औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने न्यूमोकोकल लसीकरणाची सुरुवात

औरंगाबाद ,१४जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने 5 वर्षाखालील बालकांना न्यूमोकोकल कॉनज्युगेट लस निशुल्क देण्यात येणार आहे .  आज दिनांक 14 जुलै 2021 रोजी सिडको एन 11 मनपा आरोग्य केंद्र येथे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा ,डॉ नीता पाडळकर व लसीकरण अधिकारी डॉ स्मिता नळगीरकर यांच्या हस्ते वैशाली पाटील यांच्या  दीड महिन्याच्या बालकाला न्यूमोकोकल कॉनज्युगेट लस (पीसीव्ही)चा पहिला डोस देऊन या लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सिडको एन 11 आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बालरोगतज्ज्ञ  डॉ .रवि सावरे , प्रीती सोनवणे, सिस्टर,आशा वर्कर्स ,आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक व इतर कर्मचारी उपस्थित होते. आज एकूण 171 बालकांना हा डोस देण्यात आला.    

5 वर्षाखालील मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमुख कारण स्ट्रेप्टोकोकस हे जिवाणू असते .दरवर्षी न्यूमोनिया या आजारामुळे जवळपास 15.9% बालमृत्यू होतात.9% पेक्षा जास्त मृत्यू हे मेंदूज्वर मुळे होतात.  या आजारापासून संरक्षण होण्याच्या हेतूने महाराष्ट्रात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत पिसिव्ही या नवीन लसीकरणाची सुरुवात करण्यात येत आहे .न्यूमोकोकल कॉनज्युगेट ही लस दिल्यामुळे न्यूमोनिया ,मेनिजायटीस,ओटायसिस व सायनुसायटीस,बॅक्टेरिया, स्पेसिस या आजारापासून संरक्षण होते.

न्यूमोकोकल कॉनज्युगेट लस निशुल्क

न्यूमोकोकल कॉनज्युगेट ही लस खाजगी रुग्णालयात 3 ते 5 हजार रुपये शुल्क आकारून देण्यात येते.परंतु हीच लस महानगरपालिकेच्या वतीने अगदी निशुल्क देण्यात येणार आहे .नियमित लसीकरणा अंतर्गत बीसीजी (BCG) ,पेंटा(PENTA),आयपीव्ही (IPV),ओरल पोलिओ,गोवर रुबेला या सर्व लसी निशुल्क देण्यात येतात.त्याच लसी खाजगी रुग्णालयात देण्यासाठी अंदाजित 5 ते 10 हजार रुपये खर्च येतो.  PCV लस ही तीन डोस मध्ये दिली जाते .2 प्रायमरी डोस, वयाच्या 6 व्या आठवड्यात ,14 व्या आठवड्यात आणि 1 बुस्टर डोस वयाच्या 9व्या महिन्यात दिली जाते.ही लस अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे .महानगरपालिका अंतर्गत दरमहा एकूण 300 स्थायी लसीकरण सत्रे व 443 बाह्य लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहे.दरवर्षी 1 वर्षाच्या आतील 22000 बालकांचे लसीकरण करण्यात येते. 

पालकांनी बालकांचे न्यूमोकोकल कॉनज्युगेट लसीकरण करून त्यांचे न्यूमोनिया या आजारापासून संरक्षण करावे असे आवाहन  महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सर्व पालकांना करण्यात आले आहे.