मुख्यमंत्री योगींनी दिले हाथरस प्रकरणाच्या CBI चौकशीचे आदेश

हाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने
अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील; काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी
Image

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण हाथरस प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

उल्लेखनीय आहे की मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून शनिवारी अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी आणि डीजीपी हितेशचंद्र अवस्थी हाथरसमधील पीडित कुटुंबास भेटण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला.

गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावरून विरोधी पक्ष आंदोलन करत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसमध्ये पोहोचल्या असून रविवारी समाजवादी पक्षाचे शिष्टमंडळ तेथे जाणार आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणावरुन विरोधी पक्ष कायदा व सुव्यवस्थेबाबत योगी सरकारवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे राजीनामा मागत आहेत, तर बसपा सुप्रीमो मायावती यांनी, मुख्यमंत्री योगी यांनी गोरखपूरला जाऊन मठ चालवावे. अशी टीका केली आहे.

पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यूपी प्रशासनावर सत्य लपवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता योगी सरकारने दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले.

हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप

नवी दिल्ली : हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जंतरमंतरवर आम आदमी पार्टीनेही निदर्शने केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही या निदर्शनांना उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ‘आप’तर्फे करण्यात आली. सीएए विरोधातल्या आंदोलनांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात काल जंतरमंतरवर आंदोलने झाली. 

जंतर मंतरवर आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संघटना उतरल्या होत्या. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केली. युपी सरकार आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्टुडंट विंगतर्फेही जंतरमंतरवर मोठी घोषणाबाजी करण्यात आली. 

हाथरसमधील बलात्कार पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी देशातल्या डाव्या पक्षांनी काल जंतर मंतरवर आंदोलन केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, पॉलिटब्युरो सदस्य वृंदा करात, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा हे सर्व नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकार या प्रकरणी मौन का बाळगून आहे असा सवाल या नेत्यांनी केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी टीका त्यांनी केलीय. 

अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील; काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी
Image

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील, जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही. काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

Image

राहुल गांधी व प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या घरातून बाहेर पडताच, माध्यमांनी त्यांना घेरले. माध्यमांशी बोलताना त्यांनी  अन्याविरोधात लढाई सुरूच राहील. जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नसल्याचे म्हटले.

Image

पीडित कुटुंबाचा आवाज कुणीही दाबू शकत नसल्याचं राहुल गांधी यावेळी सांगितलं. तर, त्या कुटुंबाने आपल्या मुलीला शेवटचं पाहिलं देखील नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जबाबदारी समजली पाहिजे. असं प्रियंका गांधी यांनी यावेळी म्हटलं.