४१ तलवारी, सहा कुकरी, दोन गुप्‍त्‍यांसह एक टाटाएस मालगाडी जप्‍त,हत्‍यार मागविणाऱ्या इरफानला बेड्या

औरंगाबाद,४जुलै /प्रतिनिधी:-

गुगलवरुन कुरियरने मागविलेल्या ४१ तलवारी, सहा कुकरी, दोन गुप्‍त्‍यांसह  एक टाटाएस मालगाडी असा सुमारे दोन लाख ४५ हजार २५० रुपयांचा ऐवज पुंडलिकनगर आणि जिन्‍सी पोलिसांनी संयुक्तरित्‍या कारवाई करुन  जप्‍त केला. तसेच हत्‍यार मागविणारा 

इरफान खान ऊर्फ दानिश अय्युब खान (२०, रा. जुना बायजीपुरा) याला रविवारी दि.४ पहाटे बेड्या ठोकल्या.

आरोपी इरफान ऊर्फ दानिश खान याला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता ९ जुलैपर्यंत त्‍याला पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.एच. खेडकर यांनी दिले.

बायजीपुरा येथील इंदिरानगरच्या इरफान ऊर्फ दानिश खानच्या नावावर हिना किराणा स्टोअर्स या पत्त्यावर ब्लू डार्ट कुरियरने अमृतसर येथील अरमान इंटरप्राईजेसकडून लाकडी खेळण्याच्या नावाखाली तलवारी येत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे  यांना मिळाली. या आधारे शनिवारी दि.३ दुपारी दोनच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाण पुलाखाली पथकाने सापळा रचून ब्लू डार्ट कुरियरचा छोटा हत्ती (क्र. एमएच-२० ईजी-११०७) यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यात दानिश खान नावाचे पार्सल मिळून आले. हे पार्सल अमृतसर येथून मागवण्यात आले होते. त्या पार्सलवर लाकडी खेळणी असा उल्लेख होता. पार्सल फोडून पाहिले असता त्यात ५ तलवारी आढळून आल्या. दुपारपासूनच पुंडलिकनगर पोलिसांनी दानिशचा शोध घेऊन रात्री ताब्यात घेतले. चौकशीत इरफान खान याने दानिश या नावाने पार्सल मा‍गविल्याचे समोर आले.

दरम्यान हे पार्सल जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जात हा गुन्हा जिन्सी पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर जिन्सी पोलिसांनी  रात्री उशिरापर्यंत ईरफान ऊर्फ दानिशकडून वरील प्रमाणे हत्‍यारे जप्‍त केली.

४२० चा गुन्‍हा दाखल

अरमान इंटरप्राईजेस या कंपनीने लाकडी खेळण्याच्या नावाखाली तलवारी पाठवून शासनाची फसवणुक केल्या कंपनी विरोध देखील गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपीने यापूर्वी ऑनलाईन मागविलेल्या तलवारी शहराच्‍या विविध ठीकाणी विक्री केल्या असून त्‍या जप्‍त करणे आहेत. आरोपी अशा प्रकारे ऑनलाईन  खरेदी कोठून करतो व गुन्‍ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.