, कल्याणीचे उत्तर चालुक्य आणि देवगिरीचे यादव या राजघराण्यांनी मराठवाड्याला अखिल भारतात स्थान मिळवून दिले.

संस्कृत आणि प्राकृत विद्या, वेरूळ आणि अजिंठा येथील शिल्प आणि चित्र यांचा उत्कर्ष याच काळात झाला. याखेरीज यादवाच्या काळात हेमाडपंती देवळांची निर्मिती आणि अभिजात गायनकलेला दिलेला राजाश्रय. यामुळे हा यादवकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाला आहे.

प्राचीन इतिहासात मराठवाड्याला जो मान प्राप्त झाला, तोच मान मराठी भाषेतील वाङ्मयाला प्राप्त झाला. ‘सत्तसई’ हे प्रख्यात प्राकृतकाव्य पैठण येथे रचले गेले. गुणाढ्याची पैशाची भाषेतील बृहत्कथा येथे लिहिली गेली. संत ज्ञानेश्वर, नामदेवांची जन्मभूमी, कर्मभूमी मराठवाडा आहे. संत एकनाथ, दासोपंत, रामदास आणि वामन पंडितासारखे थोर कवी याच मराठवाड्यात होऊन गेले. आद्य मराठी ग्रंथकार मुकुंदराज इथलेच.

‘डोईचा पदर आला खांद्यावरती। भरल्या बाजारी जाई मी।।’ 

असे म्हणणारी जनाबाई’,

‘मुंगी उडाली आकाशी। तिने गिळीले सूर्यासी॥’

अशी कूटरचना करणारी मुक्ताबाई इथलीच. संत चोखामेळा, गोरोबा काका हे मराठवाड्यानेच महाराष्ट्राला दिलेले देणे!

या संत-पंडित कवींप्रमाणे भास्करभट्ट, नरेंद्र पंडित आणि महिंद्रभट्ट हे महानुभाव पंथाचे थोर लेखक याच प्रदेशाचे सुपुत्र होत.

“माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजां जिंके।।

ऐसीं अक्षरें रसिकें। मेळवीन।।”

असे मराठीचे थोरपण सिद्ध करत ब्रह्मज्ञानाचा सुकाळ करणारे, भागवत धर्माचा पाया घालणारे ज्ञानेश्वर! 

“कन्नड देशा, तेलंग देशा न वचावे। महाराष्ट्री असावे।। महंत राष्‍ट्र म्‍हणौनी महाराष्ट्र।।”

असा महाराष्ट्राचा महिमा गाणारे, महानुभावपंथाची प्रतिष्ठापना करणारे चक्रधरस्वामी हे दोघेही आम्हाला वंद्य आहेत. दोघेही ब्रह्मज्ञानाचे थोर अधिकारी!

वारकरी संप्रदायाला जीवन देऊन त्याला महाराष्ट्रातील सगळ्या जातीत प्रतिष्ठा मिळवून देणारे ज्ञानेश्वर आणि महानुभाव पंथासारख्या कृष्णभक्तीपर संप्रदायाची पैठण येथे प्राणप्रतिष्ठा करणारे चक्रधरस्वामी हे महाराष्ट्राचे युगपुरुष होत. या दोन्ही पंथांनी ब्राह्मणांपासून अत्यंजांपर्यंत सर्वांना मोक्षाचे दार खुले केले. माय मराठीला धर्म आणि साहित्य यांच्या पवित्र आसनावर बसविले.

आज मुंबई-पुण्याकडील पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर-विदर्भाचा प्रदेश या मोठ्या भागात शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रात जी प्रगती झालेली आहे. तिला काही अंशी इंग्रजांचे धोरणही कारणीभूत आहे. या दृष्टीने आम्ही मराठवाड्यातील मराठी भाषक दुर्दैवी आहोत. हे दुर्दैव आमच्यावर प्रतिगामी अशा मुसलमानी राजवटीमुळे ओढवले आणि शिवकाळात अथवा त्यापुढील पेशवे काळात इतर महाराष्ट्राप्रमाणे स्वतंत्र झालो असतो, तर मराठवाडा पूर्वीप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रात अग्रेसर राहिला असता.

पोलीस कारवाईपूर्वीच्या निजामी राजवटीखालील अधिकाऱ्यांना मराठी भाषेविषयी, साहित्याविषयी आस्था नव्हती. त्यांची दरबारी भाषा आधी फारसी, नंतर उर्दू होती. या उर्दूची उन्नती व्हावी म्हणून त्यांनी उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती केली आणि उर्दूभाषेला माध्यमाचा मोठा दर्जा दिला. त्यामानाने मराठीला कमी महत्त्व मिळाले. भाषा स्वातंत्र्य आणि लेखन स्वातंत्र्य यावर कडक निर्बंध घातले. धार्मिक स्वातंत्र्याची तीच गती होती. पोलीस कारवाईच्या आधी रझाकारांनी जो धुमाकूळ घातला, ते तर मराठवाड्यासाठी अतिशय वेदनादायक आहे. अशा या कर्मठ निजामी जुलमाखाली कशाचे लेखन स्वातंत्र्य, कसली साहित्य सेवा? अशा या प्रतिकूल परिस्थितीतही ज्या कवी लेखकांनी साहित्यसेवा केली, त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत.

त्रिखंड महाराष्ट्र एकसंध होताना मराठवाड्याच्या राजकीय नेतृत्वाने स्वीकारलेली स्वार्थनिरपेक्ष वृत्ती मराठवाड्याच्या त्यागवृत्तीचे द्योतक आहे, तर पारतंत्र्याच्या काळात मराठवाडा साहित्य परिषदेने केलेले विधायक वाङ्मयकार्य हे मराठवाड्याच्या युयुत्सु विजिगीषू वृत्तीचा आविष्कार आहे.

मराठवाडा निजामी राजवटीतून मुक्त होऊन आता जवळपास सहा-सात दशके उलटली आहेत. बिनशर्त महाराष्ट्रात सामील होऊन मराठी भाषक महाराष्ट्र एकसंघ झाला आहे. शैक्षणिक प्रगती झाली आहे. नवीन विद्यापीठांची स्थापना झाली आहे. दळणवळण, प्रसारमाध्यमे वाढली आहेत. वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके जिल्ह्याजिल्ह्यात निघत आहेत. तालुक्यागणिक महाविद्यालये निघाली आहेत. यातून जे पदवीधर बाहेर पडत आहेत, ते आपले अनुभव ग्रथित करीत आहेत.

मराठवाड्याने अभिमान बाळगावा अशी स्थळे खूप आहेत. सातवाहनांची राजधानी पैठण, यादवांची देवगिरी, शिवरायांचे राजघराणे वेरूळ, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर, तर तीन ज्योतिर्लिंगे वेरूळ, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ ही सर्व स्थळे मराठवाड्यातच! बालाघाट, अजिंठा, नेमगिरी, चंद्रगिरी, कुंथलगिरी मराठवाड्याचे; तर दुधना, पूर्णा, गोदावरी, कर्परा, मांजरा, वांझरा, पैनगंगा या नद्या आमच्याच!

राजा शिवाजीने निर्माण केलेल्या स्वराज्याचा लाभ अवघ्या महाराष्ट्राला मिळाला, पण मराठवाड्याला नाही. निजामाच्या राजवटीत आम्ही दडपलेले राहिलो हे आमचे ऐतिहासिक मागासलेपण होय. सगळे हैद्राबाद संस्थान शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि औद्योगिकदृष्ट्या मागासलेलेच राहिले. धर्मवेडी जातीय राजवट कधीतरी संपणार होती. सर्व भारतभर पेटलेल्या स्वातंत्र्य वणव्यात ही राजवटही संपणार होती. हैद्राबाद संस्थानाच्या या मुक्तीसंग्रामात मराठवाडाच अग्रभागी होता. हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ, कृतीसमितीचे अध्यक्ष दिंगबरराव बिंदू, चिटणीस, गोविंदभाई श्रॉफ या लोकांनी लढ्याचे यशस्वी नेतृत्व केले. हा स्वातंत्र्यलढा केवळ हैद्राबाद संस्थानाचा विलिनीकरणाचा लढा नव्हता, तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचाच हा लढा होता. ज्या संख्येने इथे सत्याग्रह झाले, ज्या संख्येने येथे सशस्त्र आंदोलने झाली ते प्रमाण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वोच्च प्रमाण आहे आणि जनतेवर जे अत्याचार झाले ते प्रमाणही फार मोठे आहे. सशस्त्र रझाकार, सोबतीला धर्मवेडे घेऊन शासन नागवेपणे नाचत होते. तरीही जनता झुंजत राहिली. हे पाशवी सामर्थ्य मराठवाड्याला झुकवू शकले नाही. हुतात्मा गोविंद पानसरे, हुतात्मा बहिर्जी नाईक हे दोन हुतात्मे म्हणजे अनेकांनी बलिदान केलेल्‍यांचे प्रतिनिधी!

१७ सप्टेंबर १९४८ला पोलीस अॅक्शन झाली आणि हैद्राबाद संस्थान भारताचा अविभाज्य भाग झाला. मराठवाडा एकमुखी महाराष्ट्रवादी राहिला नसता तर महाराष्ट्र अस्तित्वात आला नसता. म्हणून आम्ही महाराष्ट्राचे नुसते घटक नाही तर महाराष्ट्राचे निर्माते आहोत.

मराठवाड्याच्या भूमीने अनेक चढउतार अनुभवले आहेत. येथील जनतेने त्याला तोंड दिले आहे. मात्र मराठवाड्याच्या महान आकांक्षा त्याला कधीच सोडून गेल्या नाहीत. आपल्या या माहेरात मराठी शारदेने आपली ठसठशीत पाऊले अत्यंत भावपूर्ण जिव्हाळ्याने उमटविलेली आजही आपणास दिसतात. मुकुंदराजाच्या विवेकसिंधूने जिची मुहूर्तमेढ रोवली. महानुभवाच्या सांकेतिक लिपीने जिचा साज चढविला. शाहिराच्या राकट रचनेत लावणीच्या शृंगारीरचनेने ज्या मराठीने आपला संसार उभारला त्या शारदेच्या कळा पैठणच्या भारुडाने, ज्ञानराजाच्या पसायदानाने, नामदेवाच्या कीर्तनाने गोदेचा काठ आणि बालाघाटचा कडेकपार पावन झाला. वेरूळाच्या पाटलांनी, जांबेच्या कुलकर्णींनी स्वातंत्र्य इतिहासातील प्रकरणे सुवर्ण अक्षरांनी लिहिली. 

मराठवाड्याची आजपर्यंतची वाटचाल ध्रुव दिशेने होत आली आहे. व्यवहारात तो दुबळा, असह्य, दरिद्री दिसत असला तरी परंतु, भिक्षापात्र अवलंबिण्याचा लाजिरवाणा प्रकार त्यांच्या स्वप्नातही कधी आला नाही. व्यावहारिक श्रीमंतीचा कस्तुरीटिळक कदाचित त्यांच्या भाळावर नसेल, पण भक्तीच्‍या अबीर-बुक्क्याने त्याचे ललाट सदैव भरलेले आहे. मराठवाड्याची भूमी साहित्याने सदैव सकस राहिलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीने अधिक जोमाने वाढते आहे. नानाविध सारस्वतांचे इथे अमाप पीक आले आहे. मागासलेल्या मराठवाड्यात निर्माण झालेल्या या वाङ्मयकृतीकडे थोडेसे सहानुभूतीने, दयेने, औदार्याने पाहत झुकते माप द्या, अशी लाचारीची भाषा काढण्याची गरज नाही. एवढी वाङ्मयीन महत्ता या वाङ्मयकृतीने मिळविली आहे. त्रिखंड महाराष्ट्र एकसंघ होताना मराठवाड्याच्या राजकीय नेतृत्वाने स्वीकारलेली स्वार्थनिरपेक्ष वृत्ती ही याची साक्ष देते. नांदेडचे श्री. इ. अ. कानोले यांनी मराठवाड्यात साहित्य व इतिहास संशोधनाची पायाभरणी केली. इतिहास, राजकारण, तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र, समीक्षाशास्त्र, सौंदर्यशास्त्र या सर्व शास्त्रांत प्रा. नरहर कुरुंदकर यांच्‍या उमटलेल्या एक मूलगामी नाममुद्रेचा विचार केल्याशिवाय अभ्यासकांना गती नाही. कविवर्य वा. रा. कांत एक जातिवंत, प्रतिभासंपन्न कवी आणि त्यांची काव्यदृष्टी समीक्षापूतही आहे. कवी, कथा, कादंबरी या क्षेत्रात बी. रघुनाथ यांच्या कर्तृत्वाला अभिवादन केल्याशिवाय मराठवाड्याला पर्याय नाही. गुरुवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी कवी, कथा, कादंबरी क्षेत्रात आपले एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. कवी असून अनुवादाच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण करणारे भगवंत क्षीरसागर, कवी आणि चित्रकार म्हणून ख्यातकीर्त झालेले भ. मा. परसावळे, उर्मीचे संपादक कवी जयराम खेडेकर, कवी आणि कादंबरीकार श्रीकांत देशमुख, पत्रकार आणि कथालेखक आसाराम लोमटे, शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि कादंबरीकार शेषराव मोहिते, कवयित्री अनुराधा पाटील, कविवर्य फ. मुं. शिंदे, नागनाथ पाटील, शेषराव मोरे, कविवर्य इंद्रजित भालेराव हे मराठवाड्याचे भूषण आहेत. कथा, कविता, कादंबरी या क्षेत्रात आपले नाव कोरलेले नागनाथ कोत्तापल्ले गुरुवर्य रा. रं. बोराडे, भास्कर चंदनशिव मराठवाड्याचे. त्याचप्रमाणे पळसखेडचे ना. धों. महानोर, प्रभाकर मांडे, अनंत राऊत, बाबू श्रीरामे यांचा उल्लेख केल्याशिवाय मराठवाड्याचा वाङ्मय इतिहास पूर्ण होणार नाही.

