अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला अटक,८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद,३जुलै /प्रतिनिधी:-

व्हाइट मॅजिक नावाने ओळखला जाणारा प्रतिबंधित मॅफोड्रोन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला पोलिसांनी शुक्रवारी दि.२ दुपारी अटक केली. त्‍याला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.एच. खेडकर यांनी शनिवारी दि.३ जुलै रोजी दिले. जुनेद खान जावेद खान (२५, गल्ली क्र. ७, बारी कॉलनी) असे तस्काराचे नाव आहे.
अंमली पदार्थाची तस्करी करून विक्रीसाठी एक जण कर्णपुरा मैदानात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयुक्तांच्या विशेष पथकाने कर्णपुरा भागात सापळा रचून रंगेहाथ जुनेद खान याला पकडले. त्याच्या ताब्यातून पथकाने ६.७३ ग्रॅम मॅफोड्रोन नावाचा अंमली पदार्थ आणि मोबाइल असा एक लाख १६ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्‍याची चौकशी केली असता, त्‍याने सदरील अंमली पदार्थ हा मुंबईतील आदील कडून विकत आणल्याची कबुली पोलिसांना दिली.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी आरोपीला अंमली पदार्थ विक्री करणार्या मुंबईतील आदील याला अटक करणे आहे. सदरील अंमली पदार्थ आरोपी कोणाला विक्री करणार होता याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीला गुन्‍ह्यात आणखी कोणी मदत केली काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.