औरंगाबाद-बीड आणि परभणीला पावसाने झोडपले, कन्नड घाटात दरड कोसळली

दरड कोसळल्यामुळे धुळे – औरंगाबाद – सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद 

24 तासांत राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा; 6 जिल्ह्यांना अधिक धोका

औरंगाबाद,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :-

औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यतील बनोटी येथे हिवरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे गावाचा पूल वाहून गेला असून गावाचा संपर्क तुटला आहे. नदीला सध्या पुर असल्याने गावातही पाणी घुसले आहे. पाऊस सुरू आहे आणि पूल ही वाहून गेल्याने मदत कार्य करण्यास अडचणी येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. ही दरड कोसळल्यामुळे धुळे – औरंगाबाद – सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मुसळधार पावसात कन्नड घाटात दरड कोसळली आहे. ही दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. मात्र, दरड कोसळल्यानंतरची दृश्य खूपच भयावह आहेत. ही दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या अडकल्याचं दिसत आहे. दरड कोसळली त्या ठिकाणी पोलीस पथक दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. 

औरंगाबाद कन्नड तालुक्यातील नागद गावातील गडदगड नदीला मोठा पूर आला आहे. नदीच्यालगत आलेल्या बालाजी मंदिराच्या पायरिला पाणी लागलं आहे. बाजूला बालाजी भगवंताचे पुजारी कुटुंब नदिकाठी घर असल्याने त्याच्या घरात पाणी शिरले, त्यांना रात्री 3 वाजता नागरिकांनी गच्चीचे गज तोडून सुखरूप बाहेर काढले.

कन्नड घाटातील परिस्थितीची पाहणी करताना आमदार उदयसिंह राजपूत आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कन्नड घाटात प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. घाट भागात मंगळवारी दुपारपर्यंत पाऊस सुरूच होता. महामार्ग विभागातर्फे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सततच्या पावसामुळे व अवघड घाटामुळे कामात अडचण येत आहे. या मार्गाने आपले प्रवासाचे नियोजन असल्यास ते तात्पुरते स्थगित करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांनी घाटाची पहाणी करत संबंधितांना तातडीने लोकांना बाहेर काढण्याच्या सूचना केल्या.

• घाटात असणारा जुनोने तपासणी नाका लोकांना थांबण्यासाठी खुला करण्यास त्यांनी सांगितले.

• लवकरच वाहतूक कोंडी सोडवून रस्ता मोकळा होईल अशा शब्दात त्यांनी अडकलेल्या लोकांना धीर दिला.

• परिसरातील वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी पर्यायी बोगदा निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे देणार असल्याच देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

कन्नड तालुक्यांत अतिवृष्टी, घाटातील वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना
कन्नड तालुक्यांत अतिवृष्टी आणि घाटातील भूस्सखलानामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य शासनाच्यावतीने मुंबईतील सह्याद्रीचा आतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहतूक ठप्प आहे. काही भागात पाण्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा राज्य शासनाच्यावतीने आज आढावा घेण्यात आला. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी थानिक प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. कन्नड तालुक्यांचे आमदार यासाठी प्रयत्नशील आहेत. ज्या भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, अशा ठिकाणी तत्काळ मदत पोहचविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पीडित नागरिकांना तत्काळ जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

6 जिल्ह्यांना अधिक धोका

मुंबईसह पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत पुढील चोवीस तासांत पावसाची धुव्वाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे. ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. पालघर वगळता संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी अति तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यासह अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग औरंगबादसह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्वचं जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान याठिकाणी वेगवान वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस

बीड जिल्ह्यात काही भागात मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळत आहे. कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कुंडलिका आणि माणिकर्णीक नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नदी काठावरील गावांना इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, काल हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली काही भागात तर जोरदार पाऊस झाला या पावसामुळे काही भागातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. माजलगाव तालुक्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. राजेवाडी येथील बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. कुंडलीका नदीला पावसामुळे अक्राळविक्राळ रूप आल्याचं पाहायला मिळत आहे तर बीड तालुक्यातील आंबेसावळी येथील मनकर्णिका नदीला पूर आला आहे. मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. बीड जिल्ह्यातील काही भागात मोठा पाऊस झाला तर अजूनही बीड जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली

परभणी : परभणीमध्ये पावसाने धुमशान घातले असून पाथरी तालुक्यात गुंज महामार्गावर एक आहे. या गाडीत सात प्रवासी होते. गावकऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरुप वाचवले आहे.

