न्यायालयातून संचिका लंपास; खुनाच्या आरोपीविरुध्द पोलिसांत तक्रार

औरंगाबाद,३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  खुन प्रकरणात  सुरु होणार्‍या प्रत्यक्ष सुनावणीच्या पहिल्याच दिवशीच खूनाचा आरोप असलेल्या  प्रकरणातील आरोपी नानासाहेब कडूबा घुगे याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने न्यायलयातून त्याच्या खुनाची केस (संचिका) लंपास केल्याची तक्रार न्यायालयातील लिपिकाने वेदांतनगर पोलीस ठाण्यात दिल्यावरुन खुनाच्या आरोपीविरुद फाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. खळबळजनक घटना बुधवारी दहावे प्रथमवर्ग न्यायालयात घडली. न्यायालय प्रशासनाच्या तक्रारीनंतर ही संचिका परत मिळवण्यासाठी घुगे याच्या शोधासाठी वेदांतनगर पोलिसांनी पथके तैनात केली आहे.
चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका खून प्रकरणात घुगे हा आरोपी आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०२, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. ७ जुलै २०२२ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात या प्रकरणावर पहिल्यांदा सुनावणी झाली. आरोपीतर्पेâ त्याच्या वकिलांनी दोषारोपपत्राची प्रत स्वीकारली. परंतु, पुढील ३ तारखांना आरोपीला जेलमधून न्यायालयात हजरच केलेले नव्हते. दरम्यान आरोपीने तदर्थ न्यायालयात जामीनसाठी प्रयत्न केला परंतु तो फेटाळला गेला. त्यानंततर त्याच्यासाठी हायकोर्टात जामीनअर्ज सादर केला गेला. २३ ऑगस्ट २२ रोजी त्याचा १५ हजार रुपायाच्या जात मुचालक्यावर हायकोर्टाने त्याचा जामीन मंजूर केला.
दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खून प्रकरणाची सुनावणी सुरु झाली म्हणून गेल्या जानेवारीत १९ तारखेला आरोपी नानासाहेब न्यायालयात हजर झाला. त्याच्या समक्ष सुनावणी झाली आणि प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी एम भांडे यांनी केले.

फिर्यादीनुसार संचिका जतन करण्याची जवाबदारी न्यायालयातील लिपिक प्रशांत शिंदे याची असून काल दि. १ रोजी घुगे आपल्या दोन साथिदारांसोबत रेकार्ड सेक्शनला आला आणि त्याने वाचायला संचिका मागितली. ती न देता शिंदेंनी घुगेला वकिलास घेऊन येण्यास सांगितले. त्याच्या वकिलांसह येऊन त्याने पुर्सीस दिली. परंतु, ती पुर्सीस ठेवण्यासाठी शिंदे यांना संचिका सापडली नाही. त्यामुळे त्यांनी आधी पीठासन अधिकारी दहावे कोर्ट यांना फाईल जागेवर नसल्याची माहिती दिली. न्यायदंडाधिकारी यांनी ही घटना वरिष्ठांच्या कानावर घातली व त्यांच्या सूचनेनुसार काल रात्री ८.३० वाजता प्रथमवर्ग न्यायालयाचे लिपिक प्रशांत धोंडिराम शिंदे यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आरोपी नानासाहेब आणि त्याच्या दोन अज्ञात सहकार्‍यांच्या विरोधात त्यांनीच ही फाईल चोरल्याची फिर्याद दिली. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल अयुब तडवी यांनी गुन्हा दाखल करून पथके नेमली ही पथके आरोपींच्या दिशेने रवाना केली.