टोक्यो ऑलिंपिकसाठीच्या भारतीय चमूसाठीच्या स्फूर्तीगीताचे उद्घाटन

नवी दिल्ली,१४जुलै /प्रतिनिधी :- केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते, आज टोक्यो येथे जाणाऱ्या भारतीय ऑलिंपिक चमूसाठीचे उत्साहवर्धक स्फूर्तीगीत म्हणजेच चीअर सॉंगचे आभासी उद्घाटन झाले.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा, भारतीय ऑलिम्पिक संघाचे सरचिटणीस राजीव मेहता, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान, टारगेट ऑलिम्पिक पोडीयम स्कीम चे सीईओ, कमांडर राजगोपालन यावेळी उपस्थित होते. ‘हिंदूस्थानी वे’ हे गीत पॉप सिंगर अनन्या बिर्ला यांनी गायले असून, सुप्रसिध्द संगीतकार ए आर रेहमान यांनी गीताला संगीतबद्ध केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व ऑलिम्पिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी, केलेल्या शुभारंभालाच पुढे नेणारा  हा एक आणखी प्रोत्साहनपर प्रयत्न आहे, अशा शब्दांत निशीथ प्रामाणिक यांनी या गीताचे कौतुक केले.

 “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्योला जाणाऱ्या सर्व खेळाडूंचे मनोबल आणि उत्साह वाढवण्यासाठी, चीअरफॉरइंडिया-  #Cheer4India उपक्रम सुरु केला आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत, संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना पाठींबा देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पुढे आला आहे. हे गीतही त्यांना स्फूर्ती देणारे आहे. या गीताच्या रचनेबद्दल मी ज्येष्ठ संगीतकार ए आर रेहमान आणि युवा गायिका अनन्या बिर्ला यांचे मी आभार मानतो.” असे प्रामाणिक यावेळी म्हणाले.