मराठीच्या उपासकांनो, आपला मराठवाडा नैसर्गिक, भौगोलिक, ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरांमुळे विविधतेने नटला आहे. संतांची पुण्याई, संतांचे पांडित्य, तंतकारांचे लोकसाहित्य, वीरांचे पराक्रम, विद्वानांचे विद्यावैभव या वैभवाने तुमचा आमचा हा मराठवाडा सर्वांच्या अभिमानाचा विषय झाला आहे. मराठा बोल अमृतासी होड लावतो म्हणून तुमच्या आमच्या अंतःकरणात रूजतो. आता या मराठी बोलीला अक्षररूप देणारे कलावंत, कवी दासू वैद्य, जगदीश कदम, डॉ. प्रकाश मोगले, मिलिंद ढवळे, विनायक येवले, बालाजी इंगळे, रा. ल. नाईक, मनोज बोरगावकर, महेश मोरे, नारायण शिंदे, शंकर वाडेवाले, केशव देशमुख, देवीदास फुलारी, संजीवनी तडेगावकर, लक्ष्मण मलगिरवार, केशव खटिंग, इंदुमती जोंधळे, सुरेश सावंत, मथु सावंत, डी. के. शेख, सय्यदभाई, वृषाली किन्हाळकर, वीरा राठोड, चंद्रशेखर मलकमपट्टे, माधव कदम, पी. विठ्ठल, सुधाकर वायचळकर, महारूद्र मंगनाळे, बापू दासरी, विनायक पवार, व्यंकटेश चौधरी, श्रीधर नांदेडकर, नागोराव उतरकर इ. वेगळा जीवनानुभव वेगळा आविष्कार करणारे हे प्रतिभावंत!

गणेश आवटे, वासुदेव मुलाटे, रंगनाथ तिवारी, भास्कर बडे, नागनाथ पाटील, प्रा. प्रल्हाद लुलेकर, महावीर जोंधळे, शिवाजी अंबुलगेकर, आनंद पोपलवाड, अनिता यलमट्टे, सुचिता खल्लाळ, भारत सासणे, विलास सिंदगीकर, दगडू लोमटे, रेखा बैजल, मल्हारीकांत देशमुख, रविचंद्र हडसनकर, शिवा कांबळे, प्रदीप पाटील, वीरभद्र मिरेवाड, माधव कदम, ऋषीकेश देशमुख, माधव मुरखेड, उत्तम वजंजे, महेश कुडलीकर, श्रीराम बिरादार, मिंलिद शिकारे, पंडित पाटील, भगवान अंजनीकर ही काही प्रातिनिधिक नावे. जनार्दन वाघमारे, बाळकृष्ण कवठेकर, सुधीर रसाळ, दत्ता भगत, नरेंद्र चपळगावकर, गंगाधर पानतावणे यांचे योगदान मराठी वाङ्मयात महत्त्वपूर्ण आहे.

वाङ्मयनिर्मितीपूरक प्रकाशन संस्था मराठवाड्यात भरपूर जशा झाल्या आहेत, तसेच वाङ्मयाची रुची वाढविणारी नियतकालिके वाढताना दिसतात. ‘भूमी’चे संपादक कवी श्रीराम गव्हाणे, ‘उर्मी’, ‘आशय घन’, ‘साहित्यदर्शन’ आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ इ. नियतकालिकांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. अभिमानाची बाब अशी, देगलूरसारख्या ठिकाणी ‘अक्षर गणगोत’सारखी प्रकाशन संस्था आणि त्रैमासिक पांडुरंग पुट्टेवाड समर्थपणे चालवित आहेत.

मित्रहो, ही यादी अपूर्ण आहे याची जाणीव मला आहे. ही प्रातिनिधिक नावे यासाठी दिली, की यांच्या खांद्यावर मराठवाड्याची, मायमराठीची पालखी मिरवते आहे. जनसामान्यांची, कष्टकऱ्यांची अबला-दुबळ्यांची दुःखे अंतःकरणात साठवून यांनी भाषेत वाङ्मयीन आविष्कार घडविला. शुभाकडे, मांगल्याच्या दिशेकडे जाण्याचे संकेत यांनी दिले. मराठवाड्याची ही पुण्यभूमी, संतांचे सामाजिक आणि वाङ्मयीन कर्तृत्व, मराठीची थोरवी वागविणाऱ्या या थोर विभूती! या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन अधिष्ठानावर मी उभा आहे. माझ्यापुरता प्रश्न ‘मी का लिहितो आहे?’, ‘कशासाठी लिहितो आहे?’ आणि ‘मला काय साध्य करावयाचे आहे?’ आणि या पुढचा प्रश्न ‘मी कादंबरीच का लिहितो आहे?’ मित्रहो, मला जाणीव आहे. हे प्रश्न गहन आणि निर्मितीप्रक्रियेसंबंधी असल्यामुळे मी दिलेली उत्तरे स्थूल आणि जडच राहणार… किमान प्रश्नाभोवती साधक-बाधक प्रदक्षिणा घालण्याचा अल्प प्रयत्‍न या निमित्ताने मी करणार आहे. या ठिकाणी एका गोष्टीची कबुली देऊन ठेवणे मी आवश्यक समजतो. माझ्या वाङ्मय आकलनाला जशा मर्यादा आहेत तशाच लिखाणालादेखील मर्यादा आहेत. तेव्हा मी जे काही बोलणार आहे ते माझ्यातला लेखक घडणे व तो कादंबरीच्या आकृतिबंध आविष्कृत होणे, येवढ्याच मर्यादित परिघात बोलणे असणार आहे.

माझा जन्म आणि वाढ देगलूर तालुक्यातील काठेवाडी आणि धनगरवाडी येथे झाली. देगलूर हे कर्नाटक आणि तेलंगणा सीमेवरचा मराठी भाषिकांचा शेवटचा तालुका. कन्नड आणि तेलगू भाषेचा परिणाम जसा मराठी भाषेवर झाला त्याचप्रमाणे साऱ्या लोकव्यवहारावर आचार-विचारांवर झाला. जन्म, मृत्यू, सणवार, देव-देवता यांचे विधीमूळ महाराष्ट्रीयन किती? कन्नड, तेलंगणा प्रांतातून आलेले किती? यांचा संभ्रम पडावा अशी सरमिसळ या तीन प्रांतांची झाली. प्रत्येक घरातील एकतरी मुलगी तिकडे दिलेली अथवा सून म्हणून घरात आलेली. त्यामुळे चालीरीतीचा, बोलल्या जाणाऱ्या भाषेचा, देवदैवतांच्या प्रतिमांचा एक अभूतपूर्व संकर झाला. अनेक लोककथा, दंतकथा, म्हणी, वाक्प्रचार इथल्या लोकव्यवहारात आल्या. एवढेच नाही, तर कपाळावर लावण्याचे कुंकू, गंध, इबिताचे आडवे-उभे पट्टे या प्रकारापासून वेशभूषेपर्यंत हा परिणाम दिसून येतो. केशरचनेतील बुचडा, वेणी त्यात माळावयाची फुले, नाका-कानातील कुड्या, काड्या, चमक्या, नथी, फुल्या, गळ्यातील हार, साखळ्या, हातापायातील दंड, कडे, अंगठ्या, वाळे, तोडे, भिकबाळ्या एक अभूतपूर्व संस्कृती संयोग झाला आहे. एवढेच नव्हे, तर पानावरील पदार्थ महाराष्ट्रीयन का कर्नाटकातील की तेलंगणातील हे कळणेही दुरापास्त आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील कर्नाटकात गेलेली लेक माहेरी कपाळावर इबिताचे पट्टे आणि तोंडात ‘बाबा’च्या ऐवजी ‘अप्पा’ हे संबोधन घेऊन येई आणि ती जर तेलंगणात गेली असेल तर मांसमच्छीची चव घेऊन येई. “कानडीने केला मऱ्हाटी भ्रतार” अशी तुकोबांची वाणी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कानडा विठ्ठल. त्याचप्रमाणे आपल्या अनुयायांना ‘तेलंग देशा न वचावे’ सावध सूचना देणारे चक्रधरस्वामी. हे तीन प्रांताचे ऋणानुबंध न तुटणारे आहेत. बहिणी-बहिणी किती सुख-संवादाने भरून वागू-बोलू शकतात. हे पाहावयाचे झाल्यास सीमावर्ती भागातील आठवडी बाजार पाहावा. बाजारासाठी डोक्यावर टोपले, हातात पिसव्‍या घेऊन आलेल्या ह्या बाया गोविंदबावडीवर हास्यहुश्य करीत बसतात. कुणी उजव्या हातानी घेतलेल्या पदराने, कुणी डाव्या बगलेने घेतलेल्या पदराने कपाळावरच्या आडव्या, गोल, चिरक्या, चंद्रकोरीसारख्या कुंकवाला धक्का न लावता घाम निगुतीने पुसतात. कुणाच्या कपाळावर गोंदण, तर कुणाच्या गालावर, हनुवटीवर, मनगटाच्या मांसल ७ भागावार चंद्रसूर्य, पानफूल, तर कुण्या बहिणीच्या मनगटावर सर्पाचं युगुल! तेलंगी-सुवासिक जर्दा टाकून पान खाणारी, मराठी तंबाखूची वेणी मोडून खाणारी, तर कानडी विडी ओढणारी. मग त्यांच्या मुखातून तेलगू-कानडी, मराठीचे रूप जे प्रकट होते, ते दिव्य असे! हे आमच्या मराठीचे सर्वसाधारण रूप. बिचारी व्याकरणाच्या चोखडीने बद्ध झालेली पुण्या-मुंबईची प्रमाणभाषा त्यांच्या गरीब नवऱ्यासारखी दूर सावलीला बसून असते.

मित्रांनो, जेव्हा माझ्या जाणिवेचे डोळे उघडले समोर कोरडवाहू शेती होती. बांधावरच्‍या बाभळी-बोरी, दूर कुठेतरी आंब्याची श्रीमंती…! दारापुढे बैलाची दावण. आमोणासाठी दावे तोडून घेणाऱ्या बारगळ म्हशी… हंबरणाऱ्या गायी… एखादा टाळकुट्या घोडा, शेत, शिवार, वहीत, पेरणी, खुरपणी, रास यांच्या जोडीला नांगर, तिफण, कुळपं, नाडा, कासरे, सापत्या, जू, दांड्या, जानवं, फास, कार हा संभार! पेरणी झाली, मोड लागलं, पाणी नाही, शिवार काळं पडलं. शिवार पिकलं भाव लागला नाही. ह्या कोलाहालातच वाढत गेलो. औत मोडलं. संसार बुडाला. जप्ती आली. हीच तोंडाची भाषा. ही उघडीनागडी माणसे अनामिक भीतीने भेदरलेली. मात्र द्वेष, ईर्ष्‍या, मत्सर यांनी भरलेली! मृत्यूच्या दारात हमसून रडणारी, दोनाचे चार हात करताना मात्र हमखास खोडा घालणारी. यांची सुख-दुःखे विधात्यालाही न कळणारी. साक्षीभूत राहून पाहणाऱ्यांना मात्र कोड्यावर कोडं घालणारा.

चालुक्यकालीन राजाचे उपराजधानीचे ग्राम म्हणजे होट्टल. आमच्या गावापासून एक किलोमीटरही भरणार नाही अशा ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं. माझ्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वातील अर्धाअधिक भाग या गावातील निसर्गाने व्यापला. मला बोलतं करण्याचं कार्य इथल्या निसर्गाने आणि मुक्या प्राण्यांनी केलं. पांढऱ्या मातीच्या गढ्या, बुरुजे, काळ्या मऊशार दगडाचे चिरेबंदी वाडे, अशाच एका पांढऱ्या मातीच्या गढीत शाळा भरायाची. शाळा जेव्हा सुटायची तेव्हा पांढऱ्या मातीच्या फुफाट्याने अंग भरून गेलेले असे. गावाला लागूनच बारामाही वाहणारी धबधबी होती. हत्ती एवढ्या दगडाच्या रासीतून वाहणाऱ्या हा धबधबीचा आवाज गावाच्या घराघरातून घुमत असे. पुढे चिं. त्र्यं. खानोलकरांच्या ‘कोंडूरा’ कादंबरीतील धबधबा मला बालपणीचा ह्या धबधबीच्या रूपाने भेटला. सुपीक जमीन. अनेक पिढ्या मळलेली माती. त्यामुळे गावभर झाडांची दाटी. एकाएका झाडाचा बुंधा चार-चार माणसांच्या कवळीत न मावणारा.. पारावरच्या पिंपळाचीच गोष्ट घेतली तर बाजूच्या लिंबाला होत्याचा नव्हता केलेला एवढा द्रोणागिरी उचलणारा मारोती. पिंपळाच्या ह्या विस्ताराखाली काडीएवढा झालेला वड, पिंपळ, लिंब, चिंचाच्या झाडांनी सारं गाव झाकलेलं, खंडोबाचं देऊळ कुठं? तर पिंपळाच्या फांदीखाली! भवानीचं मंदिर कुठं? तर लिंबाच्या झाडोऱ्यामधी. अनेक झाडांच्या फांद्या सारत भवानीच्या कुंडाचं दर्शन व्हायचं. हेमाद्रीपंतांनी बांधलेली तिन्ही हेमाडपंती मंदिरे बेलीच्या आणि चाफ्याच्या झाडांनी लपली गेली होती. त्यांच्या जोडीला रानवनस्पती जोड. त्यामुळे या देवळात दिवसासुद्धा अंधार भरलेला असे. उत्तम कलाकृतीने नटलेल्या वास्तू त्यावेळी उपेक्षितच होत्या. एकट्यादुकट्या माणसाचे धैर्य गर्भगारापर्यंत जायचे होत नसे. अनेक श्वापदांची विष्ठा-रानवनस्पतीचा उग्रग्रंथ साऱ्या वास्तूत भरून असायचा. देवाळाच्या गाभाऱ्यावर अनेक अप्सरा, रंभा, उर्वशी यांच्या नृत्यमुद्रा, योगमुद्रा, देवतापरिवाराचे शिल्पाकृती, सभामंडप, गाभारा, गर्भागार अशी रचना. एखाद्या सोमवारी कुणीतरी महादेव पिंडावर विभूती लावून बेलाची पाने, चाफ्याची फुले वाहून जाई. तेवढाच काय तो त्या वास्तूला माणसाचा स्पर्श! झाडावर पशुपक्ष्यांच्या प्रजातीची वस्ती! प्रत्येक झाड एकाएका प्रजातीने वाटून घेतलेलं. चिंचेवर वटवाघूळ, पिंपळावर कावळे, आंब्याच्या ढोलीत पोपट तर वडावर आग्यामोहोळ. बिचारी वानरे मात्र सर्व झाडे शोधून शोधून पारावरच्या पिंपळ, लिंबावर बूड टेकवत! या झाडांच्या सावल्यांमुळे रात्रीचा ओला अंधार अधिकच गडद होई. रात्रभर पक्ष्यांचे चित्कारणे, वटवाघूळाचे फडफडणे, वेळी अवेळी घुबडाचे घुत्कारणे, फांद्यांवरील वानरांची बुडे घसरून फांद्यावर पडणे अशा प्रकाराने सारी रात्र जागेपणात जाई. बिचाऱ्या हेमाडपंत देवालयावर उभा असणाऱ्या सुरसुंदरी हे पार्थीवाच्या लीळा पाहत स्तब्ध उभ्या असत. पुढे वाचनात आलेले श्रीनिवास कुलकर्णीच्या ‘डोह’ संग्रहातील गूढरम्य जगाचा भीतीदायक अनुभव ह्या निसर्गाने मला बालपणीच दिला.

