कोकणात यापुढे भाजपच!-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निर्धार

जन आशीर्वाद यात्रेला जोरदार प्रतिसाद

देवगड, २९ऑगस्ट /प्रतिनिधी :- कोकणात परिवर्तन घडवून आणायचे आहे. कोकणात आर्थिक सुबत्ता निर्माण करायची आहे. त्यासाठी शिवसेनेचा सुपडा साफ करून केवळ भाजपचाच झेंडा फडकवायचा आहे, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात केले. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी सिंधुदुर्गात दाखल झाली. तिथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

जनतेच्या समस्या चांगल्या ज्ञात असून त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. पण भविष्यात जिल्ह्यात आमदार आणि खासदार भाजपाचेच असतील यासाठी कामाला लागा असा आदेशही राणे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

माझ्याकडील सूक्ष्म, लघु आणि मध्यम खात्यातील योजनांचा लाभ घेऊन उद्योग उभारून उद्योजक बना आणि कोकणात आर्थिक सुबत्ता निर्माण करा व राज्यासह देशाचे उत्पन्न वाढवा. रोजगार व नोकऱ्या निर्माण करा, असे आवाहनही नारायण राणे यांनी देवगड व जामसंडे येथे केले.

कणकवली येथे शनिवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. यानंतर ठिकठिकाणी जनतेचे स्वागत, आशीर्वाद स्वीकारत यात्रा मुंबई-गोवा महामार्गावरून जानवली, नांदगाव येथील कार्यक्रमात सहभागी होत ते देवगड तालुक्यात दाखल झाले. सायंकाळी मालवण तालुक्यातून यात्रा सावंतवाडीला पोहोचली.

नारायण राणे यांनी आपल्यासारख्या कोकणच्या सुपुत्राला केंद्रात कॅबिनेटमंत्री केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांनी मला मंत्रीपद देऊन केंद्रामध्ये काम करण्याची संधी दिली. या संधीचा उपयोग कोकणचा विकासासाठी करणार आपल्या खात्याच्या माध्यमातून येथील बेरोजगारांना उद्योग उभारणीसाठी १ कोटी ते अडीचशे कोटीपर्यंत कर्जाची उपलब्धता करून देऊ, अशी ग्वाही राणे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांच्या विकासासाठी २५ योजना दिलेल्या आहेत. विविध उद्योग उभारण्यासाठी ३५ टक्क्यांपासून ९० टक्क्यापर्यंत अनुदान देण्याच्याही काही योजना आहेत त्याचा लाभ घ्या, असेही आवाहन नारायण राणे यांनी केले. उद्योग करून इच्छिणाऱ्यांसाठी आवश्यकते मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी सिंधुदुर्गात प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार असल्याचे तेही त्यांनी सांगितले.

भारत देशाला प्रगतीकडे नेऊन देश महासत्तेकडे वाटचाल करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जगात देशाचे नाव झाले. भारताला प्रतिष्ठा मिळाली. याबद्दलचा सार्थ अभिमान प्रत्येक देशवासीयांना वाटत आहे, असे ते म्हणाले.