केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे युवकांना स्वच्छ भारत कार्यक्रमासाठी प्रोत्साहन

चंदीगडमध्ये नेहरु युवा केंद्र संघटनेची स्वच्छता मोहीम

चंदीगड ,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- भारत सरकारकडून राबवल्या जात असलेल्या स्वच्छ भारत कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंजाब आणि चंदीगडच्या नेहरु युवा केंद्र संघटन या संस्थेने आज चंदीगडमध्ये सेक्टर 32 मधील एसडी महाविद्यालयाजवळच्या भागात स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर हे देखील या मोहिमेत नेहरु युवा केंद्र संघटनेच्या आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांसोबत सहभागी झाले.

लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करणे, लोकांना एकत्र आणणे आणि कचऱ्याची, विशेषतः एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, असे त्यांनी या मोहिमेनंतर सांगितले. या भव्य उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील 75 लाख किलो कचरा, मुख्यत्वे प्लॅस्टिकचा कचरा जमा करण्यात येईल आणि त्याची नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभाग आणि पाठबळाने विल्हेवाट लावण्यात येईल, असे ते म्हणाले.

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवक व्यवहार विभाग आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी एक ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 दरम्यान देशव्यापी स्वच्छ भारत कार्यक्रम राबवत आहे. हा कार्यक्रम नेहरु युवा केंद्र संघटनेशी संलग्न असलेले युथ क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या जाळ्याच्या माध्यमातून देशातील 744 जिल्ह्यांमध्ये सहा लाख गावांमध्ये राबवण्यात येत आहे.