‘सब खेले, सब खिले’, ‘मन की बात’मधून मोदींचा नवा नारा!

देशामधील क्रीडा संस्कृतीत योगदान देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे पंतप्रधानांचे देशाला आवाहन

नवी दिल्ली , २९ऑगस्ट /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिन्याच्या अखेरच्या रविवारी, दि. 29 ऑगस्ट रोजी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमामधून देशवासींयाशी संवाद साधला. आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, “आज मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. ध्यानचंद यांच्या हॉकीने अख्या जगाला भारताची ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर आता ४ दशकांनंतर भारताच्या खेळाडूंनी हॉकीमध्ये आपल्या जीवाचे रान करत देशाला पदक मिळवून दिले.अलिकडेच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमधून आपल्या क्रीडा जगताने यशाची कमाई केली आहे, त्यामुळे देशातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी जे काही शक्य आहे ते योगदान द्या, त्यासाठी आपली गती वाढवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे.

भारतीयांना हॉकी पदक मिळाल्यानंतर सर्व देशवासीयांना आनंद मिळतो. ऑलिम्पिकने यावेळी प्रभाव निर्माण केला आहे आणि प्रत्येक कुटुंबात खेळांची चर्चा सुरू झाली आहे. सर्व प्रकारच्या खेळाविषयी जागरुकता निर्माण झाली असून अनेकांना विविध खेळांविषयी प्रोत्साहन मिळाले आहे. केंद्र सरकारही यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न करत आहे. ‘सब खेले, सब खिले’ यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे,” असे मोदी यावेळी म्हणाले.

ते म्हणाले, “आजच्या तरुणांना काहीतरी वेगळे करायचे आहे. नुकतेच भारताने आपले अंतराळ क्षेत्र उघडले आणि तरुण पिढीने ती संधी साधली. तरुण पुढे जात आहे आणि मला खात्री आहे की येत्या काही दिवसांमध्ये असे उपग्रह मोठ्या संख्येने असतील, ज्यावर तरुणांनी महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या प्रयोगशाळांमध्ये काम केले असेल. आज लहान शहरांमध्ये स्टार्टअप संस्कृती विस्तारत आहे,” अशी माहिती मोदी यांनी यावेळी दिली.

आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान  म्हणाले, खेळ प्रकारांना स्पर्धांच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी देशाच्या दुर्गम खेड्यांसह, देशाच्या अन्य भागांत आणि प्रत्येक ठिकाणी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचे स्मरण करताना, मोदी यांनी टोक्यो ऑलिम्पिकमधील भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीचा उल्लेख करीत नमूद केले की, जिथे कुठे मेजर ध्यानचंदजी यांचा आत्मा असेल, त्यांना खूप प्रसन्न वाटत असेल, कारण त्यांच्या हॉकीमुळेच संपूर्ण जगात भारताला गौरवाचे स्थान मिळवून दिले होते.

देशभरात उद्या आपणा सर्वांकडून साजऱ्या होणाऱ्या, जन्माष्टमीबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी त्यांचा अलिकडचा एक अनुभव सांगितला आणि म्हणाले त्यांच्या निवासस्थानाबाहेर कोणीतरी एक कलात्मक सुंदर पुस्तक त्यांच्यासाठी ठेवले होते. या पुस्तकामध्ये, भगवान श्रीकृष्णांची अनेक रूपे आणि त्यांची छायाचित्र होती. मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर पुस्तक ठेवणाऱ्या जादूरानी दासी यांची मोदी यांनी भेट घेतली, मोदी यांनी त्यांच्याबरोबर झालेल्या संवादाचे देखील कथन केले.

स्वच्छता अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी आज म्हणाले की, देश जेव्हा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, अशा वेळी हे आपण सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे की स्वच्छ भारत अभियानाचा संकल्प कोणत्याही परिस्थिती आपल्याकडून दुर्लक्षित राहता कामा नये.

मोदी यांनी बिहार येथील डॉ. राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठातील सुखेत मॉडेलबद्दल देखील विचार मांडला. खेड्यांमधील प्रदूषण कमी करणे हा या मॉडेलचा उद्देश आहे.

आपला वारसा जपणे, त्याचे जतन करणे आणि नवीन पिढीकडे तो सोपविणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे, असे सांगत पंतप्रधानांनी संस्कृत बाबत जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन देखील केले.

पंतप्रधान म्हणाले, आपल्या शास्त्रानुसार, सर्व कुशल, प्रतिभावान लोक निर्मिती आणि बांधकाम प्रक्रियेत गुंतलेले आहेत, हा वारसा भगवान विश्वकर्मा यांचा वारसा आहे आणि अशा व्यक्तींशिवाय जगण्याची कल्पना देखील अनाकलनीय आहे.

कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी देशवासीयांना दवाई भी, कडाई भी याचे स्मरण करून दिले आणि त्यांना लसीकरण करून घेण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, लसीकरणाच्या 62 कोटींपेक्षा अधिक मात्रा देशभरात देण्यात आल्या आहेत, परंतु तरीही नागरिकांनी  सावध आणि दक्ष राहणे गरजेचे आहे.