दुपारची भाकर खाऊन कुण्याही वाड्यात जा… तिथल्या आडातील पाणी ओंजळीने प्या… एवढी पाण्याची मुबलकता. कोलासचा डोंगर जवळ असल्यामुळे सागवानी लागडाचे तुळ्या, वासे, दाराच्या चौकटी, देव्हारे, अलमाऱ्या. सर्वत्र तेल पिलेले नक्षीकाम. प्राचीन राबती भूमी असल्यामुळे पाय ठेवाल तिथे देवदेवतांची मूर्ती नाही तर, घडीव पाषण शिल्पे! या गावीच कलगी तुऱ्याचे सवालजवाब ऐकले. गावचा देशमुखच पागोटं बांधून डफ, तुणतुण्यावर शाहिरी, पोवाडा गाई. मोरमातं, अंगाला रंगरगोटी लावून दोन्ही पायावर काष्टा घालून, हातात बेत घेऊन मागबाजाच्या तालावर पिरासमोर नाच करीत. अनेक प्रकारचे सोंग आणत. शिवरात्रीच्या पूर्णचंद्राच्या रात्री परमेश्वराजवळ अग्निकुंड पेटवून जंगम घनकुंड खेळत. तर होळीच्या रात्री महार, डफ, तुणतुण्यावर हावगीरावाचा, कर्ण-अर्जुनाच्या युद्धाचा पोवाडा गात. गोंधळी देवीचा पट मांडून एक कथा लावत. ती रात्रभर अनेक पदे, उपकथाकथने करत दिवस उगवेपर्यंत चालवत. अशी अनेक लोकगीते, लोककथा, दंतकथांचे श्रवण घडतच मी वाढत गेलो.

भल्या पहाटेच झाडावरच्या पांगुळाच्या आवाजाने गावाला जाग येई. वर्षाला एकदा कपाळाला चंदनाचा लेप… खांद्यावर शुभ्र उपरणी, डोक्याला लालबुंद शेमला बांधून रामचंद्र जोशी येई. त्यांच्याभोवती भरले कळस बांधून गावची गर्दी होई. सटवाईने कपाळावर गोंदलेली अलप्य लिपी रामचंद्र जोशीच्या मुखातून बाहेर पडू लागे. सकाळच्या जंगमाच्या शंखानी घर पवित्र होई. तर वासुदेवाच्या चिपळ्याने पूर्वजांच्या स्मृती जागे होत. गारुड्याच्या पुंगीने सर्पाच्या फणीवरचा, दहाचा आकडा नाचू लागे तर इकडे बायापोरे भीतीने किंचाळू लागत. काही दिवसातच अंगाखांद्यावर सरंजाम घेऊन कोल्हाटीणीचा खेळ गावात येई, दोरीवर हातात काठी घेऊन चालणाऱ्या या चिमुरडी पाहून जगण्यातील दुष्कृतता मूर्तीमंत उभी राही. देवांनी दिलेली ही देहाची कमनीयता पोटासाठी उधळून लावण्याची ही गती मनाला अस्वस्थ करून टाकी. खंडोबाच्या जत्रेच्या निमित्ताने शाळेला सुट्टी मिळे. गावचे बाईललेकी गावात येत. त्यानिमित्ताने त्यांचे बाप्पे हक्काने घरोघरी खाटेवर ऐटीत बसत. परिसरातील पहेलवान निरसदुधाच्या चरव्या तोंडाला लावून झाडाझाडाखाली दंडबैठका काढत. पालखीवरून बेलभंडाऱ्याची उधळण होई. शेव, चिवडा, बत्ताशा, जिलब्याच्या वासागंधाने गाव भरून जाई. निरनिराळ्या दुकानांनी, आकाश पाळण्यांनी, पुंग्या, बासऱ्यांनी माणसाला माणूस ओळखीनासा होई. यात एक अनोखी गोष्ट घडे, ज्याची पाऊले वेशीच्या खाली कधी पडली नव्हती अशी माणसे चेहरा रूमालाने झाकून मांगवाड्यात गर्दी करत. वासाचा गंध काढत श्वापद फिरावेत तसे मुरोळीच्या मुक्कामाभोवती फिरत आणि तिथं मात्र डोळ्यात तेल घालून तिचा राखण करणारा सोंगाड्या डफवाला असे. यातून अशा गंमतीजमती घडत की जे पुढच्या जत्रेपर्यंत गावात चर्चेला विषय मिळत.

साजरा होणारा लक्ष्मीचा सण लक्षात राहण्याजोगा. गावलक्ष्मीला सोडलेले हलगट पाहता पाहता गर्दन कवेत न मावणारा सांड होई. पुऱ्यागावचे शिवार खाऊन मुसमुसू लागे. नुसत्या त्यांच्या नाकाच्या वाऱ्याने कडब्याची पेंढी उडू लागे. बरे एवढ्यावर त्याची माज नसे तर सकाळ, संध्याकाळ गावच्या पाणंदीवर आडवं उभा राहून गावातील एक जनावर रानात जाऊ देत नसे की रानातील जनावर गावात येऊ देत नसे. कुणाला केव्हा मारेल अशी  गावाला धास्ती. मग पुढे करावयाचा लक्ष्मीचा सण अलीकडे येई. मग रात्रीला शिंदी मारेल पखाली भरत. पोतराज जानीनला सांगावा जाई. मानापानाची रात्रीलाच उजळणी होई. शाडूगिरूने लक्ष्मीचे देऊळ सजून हिरव्या लुगड्या, काकणानी लक्ष्मी सजून बसे. गाफीलपणे बसलेल्या हालगटाला फासा टाकून अनेक सोलचटाने जखडले जाई. मांगबाजाची घाई सुरू होताच गावच्या भोवती भुताळी निघे. पुढे केवळ लिंबाच्या डहाळ्यांनी अंग झाकलेला मानाचा महार, कुंकवाने माखलेला पोतराज, हळद लावलेली जानीन, मागे हलगट आणि गाववाले, शिंदी दारूच्या नशेत सर्वच चूर. खाऊ का गिळू करणारे सर्वचजण. जागोजागी त्याची वाट अडविणारे भूतपिशाच्च योनीतील जीव. वाट अडविताच बकऱ्याच्या पिलाचं घाव तोडून दान! मग ही वरात मोठी खडतर प्रवास करून लक्ष्मीच्या समोर येते. केसागणिक माणूस हलगटाला चिकटतो. पाणी तोंडात टाकून त्यांच्या कवेत न मावणाऱ्या गर्दनीवरून शस्त्राचं पान फिरतं. रक्ताच्या चिखलात लावून ठेवलेल्या कुऱ्हाड्यांनी लाकडे फोडावेत तसे हालकटाला फोडून मांसखण्डाचे वाटे मानाच्या लोकांना देण्यात येत. ही घाई होताना इकडं पोतराज, दातांनी तोडलेल्या घावाची चूळ टाकत असे. 

असे सांगतात. याच जागेवर पोतराजाच्या दातास देण्यासाठी कोकरू मिळालं नाही तेव्हा बायकोच्या थानाला लागलेल्या पोराचा घाव घेतला! या भूमीचे बोल सर्वार्थाने ऐकावयाचे असतील तर मांगबाजा ऐकावा. तबला मृदंग सुद्धा काही काळ थक्क होऊन जावे तसे हालगीवरच्या टिपऱ्या! गवळणी, मारोतीची घाई आणि विशेषतः ‘हरण पाडसासमोर उभा असणारा व्याध’ यांच्या प्रेमाची, त्यागाची आणि शेवटी दयेची करूणार्द्र आळवणी इथल्या सनईच्या जिबलीतून ऐकावी.

बालपणी मी जिथे वाढलो, कळत नकळत वावरलो, पाहिलो, ऐकलो त्या भूमीच्या समृद्धीची नाममुद्रा माझ्या अंतःकरणावर कायम उमटली. अशा अनेक कारणाने मन भरून वाढू लागे. मग वर्गात शिकविलेले धडे, अंकगणितातील बेरजा, वजाबाक्या कुठून लक्षात राहणार? मग कण्हेरीच्या फोकानी मास्तरांनी मारलेल्या रेघा अंगावर दिवसेंदिवस ठळक होऊ लागल्या. डोळे भरून वाहणाऱ्या विहिरीसारखे वाहू लागत. घरी शब्द फुटेना म्हणून मार… शाळेत अर्थ कळेना म्हणून मार…! मार, घर आणि शाळा यांना जोडणारी वाट मात्र निसर्गचित्रांनी लोकउत्साहांनी भरलेली असे.

मित्रहो, आज मला वाटतं, निसर्गाने आणि ह्या लोककलावंताने हे आपले सृजनशील पारदर्शी रूप मला दाखवले नसते तर आज मी एक भुसा भरलेला माणूस उरलो असतो. पुढील आयुष्यात जेव्हा केव्हा संदर्भहीनतेची अवकळा अंगावर चढे. तेव्हा पक्षीभाराने वाकलेली ही झाडे समोर उभे राहत. वैराण वर्तमानाचे काटे जेव्हा असह्य होत, तेव्हा बसवण्णाच्या उघड्या माळावार हरणीला लुचणारे पाडस समोर उभा राही. या निसर्ग आणि ग्रंथाच्या अधिष्ठानावर लेखक उभा असेल तर माझ्या मते, सृजनाचे स्त्रोत अनेक अंगाने त्याला वाहते ठेवतात. तो निसर्ग वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या रूपाने येऊन त्याला अचंबित करीत असतो, प्रवाही करीत असतो.

माझ्या ‘अग्निकाष्ठ’ कादंबरीतील निसर्गाची ही किमया पहा. निपुत्रिक माधवराव पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी. ज्यांना पाहून सारा गाव निष्कलंपणाचे धडे घेते. जीवन कसे जगावे यांचा वस्तुपाठ घेते अशा माधवराव पाटलांना अंतिम सत्य म्हणजे काय? या जीवनाचे स्वरूप काय? असे प्रश्न जेव्हा जेव्हा पडतात तेव्हा तेव्हा त्याची उत्तरे ग्रंथातून शोधतात. प्रश्नाची उत्तरे, जेव्हा ग्रंथातून मिळेनासी होतात तेव्हा त्यांच्या अस्वस्थ झालेल्या, सैरभैर झालेल्या मनाला दिलासा कसा यावा? असा माझ्यापुढे लेखक म्हणून प्रश्न पडतो. हातातील लेखणीची निरर्थकता जाणवू लागते. तेव्हा हाच निसर्ग पाठीराखा झाला. माधवराव पाटील आणि त्यांच्या पत्नी अस्वस्थपणे शेतातील विहिरीवर जातात. विहिरीकडे पाहू लागतात. विहिरीच्या काठावर उभा असलेलं जांभळाचं झाड जणू पाण्यावर सावली धरावी म्हणून अर्धअधिक पाण्यावर कललेलं असतं आणि त्यांच्या बोटाबोटाच्या फांद्याला चिमण्यांचे खोपे हेलकावत असतात. खोप्यांच्या सावल्या ह्या काठावरून त्या काठावर ये जा करत असतात. वाऱ्याचा जोरकस झोत येतो. चिमण्यांचे खोपे उलटेपालटे होतात. त्यातून गुलाबी रंगाचं एखादं अंडं अथवा लाल मांसाचा डोळे झाकलेला गोळा पाण्यावर पडतो. त्याचीच प्रतीक्षा करणारा पाण्यावर रेघोट्या मारत असलेला साप, त्याला गिळंकृत करतो. पुन्हा त्या क्षणाची प्रतिक्षा करत पाण्यावर रेघोट्या मारीत फिरतो. वर कवेत गोळा करावा असा चिमण्यांचा सर्जनाचा सोवळा-खाली मृत्यूचा सोहळा! खोप्यापार सापाच्या मुखापर्यंत काय तो जीवाचा प्रवास…! एवढ्या अल्पप्रवासात जन्माचं गणित सोडविणार का मृत्यूचं!

“शेवटी जीवनाचं रहाटगाडगं अनादिकालापासून अनुत्तरितच राहणार…!”

माधवराव पाटील उठतात. आपल्या सुविद्य पत्नीचा हात धरून धिम्यागतीने वाडा जवळ करू लागतात.

प्रज्ञा असो प्रतिभा, लेखकाच्या ठायी गृहीत धरूनच मला म्हणावेसे वाटते, निसर्गाचे डोळसपणे आकलन आणि ग्रंथाचा जाणीवपूर्वक केलेला अभ्यास आवश्यक आहे. तरच त्याने चित्रित केलेल्या घटना, प्रसंगाला, व्यक्तिचित्रणाला अर्थवत्ता आणि वेगवेगळ्या शक्यता निर्माण होतात. आशयाला एक कालातीत शाश्वता लाभते.