पाथरी तालुक्यातील केकर जवळा ते गुंज महामार्गावर आज रात्री एका स्कार्पिओ गाडी वाहून गेली आहे. या गाडीत एकूण सात प्रवाशी असल्याची माहिती समोर आली. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर गावकरी मदतीला धावून आले. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. परिसरातील गावकऱ्यांनी सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ थोडक्यात टळला आहे. पण, गाडी मात्र पाण्यात वाहून गेली आहे.

 पाथरी तालुक्यात पाच तासांमध्ये 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून कासापूरी हादगाव महसूल मंडळांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. हादगाव महसूल मंडळांमध्ये 130 मिलिमीटर, तर कासापुरी मंडळांमध्ये 106 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे परिसरातील शेतांमध्ये पाणी घुसले असून उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे, तालुक्यातील बंधारे पूर्णपणे भरले असून या बंधाऱ्यांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.

यामुळे गोदावरी नदीकाठी असलेल्या शेतांमध्येही, पाणी घुसू लागले आहे. एकूणच तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर परिस्थिती गंभीर बनली असून पाथरीच्या तहसीलदार यांनी शेतांची पाहणी सुरू केली आहे.

अतिवृष्टीने पुरात वाहून गेलेल्यांच्या शोध कार्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शर्तीचे प्रयत्न

नांदेड  :- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नदी-नाल्यांना अचानक पूर आले. अचानक आलेल्या या पुरामुळे कंधार तालुक्यातील गगनबीड येथे 30 ऑगस्ट रोजी रात्री 7.45 वाजेच्या सुमारास 26 वर्षाचा तरुण उमेश रामराव मदेबैनवाड हा मोटारसायकलसह पुरात वाहून गेला. तसेच लोहा तालुक्यातील कोष्टेवाडी येथील 32 वर्षाचा युवक ज्ञानेश्वर माधव वाघमोडे हा पुरात वाहून गेला. मुखेड तालुक्यातील उंद्री (पदे) येथे 31 ऑगस्ट रोजी सकाळी अतिवृष्टीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला अचानक पूर आला. यात 15 वर्षीय कमलाकर दत्तात्रय गडाळे हा मुलगा शौचास गेला असतांना वाहून गेला. लोहा तालुक्यातील सावरगाव येथे गावाजवळील नाल्यांना पूर आल्याने या पुरात 52 वर्षीय मणकर्णाबाई बापुराव दगडगावे व 45 वर्षीय पार्वतीबाई संभाजी दगडगावे या वाहून गेल्या. यातील मणकर्णाबाई दगडगावे, कमलाकर गडाळे व ज्ञानेश्वर वाघमोडे यांचे मृतदेह जवळच्या शिवारात आढळून आले. दोन व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहे.
 
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घटनास्थळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने काल रात्री नियोजन करुनही पाण्यात उतरता आले नसल्याचे कंधार येथील तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले. कंधारचे उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर हेही शोध कार्यावर लक्ष ठेवून आहेत. महसूल व पोलीस दलाची टिम या शोध कार्यात प्रयत्नाची शर्त करत आहेत. तथापि पाणी उसरल्याबरोबर शोध कार्य वेगात सुरु करण्यात आले आहे. शोध कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपत्ती विभागामार्फत तातडीने बोटीची व्यवस्था केली असून बचाव कार्य पथकातील युवकांना त्यांनी सर्व बाबी समजून घेऊन सूचना दिल्या. गरज पडल्यास वेळप्रसंगी शोधासाठी सीआरपीफ, एसडीआरएफ किंवा एनडीआरफची टीमला बोलविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.