परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

मुंबई, २९ऑगस्ट /प्रतिनिधी :- भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेला. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसूली संचालयाने अर्थात ईडीने नोटीस पाठवली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. यामुळे आता या ईडीच्या नोटीसीमुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्ष आमनेसामने येणार असल्याची चिन्हं आहेत. 

ही राजकीय सुडापोटी कारवाई केली असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रेचा रविवारी समारोप झाला. यानंतर ही नोटीस ईडीने बजावल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
नारायण राणे यांना अटक व्हावी यासाठी अनिल परब यांनी पोलीसांवर दबाव टाकला होता, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. या प्रकाराचा एक व्हीडिओही भाजप नेत्यांनी शेअर केला होता. त्यात अनिल परब स्पष्टपणे अटक करा, या प्रकारचे आदेश देत असल्याचे दिसून येत होते.
 
राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे (केंद्र) सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. आप क्रोनोलॉजी समझिए… कायदेशीर लढाई कायदयानेच लढू….जय महाराष्ट्र.,”
भाजप नेते किरीट्ट सोमय्या यांनीही याबद्दल प्रतिक्रीया दिली आहे. बेकायदेशीर रिसॅार्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे ही कारवाई सुडबुद्धीने न होता कायदेशीर बाबी पूर्ण करूनच होत आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.