प्रत्येक जीवमात्र ही निसर्गाची देण. हे अपूर्व देणं सुरक्षित ठेवून त्याला सौंदर्यपूर्ण करावयाचं काम लेखक करतो. ज्या सृष्टीत तो वावरतो त्या चराचरानी आपल्या नात्याची एक घट्टविण दृश्य अदृश्यरूपात तो विणत असतो आणि कुणी जर ही विण उसविण्याचा प्रयत्न करू लागल्यास तो व्यथीत होतो. एकंदर हा निसर्ग लेखकाशी जुळवून घेतो आणि चराचराशी लेखकाचे नाते जुळवूनही देतो. उगीच नाही तुकाराम निसर्गासी आपली सोयरीक करून बसला…! 

माझा एक नायक जगण्याकडे पाठ फिरवून रूसून बसतो. खडकावर बसलेला. तो… डोळे शुन्यात बुडालेले… देहावर मृत्यूची साऊली घिरट्या घालणारी… पायाखाली जीवनाची चाहूल लागते… पाऊल उचलून पाहतो तर गवताचं एक हिरवं पातं त्यांच्या दोन बोटात खेळत असतं. “अभेद असा खडक भेदून मी एवढा मोठा झालोय… तुला तर एवढा अवकाश दिलाय… कसला मृत्यूचा विचार करतोस…”

तर बोलायाचा मुद्दा असा की, निसर्गाचीच देण माणूस आहे आणि त्याचा अंतरवास व्यापूनही तोच आहे. तेव्हा त्यासी सुसंवादी राहणं प्रतिभावंताचं श्रेयस… प्रेयस दोन्ही आहे. त्याला घटीतात बघा वा अघटीतात; पण त्यालाच बघा. तरच हाताला काही शाश्वत निदान लागेल.

तो माझ्यातील लेखकाला कधीच एकाकी सोडत नाही. मी निर्माण केलेल्या व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी स्वतःशी अद्वैत साधत असतो. जमीन उलथीपालथी करणारा वारा… वाऱ्याची भीत बांधणारा वारा… अंगावरून जाणारा वारा… दाण्यात चिक भरणारा वारा… कानातील डूल हलविणारा वारा… पाणी आणणारा वारा… नाकात भरणारा वारा… आणि शेवटी डोळ्यातून जाणारा वारा… वारा या अमूर्त भूतासी लेखणीचा एवढा खेळ चालतो, तर इतर व्यक्त भूताची गणना लेखणीने कुठवर करावी? 

लेखकाला जसा निसर्ग पाहिजे. नव्हेतर तो त्याच्या ठायी आहेच. तो फक्त जाणीवपूर्वक कवेत घेतला पाहिजे… तसाच सदैव ग्रंथाचा सहवास असला पाहिजे. ग्रंथ हे त्याची अधिष्ठात्री देवता झाली पाहिजे.

गावात चार्तुमासात श्रावण मासात श्रीधरस्वामी, महिपती महाराज यांचे ‘हरिविजय’, ‘भक्तिविजय’, ‘पांडव प्रताप’, ‘रामविजय’ या ग्रंथाचं वाचन आणि निवेदन चालायाचं. क्वचीत एकनाथ महाराजाचं ‘भावार्थ रामायण’ही चालायाच. गावातील भाविक मोठ्या श्रद्धेने त्याचं श्रवण करीत. नित्यनेम चालविण्यासाठी ग्रंथाची पूजा, आरती यथासांग व्हावी म्हणून एक जंगम नेमून दिलेला असे. वाचन करण्यासाठी आणि अर्थ सांगण्यासाठी बाजूच्या गावाहून मास्तर आणि जाणकार कंदीलाच्या उजेडात येत असे. वाचनाच्या लयीने निवेदनाने कान तृप्त होऊन भगवंता पुढं भाविकाचे हात जोडले जात. तेव्हा सातवी आठवीत शिकणाऱ्या माझ्या मनाला वाटे, “बोला, पुंडलीक वरदे हरि विठ्ठल”च्या गजरारत आपणही आसनावर बसावे… चौरंगावर ठेवलेल्या ग्रंथाला नमस्कार करून प्रथमोध्यायाची सुरुवात करावी, पण कुणी संधी देत नसे. संधी मिळावी म्हणून जंगमाला, मास्तराला पाणी आणून दे… चहा आणून दे… त्यांच्या पुढे पुढे करणे… नको तिथे त्यांना हात जोडणे माझे सुरू असे. मग या माझ्या प्रयत्नाला केव्हातरी यश येई, “वाचू द्याऽ वाचू द्याऽ” असे दयार्थ शब्द उमटत, “वाचऽ पण ठळक ठळक वाचऽ गुंईऽ गुंई करू नकोस.” अर्थाची फोड करून सांगणाऱ्या मास्तराची आज्ञा होई. तळहात व तळपायाला घाम सुटे, “बोला पुंडलिकऽ” ठळक होई. “आता गंमतऽ” म्हणून पेंगुळलेले समोरचे डोळे विस्फारत आणि खरोखरच गमंत होई. समोरचे सुटे अक्षरे एकमेकांना मिठीत घेत. जोडअक्षरांचे तर हातपाय गायब होत. ओवी जागा सोडून वरखाली होई. आवाज घोघरा आणि बोवडा होई. मास्तर प्रत्यक्ष ब्रह्माने कोड घातल्यासारखं आवाक होत. भाविकपणा सोडून बायाबापड्या हसू लागत. हा असला चमत्कार पाच-सहा ओव्यापर्यंत चालू देत. “उठ आता… उद्या थोडं घेसील”… आणि दुःखाची बाब या ऐकणाऱ्या पाहणाऱ्यात माझे मायबापही असत. अशा रीतिने स्वतःला सावरीत रोज थोड्या थोड्या ओव्या घेत श्रीधरस्वामी आणि महिपती महाराजाच्या जवळ जात गेलो. बालवयातच या ग्रंथाचं वाचन, श्रवण… वेगवेगळ्या व्यक्तीच्या मुखातून होत गेलं. विशेषतः एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाचे रोज एक अध्याय घ्यावयाचे म्हणजे हा ग्रंथ आठ-नऊ महिने चालायचा. दुसरी गोष्ट, गावोगावी लक्ष्मण शक्तिकांडाचे सात अध्यायाचे वाचन आणि निरूपण होई. पंचक्रोशीतील नावाजलेले वाचक आणि निरूपणकारांना आंमत्रित करत. सूर्य मावळता मावळता सूरू होणारा ह्या सातकांडाचा उत्सव सूर्य निघता निघता गाव जेवणाने समाप्त होई. रावणाची शक्ती लागून निपचीत पडलेला लक्ष्मण प्रभू रामचंद्राने त्याचे मस्तक मांडीवर घेऊन केलेला शोक, वैद्यराज जांबुवंताच्या सूचनेवरून संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमंताने केलेले उड्डाण… वाटेत साधूच्या वेषात बसलेला काळनेमी… रात्रीच्या काळोखात द्रोणागिरी पर्वतावर चमचमणाऱ्या दिव्यवनस्पती… आकाशमार्गी द्रोणागिरी घेऊन जाणाऱ्या हनुमंताला जिव्हारी लागलेला भरताचा बाण… अखेरीस सूर्य उगवण्यापूर्वी पोहोचलेला हनुमंत… त्या दिव्य वनस्पतीच्या योगाने उठलेला लक्ष्मण. इकडे पूर्वाक्षितीजाला सूर्य निघू लागे आणि महर्षी वाल्मिकाच्या वानरसेनेत आनंदाचे घुमकार घुमू लागत. या लक्ष्मण शक्तिकांडाच्या सात अध्यायात नाथाच्या प्रतिभेचा परमोत्कर्ष पहायाला मिळतो. पुढचे दोन तीन दिवस नाथाने केलेले हे गारूड मनावरून उतरत नसे. आपण वास्तवात आहोत की नाथाच्या वानरसेनेत आहोत हे समजत नसे. एक अद्भूत रम्य विश्व मन:चक्षूसमोरून हालत नसे.

आठवी नववीपर्यंत पुराणिक ग्रंथाचे… कथाकीर्तनाचे, प्रवचनाचे एक आवरण मनावर चढत गेले. दुसरी गोष्ट गावात रोज नियमावली भजन चाले. आमचे वडील आणि चुलते बऱ्यापैकी मृदंग वाजवत. घराच्या ढाळजत खुंटीला टाळ, मृदंग, विणा सतत अडकून राही. हरिपाठ, नियमावली, काकडा यामुळे मृदंगाचे बोल, विणेचा तंतकार, टाळाचा ठेका, वेगवेगळ्या चाली कानावर पडत असत. एकीकडे वारकरी संप्रदायाचे ठाण धुंडा महाराज देगलूरकराच संस्थान तर दुसरीकडे नारायण महाराजाचे लोणी येथील संस्थान. यांच्या मध्यभागी आमची गावे असल्यामुळे वारकरी संप्रदायाचा नित्यनैमित्तिक नियमाचा आणि संतवाङ्मयाचा परिणाम माझ्या मनोभूमिकेवर झाला. वडील एक आठवण सांगत असत. रामपूरच्या शिवमंदिरात धुंडा महाराजाच्या कीर्तनात उचललेली चाल माझे वडील शेतात बसून ऐकत असत. ह्या भजनकार्यामध्ये खूप उचापती, हेवेदावे, रूसवे-फुगवे चालत असत. शेवटी तीही माणसेच असतात. एक मात्रं खरं, गावगाड्यामध्ये पोटापाण्याच्या विषयाखालोखाल वारकरी संप्रदायाचा विषय भल्याबुऱ्यासाठी चर्चिला जाई..

हे वारकरी संप्रदायाचे संस्कार माझ्यावर झाले असले तरी एक संभ्रम माझ्या मनात कायम आहे. `सावळा विठ्ठल’ ही प्रतिमा ज्ञानेश्वर-तुकारामांच्या वाङ्मयीन कलामूल्यांनी माझ्या मनात उतरविली का त्या संप्रदायातील विचार तत्त्वज्ञानामुळे हे मला आजही सांगता येत नाही. बहुतेक त्या दोन्हींच्या अद्वैतामुळे ही किमया घडली असावी. या क्षेत्राच्या परीघात भावनिकदृष्ट्या गुंतवणूक झाल्यामुळे तिच्या बऱ्यावाईट परिणामांचा दृश्य आविष्कार म्हणजे ‘कावड’ ही कादंबरी होय. सामान्य कुवतीच्या जिवासाठी संसार असो, परमार्थ असा साधणे अवघडच. ‘कावड’मधल्या गोरखमास्तराची संसार आणि परमार्थ यात अशीच फरफट होते. या दोन्हींचा तोल साधून स्वतःला स्थिर ठेवणे पैठणच्या नाथासारख्या एखाद्यालाच साध्य होते. बाकीच्याची मात्र शोकांतिका घडते.

‘कावड’ कादंबरीतला गोरख मास्तर एक सामान्य वारकरी संप्रदायाची पूर्वपीठिका नसलेला, वेदशास्त्राचा सोडाच साध्या संतवचनाचाही पुरेसा अभ्यास नसलेला प्रापंचिक! प्रापंचिक जीवनात जेवढा हा प्रामाणिक आहे तेवढाच पारमार्थिक जीवनात! मग संसार का परमार्थ याचं द्वंद त्याच्या मनात सुरू होतं. कोणत्याही साध्याची मागणी संपूर्ण समर्पणाची असते. ती मागणी दोन्हीकडचीही तो पुरे करू शकत नाही. म्हणून तो शोकांतिकाचा धनी होतो.

कोणतीही वाङ्मयीन कलाकृती केवळ कल्पनेवर उभी राहू शकत नाही. त्या गोरख मास्तराच्या व्यक्तिमत्त्वाचा अल्पसा परिचय मला होता. त्याचा आधार घेत वेगवेगळ्या शक्यतेचा विचार करत कादंबरीतील गोरख मास्तराचं भावविश्व उभा केलोय. 

मित्रहोऽ जीवनही असंच असतं. तोलून मापून मार्गस्थ असाल तर इप्सीत साध्य होण्याची शक्यता असते. थोडाही तोल गेला की जीवनाची शोकांतिका घडते मग ते स्थान परमार्थिक जीवनाचं असो की, लौकिक जीवनातील संसाराचं!

माझ्या वाङ्मयीन जाणिवांचा बराचसा भाग महानुभवीय वाङ्मयाने व्यापला आहे. म्‍हाईंभट्ट, चक्रधरस्वामींचे ‘लीळाचरित्र’ असो. ‘सूत्रपाठ’ असो. या वाङ्मयातील भाषेची सूत्रमयता मनाला थक्क करणारी आहे. कोणतीही घटना, प्रसंग, व्यक्ती, विचार दृश्यमान करण्याची शक्ती या निवेदनात आहे. तत्कालीन समाजस्थिती, राजकीय घडामोडी, पीकपाणी, व्रतवैकल्ये, संप्रदायाचे आचारविचार, तत्त्वज्ञान या सर्वांचे दर्शन मोजक्या शब्दात, प्रत्ययकारीकपणे घडविण्याचा वस्तुपाठ म्हणजे हे ग्रंथ होत. “बाई! मृताचे धर्म जिवीताप्रति कैसे निरूपवावे।।” पहाडाएवढा आशय शिंपी एवढ्या पात्रात! या ग्रंथाचा अधिक ठसा मनावर उमटविण्याचे कार्य प्रा. सुग्राम पुल्ले यांनी केले. चक्रधर स्वामींचे लोकविलक्षण व्यक्तित्व, त्यांचा चक्रमपणा, पंथाचा कर्मठपणा, निःसंगपणा या सर्व बाबींचा गोचरपणा म्‍हाईंभटांनी आणला आहे. यातील एकदोन बाबींचा खुलासा केल्याशिवाय राहवत नाही. चक्रधर स्वामी पुढे चालत, मागे त्यांचा शिष्य परिवार चाले. स्वामींचं उपरणीय वस्त्र काटेरी झुडपाला अडकते. सर्व परिवार जागीच स्तब्ध. जेव्हा वारा विरुद्ध दिशेने येऊन वस्त्राची सोडवणूक करेल तेव्हाच स्वामी पुढील ग्रामी चालू लागतील. असाच दुसरा प्रसंग, वेरूळचे ते अद्भूत शिल्प पाहून स्वामींचा शिष्य परिवार अचंबित होतो. स्वामींची शिष्या बाईसा न राहवून लेण्यांकडे अंगुलीनिर्देश करीत स्वामींना प्रश्नकर्ती झाली, “स्वामी! ये काईसे।” स्वामी दोन्ही हात अंत:करणाकडे नेत उत्तरलं, “बाई हे येथूनी उपजले असे।” अशी चित्रदर्शी भाषा आणि त्यातील तत्त्वज्ञान मनावर एक अभिजातपणाची खोल नाममुद्रा उमटून गेली. आजची मराठी इतर भाषेपेक्षा एवढी सशक्त का? याचे उत्तर माझ्या दृष्टीने असे आहे. मराठीच्या उगमालाच दोन असे सशक्त लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व लाभले. तिला तिचा प्रवाह अखंड वाहत राहील. एक ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी दुसरे ज्यामुळे तुकोबाची गाथा. एक वैराग्य धारण करून विश्वाचा संसार मांडणारा, तर दुसरा संसार करून वैराग्य धारण करणारा !

भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान लोकभाषेत आणण्याचे लोकोत्तर कार्य ज्ञानेश्वरांनी केले. तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे अद्वैत म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’. तत्त्वज्ञानाने काव्याचे रूप धारण केले की, काव्याने तत्त्वज्ञानाचे रूप धारण केले यांचा आस्वादकाला संभ्रम पडावा अशी ‘ज्ञानेश्वरी’. अतिइंद्रिय अनुभव इंद्रियाकरवी भोगविण्याची प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी केली आणि आपल्या प्रतिभेने ती सिद्ध केली. परतत्त्व डोळ्यांना दाखविणारा हा ग्रंथ साहित्यातील लेणे म्हणून मराठीला ललामभूत आहे. जी भगवद्गीता व्यासकृत महाभारतातील कंठमणी आहे. भरतखंडातील हिंदूसमाजाची धारक आणि प्रेरक शक्ती आहे. तिच्यावर मायमराठीतून टीका लिहून जसामान्यांच्या ओंजळीत परब्रह्माचं गूढज्ञान टाकलं, हे ज्ञानेश्वरांचं लोकोत्तर कार्य मराठी भाषेला उच्चतर स्थानावर नेतं. भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला.

मित्रहोऽ, अशा ग्रंथांच्या साहचर्याने आयुष्याचे मळभ उजळत गेले. अनुभवाची पराकोटीची अभिव्यक्ती किती अलौकिक असू शकते. हे जाणवत गेले. एक मात्र खरे, ह्या संतांच्या चरित्राचा पारदर्शकपणा त्यांच्या ग्रंथात उमटत गेला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील संतत्व त्यांच्या साहित्याचा अविभाज्य भाग झाला.

“हे पुर्णाविद्रामा । तुझा प्रसाद चंद्रमा ।।

करी मज पौर्णिमा । स्फुर्तीची।।”

एवढी गगनगामी ज्ञानेश्वरांची प्रतिभा. अर्जुनाने उपस्थित केलेल्या सर्व तात्त्विक प्रश्नांना… मतमतांतरांना उत्तर देत त्याला निःशंक करून 

“आता कोदंड धरूनी हाती। आरूढ पा इये रथी ।।

देई आलिंगन विरवृत्ती। समाधाने ।।”

‘ज्ञानेश्वरी’चा हा प्रवास अपूर्व आहे.

पुढे भागवत संप्रदायाची ही परंपरा पंजाबपर्यंत नेणारे नामदेव भेटले.

“नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।” 

ह्याच इतिकर्तव्यात सारं जीवन भागवत संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसाद आणि प्रचार कीर्तनाद्वारे वाङ्मयाद्वारे नामदेवांनी केला. विशेषतः नामदेवांनी ज्ञानोश्वरांबरोबर केलेला प्रवास अर्थात ‘तीर्थावळी’चे अभंग व ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी वेळेचे अभंग माझ्या विशेष आवडीचे आहेत. एक तत्त्वचिंतक काव्यकर्ता दुसरा प्रासादिक वाणीने जनलोकांचे कोने कोने उजवळणारा ह्या दोन व्यक्तिमत्त्वांचा मेळ मनाला सुखावून जातो. 

“चौ युगाचा नामा उभा कीर्तनी। पाठीमागे हात जोडूनी उभी ती जनी ।।”

हे दृश्य मनापुढून हलत नाही. 

“डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी।।” म्हणणारी जनाबाई किंवा ज्ञानेश्वराला आत्मबोध देण्याएवढी मोठी झालेली मुक्ताबाई ही ज्ञानेश्वरांच्या लोकोत्तर कार्याला आलेली फळे आहेत.

ह्या संप्रदायाला स्वतःच्या विपुल लेखनाने सर्वसमावेशकपणा आणणारे पैठणचे एकनाथ महाराज ज्ञानेश्वरीची शुद्धप्रत तयार करणारे पहिले संशोधक. पौराणिकाची रसाळवाणी, बहुश्रुतता, व्यासंग, लोकवाङ्मयाची जाण या जोडीला वाङ्मयातील प्रत्येक प्रकार हाताळण्याची क्षमता, अंतर्बाह्य संतत्व… स्वतःच्या प्रतिभेचा विलास अनेकानेक ग्रंथांद्वारे पांडुरंगाला अर्पण करणारी श्रद्धा! अभंग, ओवी, गवळणी, भारूड या बरोबरच भावार्थ रामायण, भागवत या ग्रंथाची त्‍यांनी रचना केली. त्यांच्या बहुश्रुतपणाचे एक उदाहरण सांगण्याचा मोह मला या ठिकाणी होतो.

भावार्थ रामायणात प्रभूरामचंद्राचा विवाह जानकीसोबत राजा जनकाच्या राजधानी मिथीलेत होतो. मंगलवाद्याच्या गजरात अयोध्यावासीयांच्या भोजनाच्या पंगती बसतात. नाथ महाराजांनी पानावर वाढल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचे, फळफळावांचे जे वर्णन केले आहे ते विस्मयकारक आहे. चटण्यांचे प्रकार, लोणच्यांचे प्रकार, पापड-कुरडयांचे प्रकार महाराष्ट्रदेशीय नव्हे तर तेलंगणा, कर्नाटक ओलांडून उत्तर प्रदेशीय पदार्थ पानावर विराजमान होतात. असाच वनस्पतींचा प्रकार, कालगणनेचा प्रकार ही व्यासंगाची श्रीमंती नाथच करू जाणोत. मला केव्हा केव्हा प्रश्न पडतो, ही प्रतिभेची ऊर्जा कशाच्या बळावर एवढी विस्तार पावते? येवढूल्या आयुष्यात ती सामावते कशी?

मला वाटते, ग्रंथाद्वारे त्या अव्यक्ताला प्रगट करण्याची प्रबळ इच्छा! या संतांचे आध्यात्मकार्य निरपवादपणे श्रेष्ठच आहे. त्याचबरोबर त्‍यांनी समाजधारणेसाठी आवश्यक नीतिमानता, चारित्र्य लोकमानसांत रुजविले.

ज्या वातवारणात, पर्यावरणात मी राहतो-जगतो, बोलतो त्याचा अविभाज्य भाग म्हणजे तुकोबांची गाथा – अभंगवाणी! भजन, कीर्तन, प्रवचन म्हणजे तुकारामाचे अभंग, लोकव्यवहारातील नीतिमानस म्हणजे तुकारामाचे अभंग. व्रत, वैकल्ये, उपास-तपास, ध्यान-धारणा म्हणजे तुकारामाचे अभंग. एवढेच नाही तर, देहबोलीचे उद्गार, विरामचिन्हे, पूर्णविराम म्हणजे तुकाराम. एवढा तुकाराम कृषी संस्कृतीला व्‍यापून राहिला आहे. पर आणि अपरा सृष्टी डोळ्यापुढे उभा करणारा तुकाराम लोकजीवनाचा आधार झाला.

“लागला वणवा। जळतसे काया।” या वेदनेतून काव्यनिर्मिती “बुडती हे जन। न देखवे डोळा।” म्हणून निर्मितीची तळमळ. जनसामान्यांच्या एैलतिरावरील दुःखाचे निरसन करून पैलतिरावरील सुखाचा सोहळा दाखविण्याची त्यांची प्रतिज्ञा अलौकिक म्हणावी लागेल.

आयुष्याच्या वाटेवर तुकाराम वेगवेगळ्या रूपात अभंगाद्वारे भेटत गेले. महाराष्ट्रभूचे वास्तव… त्याची मानसिकता यांची अचूक जाण तुकोबाच्या अभंगातून परखडपणे आविष्कृत होते. अनुभवाची उत्कटता… त्यांचा त्यांच्या मनाला आलेला प्रत्यय… त्याच तोलामोलाच्या शब्दांनी व्यक्त होतो. आशय आणि अभिव्यक्तीची एकरूपता म्हणजे तुकारामाचे अभंग! प्रत्येक शब्दाच्या आरामविरामामध्ये तुकोबाचा श्वास-निश्वास खेळत असतो. पूर्ण अंत:करणच शब्दाच्या रत्नभांडारांनी भरले आहे. आत्मविश्वास एवढा दांडगा की, वेदउपनिषदांचा अर्थ तोच करू जाणे. माणूसच नव्हे तर सारी सृष्टी, चराचराला आपल्या अभंगाद्वारे दृष्टीगोचर केले. अंधश्रद्धा, मंत्र, तंत्र, भाटगिरी, वंशभेद, जातीभेद, लिंगभेद या सर्वांना बाजूला सारून साऱ्या जीवमात्रांना त्‍यांनी जगण्याच्या समान पातळीवर आणले. तुकारामाचा अभंग म्हणजे एक स्वयंभू कलाकृती. अनुभवाचं बीजरूप धारण केलेला शब्द, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्यांचा विस्तार कितीही मोठा होऊ शकतो.

एक शब्द म्हणजे ज्ञानेश्वरांच्या शब्दांत-

“बिंब तरी बचके एवढे। परि त्रिलोके फिके।।”

आज एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या संतवाङ्मयाची प्रस्तुतता अनिवार्य आहे. समाज धारणेसाठी त्यांनी रुजविलेली नीतिमूल्ये… माणसांना शुभाचे, मंगळाचे दिलेले संकेत. माणूस ही प्रजात टिकण्यासाठी, वाढण्यासाठी आवश्यक आहे. सर्वच क्षेत्रावर भाषेची काजळी चढताना आज आपण पाहत आहोत. अशा विपरीत काळी तर या संताच्या वाङ्मयाची अधिकच गरज आहे. या संतांचे वाङ्मयीन आणि सामाजिक कार्य पहावयाचे असेल तर आळंदी पंढरपूरची वारी पाहावी. माय मराठी भाषेचा हा उत्सव जगातील कोणत्याही भाषेत पाहिला नाही. मराठी भाषेचा पायाच या संतानी एवढ्या सशक्तपणे रचला आहे की, तिची कितीही मोडतोड झाली तरी अनेक पारंब्यांनी ती विस्तारत जाईल, ना.. गो. नांदापूरकरांच्या भाषेत,

“तोडा चिरा दुग्ध धाराच येती, न हे रक्त वाहे शरीरातुनी।

माझी मराठी मराठाच मीही, असे बोल येतील हो त्यातुनी।।”

या शिखरस्थ संतविचारांचा त्यांच्या वाङ्मयाचा कळत नकळत परिणाम माझ्यावर होत गेला. कितीही जगद्व्याळ गुंतागुंतीच्या मनोभूमिकेत एक पावित्र्याचा झरा माझ्या कथानकात येत गेला. उदाहरणार्थ ‘कावड’मधला गोरख मास्तर. संसार आणि परमार्थ दोन्हीकडून भयभीत झालेला हा मास्तर देहविसर्जनासाठी निवड करतो. ती चंद्रभागेच्या तीर्थस्थानाची! ‘संभूती’ कादंबरीतील निपुत्रिक हुलबाई नवऱ्याचा वंश वाढावा म्हणून तानीला सवत म्हणून घरात आणते; पण दैवदुर्विलास असा की, तिच्याऐवजी हुलबाईच्याच पोटी वंश वाढतो आणि तिचा नवरा मारोती मृत्यू पावतो. आता मुलीसदृश्य वाढविलेल्या तरुण तानीचं काय करावं? मोठा पीळ हुलबाईच्या अंत:करणाला पडतो. कितीतरी बरीवाईट माणसे हुलबाईला सांगून येतात, पण तानीचं लग्न लावून तिचा हात दुसऱ्याच्या हातात द्यावं हे काही हुलबाईच्या मातृहृदयाला सहनच होईना, तानी काही आपल्या घरातून जावं. हे काही केल्या हुलबाईला पटेना. मग रोज पारावर बसून भागवताच पारायण करणारा मुलगा जेव्हा तानीला स्वीकारायाला तयार होतो तेव्हा हुलबाई मोठ्या आनंदाने पाराकडे धाव घेते. तानीचा हात मोठ्या निश्चितपणे त्यांच्या हातात देते. ही किमया संत वाङ्मयाचा माझ्या मनावर झालेल्या परिणामाची. कितीही मनाचे कवाडे बंद करून बसले तरी हे प्रकाशाचे कवडसे कथानकात येतातच आणि तो तो घटना, प्रसंग, व्यक्तीला उजळून टाकतात. या ठिकाणी माझ्या ‘अधिवास’ या कादंबरीतला अखेरचा प्रसंग सांगावासा वाटतो. कळत नकळत पूर्वसुरीच्या संतवाङ्मयाचा अथक चरित्राचा परिणाम लोकमाणसांवर कसा पडतो, अशिक्षित स्त्रीला ही मंगळ काय अमंगळ काय कसं कळते, हे पाहण्यासारखं आहे. सासरचा माहेराचा आधार संपूर्ण तुटलेला. एकुलत्या लेकीचा संसार उभा करण्यासाठी सुंद्राबाईने संपूर्ण आयुष्य खर्च केलं. आता लेकीच्या संसाराला आणि नातू नारायणाला देण्यासाठी तिच्याकडे काहीच उरले नाही. सर्वच देऊन संपलेले. काही घटका, पळ आयुष्याचे राहिलेले, तरीही नातवाला नारायणाला काही मौल्यवान देण्यासाठी श्वास थांबलेले. सुंद्राबाईची अखेरची घालमेल वाढू लागली. आजी काहीतरी मौल्यवान देण्यासाठी आपला हात धरून ठेवली आहे. ही जाणीव चौदा पंधरा वर्षाच्या नारायणाला आता झाली आहे. सुंद्राने इशाऱ्याने बाजूच्या कोनाड्यातील संदूक मागविले. नारायणाला उघडावयास लावले. संदकाच्या तळाला अनेक चोळीच्या खणांनी गुंडाळलेली… कसर लागून जीर्णशीर्ण झालेली. तुकारामाची गाथा काढावयास लावून आपल्या कपाळास लावली. “हे देहुच्या वाण्याचं चोपडं… यात कुणबीकीचा साराच हिशोब हाय… यांचा रोज ताळा करून झोपत जाऽ” …आणि सुंद्राबाइने प्राण सोडला.

माझ्या ‘अग्निकाष्ठ’ कादंबरीतला माधवराव पाटील निळकंठ वाण्यासारख्या दुष्टप्रवृत्तीला सुष्टपणा देऊन त्यांच्या जगण्याला गावात अवसर करून देतो. ‘अग्निकाष्ठ’ मधलाच दुसरा एक प्रसंग नियतीने उभ्‍या केलेल्या फाशात अलगद सापडून अपराधी झालेली रत्ना… अखेरच आपल्या पतीला भुईराजाला सवाल विचारते, “मी स्त्री होते…. या वस्तीला तुमच्यानंतर आले होते… तुम्ही तर पुरुष होतात… या वस्तीला माझ्यापूर्वी आला होतात… मी चुकले म्हणून तुम्ही चुकावं का?” हा तिचा कबूली जवाब आणि प्रश्न निरूत्तर करून व्याकूळ करतो. हे प्रसंग मी उभा केलो… या पात्रांना मी घडविलो… हे तात्पुरते असले तरी माझी अशी घडण कुणी केली? तर या पूर्वसुरींच्या वाङ्मय महत्ततेने! या पुढच्या वाङ्मयीन प्रवासात पंडित कवी सामराज, “ना राजे हो आमुचीया कविकुळास बोलू लागेल” असे म्हणणारा नरेंद्र पंडीत. “सुंदरा मनामधी भरली…” अशी शाहिरी करणारा पठ्ठे बापुराव, अनंतफंदी. ज्या ग्रंथाचा सर्वाधिक प्रभाव माझ्या मनावर पडला तो ग्रंथ म्हणजे अज्ञात अशा बखरकारांनी लिहिलेली, ‘भाऊसाहेबांची बखर’ युद्धभूमीचे एवढे प्रत्ययकारी चित्रण मी तरी अपवादानेच वाचले असेल. त्यातील व्यक्ती दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे, नजिबदुल्ला, अब्दाली, विश्वासराव, भाऊसाहेब आजही मनावरून पुसले जात नाहीत. शब्द आणि अनुभवाची गाठ कसी बांधावी? यांचा एक वस्तुपाठच ह्या अज्ञान बखरकारांनी वाचकांसमोर ठेवला. अशा अनेक ग्रंथांचा हातभार माझी वाङ्मयीन मनोभूमिका तयार करण्यासाठी लागला. आज जो मी बरावाईट मराठी सारस्वतात उभा आहे. त्याचे श्रेय जसे या ग्रंथांना आहे तसे मला ग्रंथाचे अध्यापन करणाऱ्या गुरुवर्यांना आहे. स्थितप्रज्ञ होऊन ‘लीळाचरित्र’ शिकविणारे प्रा. सुग्राम पुल्ले, श्रीनिवास कुलकर्णींचा ‘डोह’ आणि विंदा करंदीकराचा ‘मृद्गंध’ तेवढ्याच तरलपणाने शिकविणारे पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचे गुरुवर्य लक्ष्मीकांत तांबोळी, तुकोबांचं वैराग्य धारण करून ‘तुकारामाचे अभंग’ शिकविणारे गुरुवर्य भगवंत क्षीरसागर, नरहर कुरुंदकर, वा. ल. कुलकर्णी, व. दि. कुलकर्णी यांनी घेतलेल्या पाठाचा लाभही झाला.

वृक्षाच्या वाढीसाठी जसा निसर्ग अनुकूल पाहिजे. तसे मुळातच उर्ध्वगामी असणाऱ्या लेखकासाठी ग्रंथ आणि ग्रंथकाराचा सहवास पाहिजे. या बाबत गुरुवर्य लक्ष्मीकांत तांबोळी आणि माझे बंधुतुल्य प्रा. भगवंत क्षीरसागर यांच्या ग्रंथांचा आणि त्‍यांच्‍या सहवासाचाही लाभ मला झाला.

माझ्या एका गुपिताची वाच्यता या ठिकाणी करावीशी वाटते. स्वच्छ सूर्यप्रकाशात माझे डोळे फार कमी प्रमाणात उघडतात. मात्र रात्रीच्या अंधारात सताड उघडे असतात. मला याचे कारण असे असावे वाटते, रात्रीच्या अंधारात सृष्टीने लपविलेली गुपिते बाहेर येतात आणि नेमकी आपल्या दृष्टीस पडतात. तसे पाहावयास गेले तर ज्ञात विश्वापेक्षा अज्ञाताचे विश्व फार मोठे आहे. म्हणून तर लेखकाला अज्ञात विश्वाची ओढ असावी. म्हणूनच तो दृष्ट जगतात सहीसलामत जगण्यापेक्षा अदृष्ट जगाचा प्रवासी होऊन अंगभर जखमा करून घेतो. म्हणूनच मला अर्वाचीन वाङ्मयाची सुरुवात करून देणाऱ्या केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेपेक्षा ‘झपुर्झा’, ‘सतारीचे बोल’ ह्या कविता आवडतात. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ या कुसमाग्रजांच्या कवितेपेक्षा ‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कविता आवडते. सूर्यतेज मुठीने शब्दात ओतणारा हा कवी नाटककार म्हणूनही तेवढाच थोर आहे. ‘घर देता का घरऽ‘ अज्ञाताला हाक मारणारा त्याचा नायक आणि त्याचे जीवनभाष्य… “आकाश पाठीवर घेऊन चालणाऱ्या या हत्तींना विचारा… या जगात कुणीच कुणाच नसत…” हे स्वगत मानवीजीवनाचे एकाकीपणा अधोरेखित करते. 

जग सुंदर करण्याचा विडा घेऊनच कलावंत जन्म घेत असतो. सर्व अमंगलाचा नाश होऊन मंगलाची, शुभाची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी त्याची साद असते, हाक असते. सर्व चराचराला याचेच संकेत तो देत असतो; पण वास्तवाच्या विपरीत स्थितीने त्यांच्या तनामनाचा दाह होत असतो. कलावंताला वाटत असलेली ही अस्वस्थता, वेदना, दुःख, त्रास, अंतःकरणाला आलेली खिन्नता, उदासीनता, यातून वाङ्मयाची निर्मिती होत असते. ही निर्मिती काही प्रश्नांना उत्तरे देते. काही प्रश्न निर्माण करून अनुत्तरीत ठेवते. आपण नेमके कोण आहोत? आपले साध्य काय आहे? असे प्रश्न स्वतःला जसे विचारते, तसेच आपण नेमके कसे जगतो आहोत? याची विचारणा, चिकित्सा करायला भाग पाडते.

अशा कवी, लेखकाच्या आविष्कारातून समाजाची सांस्कृतिक जडणघडण होत असते. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, विकास दोन प्रकारचा असतो. एक भौतिक विकास, दुसरा सांस्कृतिक विकास. या दोन्ही विकासाचे महत्त्व सारखेच आहे. यात कोणताही विकास दुसऱ्यावर आक्रमण करायाला नको आहे. भौतिक प्रगती होत असताना आपली सांस्कृतिक प्रगती होत आहे की, नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे आपले सामाजिक दारिद्य्र कळून येते, राजकीय द्रारिद्र्य कळून येते, आर्थिक दारिद्र्य कळून येते. कारण साहित्य व सांस्कृतिक प्रगतीच्या आधारस्तंभावरून राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रगतीचा मूल्यात्मक भाव अवलंबून असतो. जनसामान्य आणि लेखक यांच्या जगण्याच्या पद्धतीत… आयुष्य समजून घेण्याच्या पद्धतीत… अनुभव घेण्याच्या पद्धतीत… आणि तो अनुभव व्यक्त करण्याच्या पद्धतीत मूलतः फरक असतो. वरपांगी हा फरक जाणवत नाही. लेखकाला मात्र जाणीव असते. हे मिळालेले आयुष्य अमूल्य आहे. अपूर्व आहे…. असाधारण आहे. त्यामुळे त्याचा विनीयोग त्याच तोलाने… त्याच मापाने केला पाहिजे म्हणून तो या विविधांगी सृष्टीकडे पाहताना तिला अनुभवताना आपल्या संवेदनशीलतेचा उत्कटपणे वापर करतो. प्रत्येक घटना, प्रसंग, दृश्य पाहताना त्याचे सामान्यीकरण न करता ती घटना, प्रसंग, व्यक्ती असाधारणच म्हणून तो पाहतो. या त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीला मिळालेल्या वरदानामुळे प्रत्यक्षातील वस्तू वेगळेच परिमाण घेऊन त्यांच्यासमोर जाते. त्या दर्शनाने वेगवेगळे अर्थ त्याला प्रेरित होत असतात.

एका साधारण जीवन अनुभवाला अपूर्वता का येते? याचे कारण लेखकाच्या ठायी असणारी प्रतिभा जाणीवपूर्वक केलेले तिच्यावर संस्कार. अभ्यास, व्यासंग, बहुश्रुतता हे सर्व घटक कारणीभूत ठरत असतात. अनुभवाच्या अभिव्यक्तीला हे सर्व साक्षभूत ठरतात.

“मी प्राचीन नदीपरी खोल। माझ्या हाती होते दगडाचेही फूल।”

असे जेव्हा कवी ग्रेस म्हणतात, तेव्हा त्यांना त्याचे आदिभूत स्वरूप तर समजलेलेच असते, त्याचबरोबर आपले अंगभूत कार्यसुद्धा त्‍यांनी जाणलेले असतात. दगडाचे फूल करण्याची निर्मितीप्रक्रिया उलगडून सांगणे अवघड आहे. ज्ञानेश्वर म्हणतात तसे चित्र काढून… अंगुलिनिर्देश करून सूर्य दाखविता येईल; पण त्यांच्या प्रकाशाची, तेजाची प्रतीती कसी द्यावी?

‘उठा दयाघनाऽ लावा निरांजने, आयुष्याचे सोने काळे झाले.’ ही गूढप्रतीती अनुभवावी लागते. व्यक्त करता येत नाही. ह्या सर्व प्रतिभावंतांच्या ग्रंथातून फिरताना, त्यांच्या प्रकृतीधर्मानुसार जीवन अनुभव घेणाऱ्या वेगवेगळ्या तऱ्हा आणि तो अनुभव आविष्‍कृत करणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती भेटत गेल्या. कधी त्यांच्या अनुभव घेण्याच्या पद्धतीने आश्‍चर्यचकीत झालो, तर कधी त्या अनुभव मांडण्याच्या पद्धतीने भारावलो. कधी त्यांनी घडविलेल्या शब्दांच्या सौष्ठवात तर कधी त्या शब्दांच्या नादातालात बुडालो.

“माणसा, कधी होसील रे माणूस!” ही बहिणाबाईंची साधी हाक मनाला जाग आणते. “गेला गेला रे सूर्य सोडूनी आकाशाला। धन जसे दुर्भाग्याला” हे सूर्याचे नहेमीच जाणे मनाला निर्धन करून टाकते. “चारूदत्त हा कोण कुठूनी अंगावरला फेकीत शेला। वसंतसेना वसुंधरेने झेलूनी तो सदय्यासी धरला.” इंदिरा संतांच्या या कडव्‍यांनी मन नादलुब्ध होते, तर कुसमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीतात भास्कराचे आणि वसुंधरेचे हेच नाते वेगळ्या रूपात प्रकट होते. वास्तव तेच, पण या प्रतिभावंतांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीने त्या वास्तवाचे रूपांतर प्रतिमा, प्रतिकांच्या साह्याने रमणीय सौंदर्य आविष्कारात केले. स्वत:च्या मुलीच्या गालावर हसताना पडणाऱ्या खळीचे वर्णन बी. रघुनाथांनी असे केले,

“जळी लाट उसळूनी खळ हे पडावे, 

त्यात चंद्राचे चांदणे पडावे, 

तसे गाली हसता तुझ्या व्हावे, 

उचंबळून लावण्य वर यावे.” 

कोणता बाप वात्सल्याने मुलीला कवेत घेणार नाही? विंदा करंदीकर सृष्टीनियंत्याला प्रश्न करतात, 

“इंद्रधनुच्या भुवईखाली 

आकाशाला फुटतो डोळा 

मी नच डरतो त्या नजरेला, 

पण प्रश्न पुसतो जरा निराळा 

बाप कसा तू नपुसंक 

जार पुत्र का मी जडाचा 

मनात उरल्या काचा काचा 

त्या काचाचा भार उशाला 

मी तर बाबा पझाडलेला.”

ना. धों. महानोर, इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, अनुराधा पाटील आदींनी मराठी कवितेला स्वतःचा स्वर देऊन मराठी सारस्वतात स्वतःला रुजू करून घेतले आहे.

मित्रहोऽ, या उच्चतर कविता, कथेच्या प्रकरणात मीही काही काळ पडलो. क्षणार्धात विजेसारखा लकाकून जाणारा अनुभव. तेवढ्याच उत्कटतेने वाचकांच्या पदरात टाकणे आपल्या कुवतीबाहेरचे आहे. याची जाणीव थोड्या वेळेतच झाली. “पेरून द्यावे अनंत जन्म

 गोदाकाठी अंधारात

उभा जन्म असा झाला

वेदनेच्या प्रकाशात.” 

अशा काही ओळी लिहून थांबलो. ही कवीपणाची अवघड चढण चढण्यापेक्षा तिच्या झाडाखाली बसून तिच्या आशय, रूपसौंदर्याकडे पाहत बसणे माझ्या अवडीचे झाले. 

कवितेसारखाच कथेचा प्रकार झाला. एक अनभूतीचे शक्तीशाली केंद्र घ्यावयाचे… त्या भोवती कथानकाची गोफ विणायाची. थोड्याशा अवकाशात एका अनानुभूतीला उजळून टाकायचे. रा. रं. बोराडे, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा वाचून कथेकडे आकर्षित झालो. आशयाचा नेमकेपणा… चित्रमय भाषा मला काही जमली नाही. ‘ग्यानू महार’, ‘पंढरी हल्लाळे’ आणि ‘गोत्र’ या सारख्‍या कथा लिहून थांबलो. 

ह्या कवितेच्या देवीला फुले वहा… कथेच्या देवाला फूले वहा… त्या उद्योगामागची एक गमंत सांगतो. आठवीत असताना आमच्या साधना शाळेत एक निबंध स्पर्धा होती, “दैव श्रेष्ठ का प्रयत्‍न श्रेष्ठ” स्पर्धा आठवीपासून दहावीच्या वर्गासाठी होती. प्रथम येणाऱ्यास सरस्वतीची प्रतिमा, पेन, वही होती. आठव्या वर्गाचे ‘अ’ आणि ‘ब’अशा दोन तुकड्या होत्या. ‘अ’ तुकडीत हुशार आणि शहरी मुलांचा भरणा होता ‘ब’ तुकडीत बहुतेक ‘ढ’ मुलं आणि ग्रामीण मुलांचा भरणा आणि मी अर्थातच ‘ब’ तुकडीत. अखेरच्या बाकावर बसणारा. या ठिकाणी एक योगायोग सांगण्यासारखा आहे. होट्टलच्या प्राथमिक शाळेतसुद्धा मास्तराच्या हाती कण्हेरीची छडी आणि साधना शाळेच्या मास्तराच्या हातातसुद्धा कण्हेरीचीच छडी. बहुतेक ह्या झुडपांचा दोन्हीकडे सुकाळ असावा, ह्या छडीचा उपयोग माझ्यावर दोन्ही ठिकाणी व्हावयाचा. बहुतेक माझा वेळ मास्तराच्या अंगावरील आणि शहरी मुलाच्या अंगावरील कपड्याकडे… त्यांच्या देहबोलीकडे…. त्यांच्या गोऱ्यापान कांतीकडे… त्यांच्या स्पष्ट उच्चाराकडेच असे. या शहरीकरणाचा म्हणा… किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दरारा मला वाटत असे. एक भय माझ्यात निर्माण झाले. प्रश्नाचे उत्तर ज्ञात असूनही वर्गात ओंठावर येत नसे. एक न्यूनगंड माझ्या कुणबीपणामुळे म्हणा अथवा गावंढळपणाने म्हणा; पण माझ्यात निर्माण झाले. ही भयग्रस्तता अजूनही मनाला व्यापून आहे. फरक इतकाच आहे तेव्हा ती वास्तवाची होती, आता आज्ञाताची भीती आहे.

असो, राखेवर हिरवे पान वाऱ्याने आणून सोडावे तसे मनात विचार आले. आपणही निबंध स्पर्धेत भाग घ्यावा. माळावरच्या विहीरीत हा झरपा कुठून कसा आला हे आजही मला सांगता येईना. मग काय? वहीचे मधले दोन पाने फाडली, “दैव श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ” लिहू लागलो, सुरुवातीला मुखपाठ असलेली एक म्हण, “वाळूचे कण रगडीता तेलही गळे” टाकलो. गुन्हेगार स्वतःहून कबुलीजबाब लिहून द्यावा तसा मास्तराला निबंध दिला. वर्गाचे डोळे मिस्कील होऊन विस्फारले. एके दिवसी प्रार्थना संपल्यानंतर मुख्याध्यापकाने छडी उंचावत गर्जना केली. वर्ग आठवा तुकडी ‘ब’ मधील माझ नाव पुकारलं. घाम फुटला. बगलेत दप्तर दाबून समोरच्या चौथऱ्यावर उभा ठाकलो. माझ्या अनवाणी पायापासून कपाळापर्यंत सर्वांच्या डोळ्यांनी एक नवल पाहिलं. मुख्याध्यापक जैन सरांनी माझ्या उराला छडी लावत घोषणा केली. संपूर्ण शाळेतून निबंध स्पर्धत हा पहिला आला आहे. माझ अंग शहारलं. तेव्हापासून माझ्याकडे पाहण्याची शाळेची दृष्टी जशी बदलली तसा माझ्या अंतरमनातही बदल झाला. आपणामध्ये काहीतरी विशेष आहे असे वाटू लागले. मागच्या बाकावरचा मी हळूहळू पुढच्या बाकाकडे सरकू लागलो. काही ना काही लिहू लागलो. मोठा झाल्याचे स्वप्न पाहू लागलो.

एके दिवसी मानव्य विकास शाळेमध्ये कविवर्य नारायण सुर्वे, केशव मेश्राम, गुरुवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमापूर्वी स्थानिक कवींचे कवितावाचन झाले. त्यात मोठ्या मिनतवारीने गंगाधर जोशी मार्फत नाव नोंदवून कविता वाचली. कविता माईकसमोर वाचल्याची नशा तर आलीच त्याबरोबर कविवर्य नारायण सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’मुळे कवितामय झालो. यांचा प्रभाव असा, की काही दिवसातच शंभर पेजेसची कवितेची वही घेऊन तांबोळी सरांच्या दारात हजर झालो. त्यांची अवस्था काय झाली असेल याची कल्पना आज करवत नाही.

चांगला लेखक व्हायचे तर अभिजात वाचले पाहिजे याचा मनाने ठाव घेतला. तोपर्यंत संत वाङ्मयाची ओळख झालीच होती. वि. स. खांडेकराच्या ‘ययाती’ने मन ओढून घेतले. वातावरण निर्मिती, व्यक्तिचित्रण, प्रसंग निर्मिती आणि त्यातील भाषेचा डौल आणि लेखकाचा ध्येयवाद यांनी मनाला वेधून घेतले. त्याचप्रमाणे साने गुरुजी, शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’, रणजीत देसाईंची ‘स्वामी’, ना. सं. इनामदारांची ‘राऊ’, दाजी पणशीकरांचे ‘खरा कर्ण कोण होता?’, ‘महाभारत : एक सुडाचा प्रवास’, इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांचे ‘व्यासपर्व’ आणि ‘युगान्त’ या ग्रंथांनी मन:पटलावर पुराणाचे, इतिहासाचे एक गर्भश्रीमंत भरजरी वस्त्र पांघरले, या ग्रंथांनी मन एका काल्पनिक वास्तवावर तरंगू लागले. या मनाला इतिहास आणि पुराणातून सोडवून सामाजिक स्थितीवर आणण्याचे कार्य लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या ‘दूर गेलेले घर’, बोराडे यांची ‘पाचोळा’, वासूदेव मुलाटे यांची ‘विषवृक्षाच्‍या मुळ्या’ या मराठवाड्यातील कादंबरीकारांनी केले. तसेच आनंद यादवांची ‘गोतावळा’, उद्धव शेळके यांची ‘धग’, र. वा. दिघे यांची ‘पानकळा’, दि. बा. मोकाशी यांची ‘पालखी’ वगैरेंनी केले.

मित्रहो,  खरा मी रमलो श्री. ना. पेंडसेंच्या कादंबरी विश्वात! एकत्र कुटुंबाचा रथ ओढणारी ‘रथचक्र’मधली एका मुलाची माता… ‘गारंबीच्या बापू’ मध्‍ये चौरस्त्यावर कानातील डूल हलवत भजी तळणारी राधा अजूनही माझ्या डोळ्यापुढून हालत नाही. त्यांच्या राजे मास्तरांची तुलना माझ्या गोरख मास्तरांशी मन उगीच करू लागते. व्यकंटेश मांडगूळकरांची ‘बनगरवाडी’मधील सकाळ, संध्याकाळ शेळ्या मेंढ्याच्या कोकराच्या आवाजाने भरून गेलेली असते. भुरक्या माळावरून पाखरे उडवित जाणारे मास्तराचे पाय मला माझ्या ‘मातीखालच्या पाय’ या कादंबरीमधल्या रघूच्या पायवाटेची आठवण करून देतात. त्यांच्या ‘सत्तांतर’ कादंबरीतील नराचा संघर्ष मला माझ्या ‘अंतःपुरुष’ कादंबरीतील देशमुख आणि पाटलाचा सत्तेसाठी आणि गादी मिळविण्यासाठी चाललेला संघर्ष वाटतो. भालचंद्र नेमाडे यांचे सर्व कादंबरी विश्व तंत्रमंत्राच्या अभिनव पद्धतीने भरलेले आणि भारलेले आहे. त्याची ‘कोसला’, ‘हिंदू’ या कादंबऱ्यांनी मराठी कादंबरीचे स्वरूपच बदलून टाकले आहे. त्यांची अनुभव घेण्याची तऱ्हेवाईक पद्धत आणि मांडणीची अभिनव पद्धत मराठी सारस्वताला ललामभूत ठरावी अशी आहे. 

मित्रहो, ही मराठी साहित्याला घातलेली मोडकी तोडकी प्रदक्षिणा दोन नावांचा उल्लेख करून थांबवितो. ज्यांच्या भावविश्वात राहण्याचा मी बराच काळपर्यंत प्रयत्‍न केला, ते ‘राहून गेले तुझे नक्षत्रांचे देणे’ अशी  खंत करणारे आरती प्रभू म्हणजेच चिं. त्र्यं. खानोलकर दुसरे जी. ए. कुलकर्णी. या दोन लेखकाच्या शब्दस्पर्शाने मी मंत्रागत भारवतो. प्राण्यांचा आकार आणि विकार, त्यांचा सभ्यपणा आण विक्षिप्तपणा, त्यांची भोगलालसा, निसर्गाशी संवाद-विसंवाद, त्यांची प्रकृती आणि त्यांची नियती यातील नाट्य म्हणा अथवा नियतीने माणसासी मांडलेला जीवघेणा खेळ म्हणा या लेखकांनी आपल्या कादंबरी, कथेतून मराठी वाङ्मयात मांडला.

‘कोंडुरा’ कादंबरीतील एक दृश्य सांगण्यासारखे आहे. कथानकातील स्वामी एकाच्या वाड्यावर राहावयास येतो. वाड्याच्या निपुत्रिक स्त्रीला त्याच्या आशीर्वादाने गर्भ राहतो. स्वामीची अस्वस्थता वाढत जाते. त्यांना कारण नसताना वाटू लागते, त्या बेंगरूळ नवऱ्याचा गर्भ तिच्या पोटात वाढायला नको. काही करून हा गर्भ गळाला पाहिजे. उपाय शोधू लागतात. तेव्हा त्याना एक उपाय सुचतो. एका वनस्पतीची औषधी मूळ उगाळून त्या स्त्रीला द्यावयाची आणि तो गर्भ पाडायाचा. स्वामी ती मूळ शोधण्यासाठी जंगल पालथं घालू लागतात. बरे तिच्याच नवऱ्याचा तो गर्भ तोही स्वामीच्याच आशीर्वादाने राहिलेला. स्वामीच्या परिवेशात वावरणाऱ्या या माणसाला का पाहवेना. याचं कोणतंही समर्पक उत्तर स्वामी देऊ शकत नाहीत. मानवी मनाच्या अगम्य वर्तनाचा, गूढमनाच्या स्पंदनाचा, अतार्किकाचा असा वेध घेणारा, प्रतिभावंत विराळा! त्याच तोलामोलाच्या जी. ए.च्या कथा मनाला न तुटणारी ओढ लावतात. मानवी मनाची एक वेगळीच प्रतिसृष्टी जी. ए. त्यांच्या प्रतिमा-प्रतीकांच्या साह्याने उभी करतात. माणसाची अगतीकता, भयग्रस्तता, जगण्याची चिवट इच्छा, त्यांची विकारग्रस्तता, उसवलेली मने ‘काजळमाया’, ‘पिंगळावेळ’, ‘सांजशकुन’ अशा कथासंग्रहात चितारतात. अंधाच्या गुहा, पडक्या बारव, भंग पावलेल्या मूर्त्या, मठ, देऊळे त्यात वावरणारी, उसवलेली माणसे वाचकांसमोर हळूहळू प्रतिसृष्टी आकाराला येते. त्यांचा हा ‘माणसाच्या खोल मनातून चाललेला भुयारी प्रवास आणि त्याला दृश्यात्मक प्रत्यय देणारी त्यांची समर्थशैली मराठी वाङ्मय’ अपूर्व आहे. त्यांच्या ‘लक्ष्मी’ कथेचा एक स्थूल सांगाडा सांगण्याचा मोह मला या ठिकाणी होतो. लक्ष्मी ही केशवभट्टाच्या संसारात दुसऱ्याने आलेली. केशवभट्ट हा उपासी राहीन, पण गवत खाणार नाही असं म्हणत पठाण होऊन पाटावर बसणारा. लक्ष्मीला दोन मुली. एक मनात गाठ ठेऊन वागणारा सावत्र मुलगा, घरात अठराविश्व दारिद्र्य… लोकाघरचं धुणी, भांडी, स्वैपांकपाणी करून संसार ढकलणारी लक्ष्मी. रात्रभर भुकेचेच स्वप्न पाहणाऱ्या लक्ष्मीच्या दारात एक दिवस दारिद्र्य दूर करण्याचा अनोखा उपाय सूचविणारी जोगतीण येते. “तुझ्या गाण्याने देव उठत नाही. त्याला चिडवून जागे कर” म्हणत मूठभर मंतरलेले तांदूळ लक्ष्मीच्या हातावर ठेवते. “कुठल्याही देवळात करकर सांजेला एकवीस प्रदक्षिणा एकवीस दिवस घाल. मात्र उलट्या दिशेने.” हा शेवटचा उपाय करून बघण्याचा निर्धार लक्ष्मी करते. दुरच्या देवळात प्रदक्षिणा पुऱ्या करून मुठीतील तांदूळ महादेवाच्या पिंडावर टाकताच तिच्या म्होरं एक मऊ अवजड पडल्याचा आवाज येताच ती भीतीने गारठून जाते. छतावरील तुळईवरून खाली उतरणारा आणि पाहता पाहता सारा सभामंडप व्यापून टाकणारा एक अजस्त्र अजगर तिच्यासमोर येते. रात्रीची किट्ट वेळ, जवळच नव्हे तर परिसरातही कुणी नाही. थरथरल्या ओठांनी लक्ष्मी देवाला ‘वाचव’ म्हणून प्रार्थना करते. आणि ते अवजड सर्प प्रार्थना ऐकल्यागत मागे सरकून खिडकीतून बाहेर उतरू लागते. देवाने आपले ऐकले ह्या आनंदातच लक्ष्मीचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि दोनवित अजगराच्या शेपटाला तिचा स्पर्श होतो आणि काही कळायच्या आत शेपटीचा तेवढा भाग सोन्याचा होऊन खाली पडतो. सोन्याचा तो भाग घेऊन लक्ष्मी धावत आनंदाने घरात येते. 

ती धावत येते खरी, पण घरात आल्यावर देऊळच बरे होते असे वाटून जाते. पिवळे चकचकीत सोन्याचे कांड पाहताच आपण श्रीमंत झाल्याची जाणीव नवऱ्याला व मुलाला होते. त्यांच्या तोंडून विपरीत बाहेर पडते. “तू जर सर्पाच्या पूर्ण अंगाला स्पर्श केली असतीस तर… कितीतरी सोनं मिळालं असत.” मूळापासून बापलेक तिचा उद्धार करतात. 

मानहानी, अपमान यांनी व्यथीत झालेली लक्ष्मी परत कपिल तिर्थावरील देवळात येते. तिर्थाच्या पायऱ्या उतरत उतरत पाण्यावरच्या हिरव्या पडद्याआड लुप्त होते.

हे सर्व थोडंसं विस्ताराने सांगण्याचं कारण या प्रतिभावंतानी हाताला काय लागेल यांची पर्वा न करता मानवी मनाच्या तळाचा शोध घेतला. जे हाती आले ते तर मौल्यवान आहेच. त्याप्रमाणेच ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली ती मराठी साहित्यात अद्वितीय आहे. त्यांच्या अर्थवत्तेचा आणि निवेदनशैलीचा मोह मी माझ्या लिखाणात सुद्धा आवरू शकलो नाही. मी केवळ साज चढविलेला पार्थिव आहे- खरे चैतन्य या प्रतिभावंतांनी माझ्यात ओतले.

“कोंभाची लवलव । सांगे भूमीचे मार्दव”

ज्ञानेश्वरांच्या या ओवीचा गद्य अनुवादच करावयाचा झाल्यास माझ्या ‘मातीखालचे पाय’ कादंबरीपासून ‘अधिवास’पर्यंत उभा पट्टा या भूगोलातील नद्या, माळ, वृक्ष, दगड, मातीचे नाना प्रकार जसे इथलेच आहेत तसेच आचार, विचार, श्रद्धा, अंधश्रद्धा, देवदेवता, मठ, संस्थाने आहेत. व्यक्तीही इथल्याच, त्याचे पेहराव, सणगसुत, सणवार, इथलेच बोलीभाषा मात्र कन्नड, तेलुगू फिरून आलेली. कथानकाचे सांगडेही इथलेच.

माझे काय तर त्यात जीव टाकून त्यांना बोलायाला लावणे, त्यांची सुखदुःखे साक्षीभूत होऊन ऐकत राहणे. मधूनच त्यांना नियतीच्या स्वाधीन करून मोकळा होणे! म्हणूनच म्हणावंसं वाटतं, “तुमचंच देणं हाय हे… मी फक्त यांत काही आदिम अंधार अन् प्रकाश भरलाय…” या सारस्वताच्या पवित्र आसनावरून सत्यच उच्चारायाचं असतं आणि ते सांगायचं तर माझ्या पुढे मानवी आयुष्याचा प्रचंड गुंता पडलाय… ते सोडविण्याचा प्रयत्‍न मी, माझ्या सात कादंबऱ्यांतून केलोय… पण अंशमात्रही त्याची उकल मला करता आली नाही. त्या सृष्टीकर्म्याच्या पसाऱ्यापुढे मी हारतच आलोय. 

माझी पात्रेही अशीच… माझ्यासारखी!

‘अंतःपुरुष’मधल्या गोपाळरावाची प्रारंभीची पाऊलंही अशीच आत्मबळाच्या मागाने निघाली होती. झाडाझुडपात लपलेला… मंदिर, देवळात लपलेला देव शोधण्यासाठी… त्या अगोदर असाच शोध घेण्यासाठी ‘कावड’ मधल्या गोरख मास्तराला पाठविला पण तो हरला. मग गोपाळराव देशमुखाची तर जित होईल म्हणून त्यांना पाठविला, पण अखेरीस… पाषाणवत झालेल्या त्यांच्या डोळ्यातील अखेरचा थेंब पुसायला त्याची अधिष्ठात्री कलावतीही थांबली नाही. मात्र ‘संभूती’मधील तानी या सर्व गोष्टीला पाठमोरी झाल्यामुळे काही प्रमाणात जिंकली. ‘गोसावी’मधला वासुदेव सदैव नेणिवेच्या पातळीवर जगत राहिला.

मित्रहोऽ, जीवन एवढं समजून घेण्याएवढं सोपं नाही. त्यात जाणीव नेणिवाच्या प्रवाहाची एवढी गुंतागुंत झालेली असते की, खरा माणूस हा की तो असा प्रश्न महर्षी व्यासांसारख्या प्रज्ञावंतालाही पडावा! आता अशा जीवनाला समजून घेणाऱ्या… त्याला बोलतं करणाऱ्या लेखकाच्या मनोभूमीकेबद्दल काही भाकिते करू.

ज्या मनातून वेरूळ अजिंठ्याची निर्मिती झाली… ज्या मनातून ज्ञानेश्वरी, तुकोबाच्या गाथेची निर्मिती झाली… त्या मनाला कार्यप्रवण करणारी प्रज्ञा कशी असली पाहिजे?

मला वाटते, ह्या प्रज्ञावंताना भौतिक सुखसमृद्धीची, कीर्ती, दीर्घ आयुष्याची अपेक्षा नसावी. कारण अशा भौतिक गोष्टीसाठी त्याला मिळालेले अपूर्व, अनन्यसाधारण आयुष्य खर्च करायाला तो खचीतच तयार झाला नसता. ही ऐहिक, प्रलोभने, प्रेरणा, सामान्यांच्या ठिकाणी कार्यप्रवण असतात. लेखकाच्या ठिकाणी मूलभूत अशी एक प्रेरणा असते… त्याला जाणिवेच्या नेणिवेच्या पातळीवरून बोलावित असते… त्याला संकेत देत असते… आणि तो आपले सर्वस्व समर्पित करायाला तयार होतो. त्याला जाणीव असते… काळ अनंत आहे… आणि आपण काही काळापुरते इथे बांधले गेलो आहोत. थोड्याच काळात आपणास इथून जावे लागणार… आपला अस्त होणार…!

लौकिक व्यवहारात एखादा पाहुणा यजमानाच्या घरी आपल्या चांगल्या स्मृती ठेवून निरोप घेतो. तसा लेखक आपल्या अलौकिक वाङ्मयकृती येथे ठेवून जगाचा निरोप घेतो. त्याला जाणीव असते या भौतिक जगातील प्रत्येक वस्तू क्षय पावणारी आहे. नाश पावणारी आहे. पण ज्या शब्दाला त्‍याने अक्षरत्व दिलेले आहे…. स्वतःमधलं चैतन्य ओतलं आहे… ते शब्दब्रह्म नाश पावणारं नसतं. म्हणून

म्हणून त्यांच्या जाण्याने तो जात नाही… त्यांच्या वाङ्मयकृतीद्वारा तो इथल्या चराचरासी सदैव संवाद करत असतो.

पाण्याच्या साध्या थेंबाला मोत्याचं रूप देण्याचं कार्य शिंपला करत असतो… सामान्य माणूस आणि लेखक दोघेही जगाचा अनुभव घेत असतात, पण सामान्याचा अनुभव त्यांच्या सामान्य पातळीवरचाच व्यक्तिनिष्ठच राहतो; मात्र लेखकांनी घेतलेला तो अनुभव वैश्विक होतो, त्याचं कारण लेखकाच्या ठायी असणारी त्याची अलौकिक प्रतिभा!

असो! लेखकाचं जग जेवढं मोठं तेवढीच त्याची साहित्यकृती मोठी. तो समाजाच्या असो अथवा सृष्टीच्या वेगवेगळ्या स्तरावर जेवढा जगेल तेवढी अनुभवाची विविधता त्याच्या ठायी बांधली जाईल. हे खरे की, एक व्यक्‍ती म्हणून त्याला काही मर्यादा पडतात, पण कल्पनेने का होईना तो अनुभव घेता पाहिजे.

या ठिकाणी कन्नड लेखक एस. एल. भैरप्पाचं उदाहरण लक्षवेधी ठरेल. ‘वंशवृक्ष’ कादंबरीच्या रूपाने हिंदूधर्मशास्त्राचा… सनातन वैदिक आचारविचाराचा आलेख मांडणारा हा लेखक ‘मंद’ कादंबरीत दाक्षिणात्य धृपदगायकीपासून उत्तर भारतीय ख्याल गायकीपर्यंत… कंठ गायकीचा, नृत्य आविष्काराचा, एकंदर भारतीय सांगितिक विश्व चित्तारतो. लागलीच महाभारतकालीन वास्तवावर ‘पर्व’ कादंबरी लिहितो. पुढे ‘आवरण’ कादंबरीच्या निमित्ताने धर्म, जात, वर्ण, वंश, लिंग या भेदावर विखंडित झालेला भारतखंडातील माणूस उभा करतो. ही विविध स्तरावर जगण्याची वृत्ती लेखकाला अनुभवाची श्रीमंती आणून देत असते. 

माणसाची सनातन सुखदुःखे काही समान असली तरी काही काळानुसार, धर्मानुसार, जातीनुसार, प्रांतानुसार, लिंग आणि वर्णभेदानुसार त्याची तिव्रता कमीजास्त होत असते. लेखकाचा केंद्रबिंदू माणूस असल्यामुळे माणूस ज्या पर्यावरणात जगतो. त्या पर्यावरणाचा विचार करणे लेखकाला अपरिहार्य ठरते.

माणूस एकदा साहित्‍याचा केंद्र झाला की, लेखकाला त्याच्या सुखदुःखाचे, हर्षखेदाचे, कार्यकारणभाव शोधावे लागतात. त्यांच्या वाढीला… विकासाला… प्रतिबंध करणाऱ्या गोष्टीचा जसा धिक्कार करावा लागतो तसा त्यांच्या वाढीला अनुकूल असणाऱ्या बाबींना बळ द्यावं लागतं. अर्थात हे सर्व कलात्मक पातळी सांभाळून! म्हणून लेखकाला माणसाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी येतात. त्याचा विचार, अभ्यास, व्यासंग, मनन, चिंतन, आवश्यकच नाही तर अपरिहार्य आहे. त्यात माणसाचे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही सनातन दुःखे जशी आहेत तसेच माणसाच्या जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा, वस्त्रप्रावरणे आहेत याचाही विचार लेखकाठायी पाहिजे. याअनुषंगाने समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, अध्यात्मशास्त्र, नैतिकशास्त्र इत्यादी आणि हा माणूस ज्या समाजात राहातो त्या समाजाला नियमन करणारी राजसत्ता या सर्वांचे स्थूलमानाने का होईना लेखकाला ज्ञान पाहिजे. तरच तो शोधीत असणारा माणूस त्याच्यापुढे उभा राहील.

लेखकाचा धर्म एकच. जीवनदर्शन घडविणे. स्वतःला आलेल्या अनुभवाचा प्रत्यय वाचकाला आणून देणे. त्याची आंतरिक ईर्ष्‍या एकच स्वतःच्या ज्या अनुभवाच्या दर्शनाने तो रोमांचित झाला तोच रोमांच वाचकाच्या अंगावर पाहणे.

एवढा अट्टाहास लेखक का करतोय? माझ्या मते, लेखकाला खात्री असते. आपल्याला आलेला जीवनाचा हा अनुभव अनपेक्षित आणि अपूर्व आहे. अलौकिक आणि अनन्यसाधारण आहे. ह्या निमिषार्धात झालेले जीवनदर्शन अद्वितीय आहे आणि हा मांडणीचा, रचनेचा क्षण हुकला तर संपूर्ण मानवजातीला हे जीवनदर्शन दुर्लभ, अलभ्य आहे. म्हणून लेखक आपली संपूर्ण क्षमता पणाला लावतो आणि तो जीवनअनुभव निखळपणे उभा करतो. सत्‍यावरचे आवरण त्या क्षणापुरते निखळून पडते.

शेवटी, महात्मा गांधीचे वैचारिक गुरू हेन्री डेव्हीड थोरो यांचं एक वचन उद्धृत करतो, “या जगात दोनच अशी  स्थळे आहे की, ज्यांच्यावर आपला माथा टेकवावा… एक भरड माळाला वहीत करून धान्य पिकविणारा शेतकरी… दुसरा समाजधारणा करणारा विचारवंत साहित्यिक!”

कितीही मोठी रणभूमी असू द्या… कितीही युद्धसूचक रणभेरी, रणशिंग, शंख, तुताऱ्या वाजू द्या…. कितीही अक्षोणी सैन्य शस्त्रअस्त्रांनी सज्ज असू द्या.. पण जोपर्यंत महर्षी व्यासकृत श्रीकृष्ण रणभूमीवर आहे… तोपर्यंत मानवप्रजातीला संहार नाही आणि त्या भगवंत वाणीला पर्याय नाही आणि आम्ही तुम्ही तर… त्या महर्षी व्यासांचे वारसदार आहोत.